नितीश कुमारांचा गेम I.N.D.I.A. आघाडीनचं केलायं?

09 Nov 2023 17:53:48
 nitish kumar
 
तारीख होती २३ जून, स्थळ बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान. मुख्यमंत्री नितिश कुमारांच्या घरात सकाळपासूनच लगबग सुरु होती. त्याला कारणही खास, नितीश कुमार यांच्या घरी देशभरातील १५ विरोधी पक्षातील नेते येणार होते. यात राहुल गांधी, मलिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल, ममता बनर्जी आणखी बऱ्याच नेत्यांचा समावेश होता. येण्याच कारणं होत, देशपातळीवर विरोधकांची आघाडी. ही आघाडी घडवून आणण्यासाठी हातपाय अर्थातच नितीश कुमारांनी मारले होते. यामुळे प्रभावित झालेल्या काही तथाकथीत राजकीय जाणकारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना भावी पंतप्रधानही घोषीत केलं. पण आज नितीश कुमारांची स्थिती पार उलटी झालीये.
 
नितीश कुमार सध्या चर्चेत असण्याचं कारणं तर तुम्हाला माहितचं असेल, त्यावर न बोलेलच बरं. एका राज्याचा मुख्यमंत्री विधानसभेत उभं राहुन ज्या प्रकारे इशारे आणि वक्तव्य करतो. हे पूर्ण राज्याला बदनाम करण्यासारखे आहे. पण आता त्यावर चर्चा करुन काहीही फायदा नाही.
 
पाटणा बैठकीनंतर नितीश कुमार भाजप विरोधकांसाठी देवदूत बनले होते. स्वत: नितीश कुमारांना सुद्धा पंतप्रधान पदाची स्वप्न पडत होती. पाटणातील बैठकीनंतर नितीश कुमारांना इंडीया आघाडीच्या संयोजक पदाची जबाबदारी मिळेल, अशी आशा त्यांना होती. पण संयोजक पद तर सोडा नितीश कुमारांना इंडीया आघाडीने समन्वय समितीमध्ये सुद्धा स्थान दिले नाही. याची नाराजी ते राहून राहून व्यक्त करतात.
 
काही दिवसांपूर्वीच ते म्हणाले होते, "इंडीया आघाडीचे काम बंद पडले आहे. काँग्रेसला इंडीया आघाडीपेक्षा राज्यांच्या निवडणूकांमध्ये रस आहे." पण नितीश कुमारांच्या या नाराजीला इंडीया आघाडीतील कोणीही महत्व देत नाही. बिहारमध्ये सुद्धा त्यांची हालत खस्ता झाली आहे. लालू यादव यांनी नितीश कुमार यांच्यासोबत आघाडी करण्याच्या आधीच, २०२४ मध्ये बिहारचं मुख्यमंत्री पद तेजस्वी यादव यांना देण्याचं मान्य केलं होतं. असे रिपोर्ट त्यावेळी अनेक वृत्तपत्रात आले होते. पण देशाच्या राजकारणात कोणीचं विचारत नसल्यामुळे नितीश कुमारांना बिहार सोडवत नाहीये.
 
त्यामुळे लालू आणि नितीश यांच्या पक्षांमध्ये वाद सुरु झालेत. नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पद तेजस्वी यादव यांना न दिल्यास बिहारमधील हे महागठबंधन तुटण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नितीश कुमारांचे स्वत:च्या राज्यातील अस्तित्व सुद्धा संपुष्टात येईल.
 
बिहारमध्ये तसही नितीश कुमारांना सत्तेत टिकून राहण्यासाठी कोणाची तरी गरज लागतेच. २०२० च्या निवडणूकीतच बघा, बिहारमधील २४३ आमदारांपैकी नितीश कुमार यांच्या पक्षाचे अवघे ४५ आमदार निवडून आले. तेही भाजपसोबत युतीत असताना. २०१४ मध्ये एकट्याने लोकसभा निवडणूक लढणाऱ्या नितीश कुमारांना एकही जागा मिळवता आली नाही. भाजपनं स्पष्ट केलयं की, नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा आघाडी केली जाणार नाही. तर आरजेडीसोबत त्यांना राहायचं असल्यास मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागणार आहे.
 
यामुळेच की काय नितीश कुमाराचं मानसिक संतुलन बिघडत जात आहे, असा आरोप विरोधकांनी केलाय. नितीश कुमारांची मागच्या काही काळातील वर्तणूक पाहिल्यास विरोधकांच्या या आरोपत तथ्य असल्याचे जाणवत आहे. नितीश कुमार मागच्या काही दिवसांपासून गोष्टी विसरत आहेत, असं जाणवतयं. तीन दिवसांपुर्वीचीच गोष्ट आहे, नितीश कुमार आपल्या मंत्र्याच्या वडिलांच्या पुण्यतिथि कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी फोटोला फुलं न वाहता मंत्र्यालाच फुलं वाहिली.
 
नितीश कुमारांचे महिलांच्या विरोधातील अश्लील विधानं असो की, त्यांचा हा विसरभोळे पणा. ही एक गंभीर बाब आहे. बिहारसारख्या महत्त्वपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीनं मानसिक दृष्ट्या सक्षम असणं अत्यंत महत्वाचे आहे.
 
 श्रेयश खरात
 
Powered By Sangraha 9.0