शिक्षणाचा ध्यास असलेली सुप्रिया

10 Dec 2023 21:03:25
Article on Supriya Naikar

शिक्षणाचा ध्यास असलेल्या कल्याणमधील सुप्रिया प्रकाश नायकर यांनी आठ वर्षांनंतर घर आणि शिक्षण ही तारेवरची कसरत करीत विविध पदव्या संपादन केल्या. वेळेचे नियोजन आणि सासरकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगणार्‍या सुप्रिया यांच्या प्रवासाविषयी.

सुप्रिया यांचा जन्म मुंबईतील जोगेश्वरी येथे झाला. त्यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण जोगेश्वरी येथे झाले. त्यांचे वडील बाळकृष्ण हे बँकेत नोकरीला होते. त्यामुळे घरी सदृढ वातावरण होते. १९९३ साली वडिलांसह त्या कल्याणला राहायला आल्या. त्यामुळे त्यांचे पुढील शालेय शिक्षण कल्याणमधील गणेश विद्यालयात झाले. उल्हासनगरच्या आरकेटी महाविद्यालयातून ‘बी.कॉम’ तर मुंबई विद्यापीठातून ‘एम.कॉम’ ही पदवी घेतली. पदवीनंतर त्यांनी खासगी शिकवणीत शिकविण्यास सुरुवात आहे. २००६ मध्ये त्यांचा विवाह प्रकाश यांच्याशी झाला. लग्नानंतर १५ दिवसांतच त्यांना ‘बी.एड’साठी प्रवेश मिळाला. त्यांचे सासर आणि माहेर शिक्षणाला प्राधान्य देणारे होते. त्यामुळे घरातून त्यांना पाठिंबा मिळाला आणि शैक्षणिक क्षेत्रात त्या एक एक पदवी संपादन करू लागल्या. एसएनडीटी मुंबई महाविद्यालयातून ‘बी.एड’ केले.

सुप्रिया यांनादेखील शिक्षणांची खूप आवड असल्याने त्यांनी लग्नानंतर ‘बी.एड’, ‘एम.एड.डी’, ‘एस.एम’ व ‘पीएच.डी’पर्यंतचा शैक्षणिक प्रवास केला. सुप्रिया यांच्या आई सुगंधा या गृहिणी असल्या तरी त्यांनी सुप्रियासह चार भावंडांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुप्रिया या २००० साली पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. पण त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी शिक्षिका पेशात यावे अशी होती. त्यांना ही शिक्षिका पेशाची आवड होतीच . त्यामुळे पोलीस भरतीत निवड होऊन ही त्यांनी शिक्षिका पेशाची निवड केली. सुप्रिया लहानपणापासूनच स्पोर्ट्समध्ये सक्रिय होत्या. अनेक पारितोषिकांवर त्यांनी आपले नाव ही कोरले आहे. त्यांचा हा वारसा त्यांची कन्या आस्था चालवित आहे.

सुप्रिया सध्या आगरी युथ फोरम संचालित ग्लोबल कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅड कॉमर्स येथे मागील १४ वर्षांपासून प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. मुंबई बोर्डमध्ये ग्लोबल महाविद्यालयाचा गेल्या सात वर्षांपासून १०० टक्के निकाल लागत आहे. त्यात आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे आणि इतर पदाधिकारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे सुप्रिया सांगतात. ‘द रॉयल प्रेझेंट’ यांच्यातर्फे नुकताच पुण्यात देण्यात आलेल्या ‘इंडिया स्टार गौरव’ पुरस्काराने डोंबिवलीतील प्राध्यापिका सुप्रिया प्रकाश नायकर यांना सन्मानित करण्यात आले. यासाठी पुणे, अमरावती, मुंबई, नाशिक, चंद्रपूर अशा अनेक ठिकाणांवरून आलेल्या व्यक्तींमध्येसुप्रिया यादेखील एक होत्या. पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात त्यांना आदर्श प्राध्यापिका म्हणून गौरविण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, मालिका फेम जान्हवी किल्लेकर आणि भागवत ज्ञानेश्वर माऊली ग्रुपचे नितीन झगरे यांच्या उपस्थितीत सुप्रिया यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळेच अभ्यासाव्यतिरिक्त ही आपण मुलांना खूप चांगल्या गोष्टी देऊ शकतो व त्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, डोंबिवली शाखेमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच शनिवार आणि रविवार या दिवशी जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना शिकविण्याचे काम त्या करतात. त्यांचे चार राष्ट्रीय व पाच आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर ही ‘पब्लिश’ झाले आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी ‘रोटरी क्लब ऑफ सौदामिनी’च्या सदस्य झाल्या. आता ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून त्या सामाजिक कार्य करीत आहे. सुप्रिया यांच्या वक्तृत्वाला ‘आगरी युथ फोरम’मुळे आयाम मिळाला. आपण ही चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन करू शकतो याची त्यांना जाणीव झाली आणि मग ‘आगरी युथ फोरम’तर्फे भरविण्यात येणारा आगरी महोत्सव असो किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यामध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी अनेकदा लिलया पेलली आहे.

२०१७ मध्ये महिलांच्या सॅनिटरी लोगोच्या संबंधित असलेल्या ‘आशियाई बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या नावाची ही नोंद आहे. वेधतर्फे देहराडून येथे झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले आहे. लोकनृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना दीपाली काळे यांनीच प्रोत्साहित केले. त्या सध्या डोंबिवलीतील सुष्मिता ताह्मणकर यांच्याकडे लोकनृत्याचे धडे गिरवत आहे. यापूर्वी त्यांनी पुण्यातील टिळक विद्यापीठातून लोकनृत्याचा अभ्यासक्रम प्रथम क्रमांकानी पूर्ण केला आहे. सुप्रिया यांच्या कन्या आस्था हीदेखील उत्तम स्केटर आहे. त्या व्यतिरिक्त तिला शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यांची ही आवड आहे. त्यांच्या पाच परीक्षा ती उत्तीर्ण झाली आहे. याशिवाय ती एक उत्तम चित्रकार ही आहे. स्वत:च्या अनेक जबाबदारी सांभाळत सुप्रिया आस्थाची आवड जोपासण्यासाठी देखील वेळ देत आहे.

शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक वस्तूंच्या स्पर्धेमध्ये ही सुप्रिया यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०१९ ला पुणे येथे झालेल्या ‘मिसेस महाराष्ट्र स्पर्धे’मध्ये ही त्या विजयी ठरल्या आहेत. दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये ही त्यांनी प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. १९९९ रोजी झालेल्या रिऍलिटी शो ‘सोनी’ टीव्हीचा ‘बुगी वुगी’ यामध्ये ही त्यांच्या गऴ्यात विजेत्या पदांची माळ पडली आहे. ठाणे मुख्याध्यापक संघाने २०१८ मध्ये त्यांना ‘आदर्श मुख्याध्यापक’ म्हणून गौरविले आहे. राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे, अशा या हरहुन्नर प्राध्यापिकेला त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
Powered By Sangraha 9.0