व्याघ्र संवर्धनात बांगलादेशची सरशी

08 Nov 2023 19:56:30
Bangladesh pioneer in tiger conservation

गोष्ट आहे बांगलादेशमधली, पाच वर्षांपूर्वी जिथे ‘वाघ नाहीसे होतात की काय?’ अशी चिंता भेडसावत होती, तेच सुंदरबन आता वाघांचे नंदनवन झाले आहे. भारत बांगलादेश अशा दोन्ही सीमेवर पसरलेल्या सुंदरबनमधील वाघांची संख्या सकारात्मकरित्या वाढत आहे. २०१० मध्ये, आंतरराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन मंचाने रशियामध्ये एक शिखर परिषद आयोजित केली होती. या देशांनी २०२२ पर्यंत जागतिक वाघांची संख्या दुप्पट करण्याचे वचन दिले होते. १३ देशांमध्ये बांगलादेशचा समावेश होता. शिखर परिषदेतील देशांनी दर चार वर्षांनी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि नेपाळचा व्याघ्र संवर्धनातील यशस्वी प्रयत्न लक्षात घेता बांगलादेशमधील पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता दिसत होती. परंतु, गेल्या पाच वर्षांतील संवर्धन प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढीस लागली आहे. बांगलादेश सरकार आणि विविध भागधारकांच्या पुढाकाराने या मांजरीच्या मावशीची संख्या सातत्याने वाढत आहे. या संयुक्त प्रयत्नांमध्ये वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे, अन्न टंचाईच्या समस्या सोडवणे आणि स्थानिक पातळीवर शिकारी रोखणे यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे केवळ वाघांनाच नव्हे, तर सुंदरबनच्या संपूर्ण परिसंस्थेलाही फायदा झाला आहे.

बांगलादेश सरकारचा वन विभाग, ‘जर्मन कोऑपरेशन आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (IUCN) च्या स्विस युनिटने संयुक्तपणे केलेल्या अलीकडील सर्वेक्षणांमध्ये ‘रॉयल बंगाल’ वाघांच्या संख्येसाठी पोषक असे निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वप्रथम, या सर्वेक्षणांमध्ये सुंदरबनमध्ये ठिपकेदार हरीण, रानडुक्कर आणि माकडे यासारख्या सावज प्राण्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ही विपुल सावज उपलब्धता वाघांच्या वाढीसाठी पोषक आहेत. यातून वाघांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला टिकून राहण्यासाठी पुरेसे खाद्य मिळते. दुसरे, सर्वेक्षण असे सूचित करते की, प्रभावी अधिवास संरक्षण उपायांमुळे जंगलात आता वाघांची संख्या जास्त आहे. या जंगलामध्ये वाघ परत आल्यामुळे सुंदरबनच्या जैवविविधता वाढली आहे आणि पर्यावरणीय समतोलातही राखला जात आहे.
 
वाघांच्या अन्नसाखळीत सहा प्रमुख सावज प्राण्यांचा समावेश आहे. ‘भुंकणार्‍या’ हरणांची संख्या कमी झाली असली तरी, उर्वरित पाच शिकार प्रजातींपैकी तीनच्या संख्येमध्ये गेल्या तीन दशकांत लक्षणीय वाढ झाली आहे. ठिपकेदार हरीण आणि रानडुकरांची संख्या दुप्पट झाली आहे आणि माकडांची संख्याही वाढली आहे. हे प्राणी केवळ वाघांच्या अस्तित्वासाठीच महत्त्वाचे नसून सुंदरबनातील जैवविविधता राखण्यासाठीही ते अविभाज्य घटक आहेत, असे तज्ज्ञांनी ठळकपणे नमूद केले आहे. १९८० च्या दशकात शेवटची गणना झाली. तेव्हा ठिपकेदार हरणांची संख्या सुमारे ८० हजार-८५ हजार होती. बांगलादेशातील सुंदरबनमधील वाघांच्या शिकारीची स्थिती या शीर्षकाच्या सर्वेक्षणात आढळून आले की, वाघांच्या अन्न स्रोतात ७९ टक्के योगदान देणार्‍या या प्राण्याची संख्या १ लाख, ४१ हजार, ३५७ होती. सुंदरबनमधील वाघांचे दुसरे आवडते शिकार म्हणजे रानडुक्कर. वाघांच्या अन्नात सुमारे ११ टक्के योगदान देणारा हा प्राणी, दुपटीने वाढला आहे.

या अभ्यासात, कॅमेरा ट्रॅपिंगचा प्रभावी वापर करण्यात आला. २६०० चौरस किलोमीटर जंगलाच्या पश्चिम झोनमध्ये चार महिने विविध ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. वनविभागातर्फे सुंदरबनमधील वाघांची गणना करण्यात येत आहे. वाघ, हरीण आणि डुकरांची गणना करण्यासाठी सुंदरबनच्या कांदळवनाच्या जंगलात ६६५ ठिकाणी एकूण १ हजार, ३३० कॅमेरे बसवण्यात आले. बसविलेल्या कॅमेर्‍यांपैकी किमान ५३ टक्के कॅमेर्‍यांमध्ये वाघांच्या हालचाली आढळल्या आहेत. प्रत्येक वाघाला वेगळे पट्टे असल्याने त्यांच्या पट्ट्यांवरून अद्वितीय वाघ ओळखले जातील. पण चांगली बातमी अशी आहे की,ज्या ठिकाणी मागील दोन गणनेत वाघांच्या प्रतिमा मिळाल्या नाहीत तिथे यावेळी मिळाल्या आहेत.

बांगलादेश सरकारने २०२० मध्ये एकूण सुंदरबनपैकी ५२ टक्के (६,०१७ चौरस किलोमीटर किंवा २ हजार, ३२३ चौरस मैल) संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले. हे क्षेत्र आधी फक्त २३ टक्के होते. संरक्षित क्षेत्र वाढल्यामुळे, वाघ अबाधित राहिले आणि त्यामुळे वाघांच्या प्रजननासाठी चांगले वातावरण निर्माण झाले. याव्यतिरिक्त, वाघांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने वाघ-मानव संघर्ष कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बांगलादेशी वन अधिकार्‍यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांना सांगितले की, हे सर्वेक्षण एप्रिलमध्ये पूर्ण होईल आणि दि. २९ जुलै, २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनी वाघांची संख्या जाहीर केली जाईल.
Powered By Sangraha 9.0