पु ल देशपांडे कला महोत्सवाचे उल्हासात उदघाटन

08 Nov 2023 20:36:19
P L Deshpande Kala Academy Kalotsav

मुंबई :
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमीत्त दरवर्षी सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून कलोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीचा उदघाटन सोहळा दि. ८ नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथील कलांगणात संपन्न झाला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, पु ल देशपांडे कला अकादमीच्या प्रकल्प समन्वयक मीनल जोगळेकर आणि अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य शैलेश चव्हाण सुद्धा उपस्थित होते.

आपल्या प्रस्ताविकात मीनल जोगळेकर म्हणाल्या, "दिवाळीच्या दिवसातल्या या कलोत्सवात वेगवेगळे कला प्रकार आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत. संगीत आणि कलांच्या या पर्वणीचा सर्वांनी आस्वाद घ्यावा." अरुण म्हात्रे मराठीतील कविंच्या योगदानबद्दल सांगताना म्हणाले, "दाद कशी द्यावी पुलं कडून शिकावं. त्यांनी अनेक मैफिली सजवल्या. मराठी साहित्य क्षेत्रात कविता अजून सदाहरीत आहे. या उत्तम कलाकृतीचा आस्वाद घ्या."

विकास खर्गे अकादमीची भूमिका मांडताना म्हणाले, "या अकादमीला आपण पुलंचं नाव दिलं कारण रसिकांना आनंदी ठेवणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यांनी पुरस्कारांना आणि पर्यायाने महाराष्ट्राला मोठं केलं. महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या प्रगत आहेच परंतु त्यासोबत सांस्कृतिक आणि साहित्य विकास व्हायला हवा. यामुळे हॅप्पीनेस इंडेक्स वाढीस लागेल. या संकल्पनेतून ही अकादमी निर्माण झाली. या कलांगणात प्रत्येक आठवड्याला कार्यक्रम व्हायला हवेत. असा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीत सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे ही आमची इच्छा आहे."

जियारत

उदघाटनानंतर कोल्हापूर येथील काफिला संस्थेचा 'जियारत' कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेतील प्रेमसाहित्य आणि त्यातील संगीत अनुभवायला मिळाले.
 
उद्याचे कार्यक्रम

७ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दि. ९ नोव्हेम्बर रोजी एकूण ३ कार्यक्रम सादर होणार आहेत! सकाळी ७ वाजता नव्या मिनी थिएटर मध्ये दिवाळी पाहायचे आयोजन करण्यात आले आहे. पं. डॉ. राम देशपांडे शास्त्रीय संगीताचा 'शतदीप उजळले' हा कार्यक्रम सादर करणार आहेत तर संध्याकाळी कलांगण येथे दोन कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी साडेसहा वाजता ओंकार मध अपंग सामाजिक संस्थ मुंबई तर्फे नेत्रहीन कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. हे कलाकार मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत तर त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी 'संगीत संध्या' हा गायन वंदन आणि नृत्याचा आनंददायी अविष्कार सादर करणार आहेत.
 
Powered By Sangraha 9.0