नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) देशाच्या जीडीपीची वाढ ७.६ टक्के इतकी राहिली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा हा वेग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. आरबीआयने दुसऱ्या तिमाहीसाठी ६.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज बांधला होता. पण उत्पादन, बांधकाम या क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या तिमाहीमध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वाधिक १३.९ टक्के वाढ झाली आहे. तर बांधकाम क्षेत्रात १३.३ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाणारे सेवा क्षेत्रामध्ये अद्याप तेजी आलेली नाही.
बांधकाम क्षेत्रातील मजबूत वाढीमध्ये केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांचा मोठा वाटा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता. चालू आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेचा ६.५ टक्के विकास दराचा अंदाज गाठण्यासाठी दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेला ५.३ टक्के दराने विकास करावा लागेल. आरबीआयने तिसऱ्या तिमाहीत ६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.७ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या या उत्साहवर्धक आकडेवारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा 'एक्स'वर पोस्ट आनंद व्यक्त केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे जागतिक स्तरावर अशा कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि ताकद दर्शवतात. अधिक संधी निर्माण करून, गरिबीचे जलद निर्मूलन आणि आमच्या लोकांसाठी ‘जीवन सुलभता’ सुधारून जलद वाढ सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."