सुहास जोशी : मराठी चित्रपटसृष्टीचा उल्हास!

    01-Dec-2023
Total Views |
Talk With Veteran Actress Suhas Joshi

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा-2’ हा चित्रपट दि. 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सुहास जोशी यांनी साकारलेली इंदु ही व्यक्तिरेखा अगदी सगळ्यांच्या पसंतीस उतरलेली दिसते. त्यानिमित्ताने सुहास जोशी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी मनमोकळा संवाद साधला. चित्रपट-नाटकांच्या जुन्या आठवणी, प्रेक्षकांची मानसिकता आणि मराठी चित्रपटसृष्टीविषयी सुहास जोशी यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचित...

मराठी चित्रपटसृष्टीत 60-70 च्या दशकापासून ते आता 21व्या शतकापर्यंत विविधांगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची भुरळ ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी रसिक प्रेक्षकांवर घातली. आपल्या अभिनयाची कारकिर्द सुहास जोशी यांनी विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित ‘बॅरिस्टर’ या नाटकातून 1972 मध्ये सुरू केली. त्यानंतर सुहास जोशी यांनी मागे वळून न पाहता, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
 
मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खर्‍या अर्थाने आशादायी म्हणावे लागेल. वर्षाच्या प्रारंभीच मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या रितेश जोशी यांनी ‘वेड’ हा चित्रपट आणला आणि बॉक्स ऑफिसवर इतर भाषिक चित्रपटांच्या तोडीस तोड कमाईदेखील केली. त्यानंतर ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’, ‘बॉईज 4’, ‘आत्मपॅम्फलेट’ अशा अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई तर केलीच, शिवाय काही चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा फडकवला. दिवसागणिक बदलत चाललेल्या या मराठी चित्रपटसृष्टीबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी त्यांची मते दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना मांडली.

यावेळी त्या म्हणाल्या की, “बदलती चित्रपटसृष्टी नक्कीच आशादायक आहे. मराठी चित्रपटसृष्टीत जी जुनी परंपरा आहे ती म्हणजे उत्कृष्ट कथा. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचा भक्कम पाया म्हणजे कथानक आहे. मला याप्रसंगी माझ्या बालपणीची एक आठवण सांगावीशी वाटते. कोणताही चित्रपट आम्ही पाहून आलो की, त्या चित्रपटाची कथा आम्ही मैत्रिणी, बहिणी एकमेकींना सांगायचो. त्याचं कारण असं की, ज्यांनी तो चित्रपट पाहिला नसेल, त्यांना अगदी चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून त्याची कथा सांगण्याची आम्हाला आवड असायची. पण, आताच्या बदलत्या आणि धावत्या जगात कुणाकडे बसून चित्रपटाची गोष्ट सांगण्यास वेळ असेल असं वाटत नाही. त्यामुळे आता प्रेक्षक कथा, कलाकार की पात्र पाहतात हा प्रश्न आहे. पण, याची प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगळी उत्तरे नक्कीच असतील.”

पुढे त्या म्हणाल्या की, “नाटकांमध्ये काम करत असताना एक गोष्ट मी प्रामुख्याने शिकले ती म्हणजे, समजा एक हजार प्रेक्षक माझं नाटक पाहणार असतील, तर त्यातील समजा 100 जणांना जरी नाटक आवडलं, तरी उर्वरित 900 जणांना ते आवडणार नाही. त्यामुळे त्याची माझी मनाची जबाबदारी असणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रेक्षकांनी चित्रपट आनंदाने पाहिला म्हणजे नेमकी काय केलं? आम्हाला हसू आलं, रडू आलं या प्रतिक्रियांना आमची जुनी पिढी ‘चित्रपटाचा आनंद घेतला’ असं म्हणत नाही, तर आम्ही नाटकाच्या बाबतीत जे शास्त्र शिकलो त्यात नऊ रस आहेत. त्यामुळे ज्यावेळी प्रेक्षक या नवरसांचा पुरेपूर आनंद घेतात, त्यावेळी संपूर्ण चित्रपट त्यांना आवडला हे सिद्ध होते.”

सुहास जोशी यावेळी बोलताना जुन्या आठवणीत रमल्या. जुन्या नाटकांच्या आठवणींना उजाळादेताना त्या म्हणाल्या की, “ ‘आनंदी गोपाळ’, ‘बॅरिस्टर’ अशा गाजलेल्या नाटकांना धो-धो पाऊस पडूनही प्रेक्षक भिजत अगदी हातात रुमाल घेऊन चक्क रडण्यासाठी आले आहेत. त्यामुळे कुठेतरी आता तसा प्रेक्षक उरला नाही याची खंत वाटते,” असे सुहास जोशी यांनी म्हटले.

अलीकडच्या काळात वाढलेल्या तंत्रज्ञानातील आधुनिकतेमुळे चित्रपटांचे प्रमोशन फार जोरात केले जाते. ‘झिम्मा 2’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुहास जोशी प्रमोशनचा भाग झाल्या. याबद्दल अधिक बोलताना त्या म्हणाल्या की, “नव्या काळात प्रमोशनचा भाग होण्याची उत्सुकता होती. कारण, पुन्हा आम्ही ‘झिम्मा’तल्या मैत्रिणी एकत्र भेटणार होतो आणि यापूर्वी कधीच चित्रपट नेमका प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचतो हे अनुभवले नसल्यामुळे ते ‘याची देही याची डोळा’देखील पाहायचे होते,” असे सुहास जोशी यावेळी म्हणाल्या.