मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी आढळणाऱ्या निळ्या शेवाळाचे स्ट्रेन्स बुधवार दि. ८ नोव्हेंबर रोजी वांद्रा येथे अभ्यासकांना दिसुन आले आहेत. रात्री चमकणारा हा शेवाळाचा प्रकार असुन शक्यतो सूक्ष्मदर्शक (microscope) खालीच बघावा लागतो. मात्र, डोळ्यांना दिसतील असे स्ट्रेन्स वांद्रा येथे आढळले असुन अशा प्रकारचे स्ट्रेन्स भारतातुन पहिल्यांदाच मिळाल्याचे सांगितले जात आहे.
जगभरात अनेक प्रकारची शेवाळे असुन शेवाळाचा हा प्रकार ही जगात सर्वत्र आढळतो. महाराष्ट्रात ही विविध ठिकाणी आढळत असुन कोकण किनारपट्टीवरील मालवण, दिवेआगर, मुरूड तसेच, जुहू, वांद्रा अशा अनेक किनाऱ्यांवर ते आढळतात. १९९५ पर्यंत हे शेवाळ रात्री चमकते यावर कुणाचाही विश्वास नव्हता. मात्र, त्यानंतर संशोधन आणि लोकांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिल्यामुळे यावर त्यांचा विश्वास बसु लागला. वांद्र्यातील कार्टर रोड येथे या शेवाळाचे स्ट्रेन्स म्हणजेच तंतु सापडले असुन त्याचे नमुने गोळा करुन त्याचे सुक्ष्मदर्शकाखाली निरिक्षण करता येईल. तसेच, त्यावर अभ्यास आणि संशोधन करता येईल असा विश्वास शेवाळ अभ्यासक आणि प्रथमदर्शक राज राजाध्यक्ष यांनी मुंबई तरुण भारतशी व्यक्त केला.
“या शेवाळाचे तंतु मिळाले त्यामुळे त्याचे संशोधन करणे सुलभ होऊ शकेल. शेवाळ या विषयावर एकुणच फार कमी प्रमाणात संशोधन झालेले पहायला मिळते. यानिमित्ताने हे दुर्मिळ तंतु भारतातुन पहिल्यांदाच मिळाले असुन त्याचा उपयोग करुन संशोधन करायला हवे.”
- राज राजाध्यक्ष
शेवाळ अभ्यासक