जंगलाशी जवळचं नातं जोपासलेल्या... चित्रकलेबरोबरच कलेच्या विविध प्रकारांमध्ये हातखंडा असलेला कलेचा उपासक, रत्नागिरी सुपुत्र स्वस्तिक गावडे यांचा हा कला जगतातील प्रवास...
जंगल माझ्या अतिशय जवळचं आहे... पण कलेचं आणि माझं एक वेगळं जग आहे असं सांगणार्या, चित्रकला, रेझिन आर्ट, बॉटल आर्ट, काष्टशिल्प आणि यासारख्या अनेक कला अवगत असणार्या स्वस्तिक गावडे यांचा जन्म रत्नागिरीतील निवळी या गावातला. मुळातच निसर्गसमृद्ध गावामध्ये जन्मलेल्या स्वस्तिक यांची नाळ कला आणि जंगल या दोन्ही गोष्टींशी अगदी घट्ट जोडलेली आहे. त्यांच्या बालमनावर निसर्गाचे संस्कार कोरले गेल्यामुळे निसर्ग अनुभवणं आणि त्याच्या संवर्धनासाठी काम करणं हे त्यांचं भाग्यच असल्याचं ते सांगतात.
बालपणापासूनच अतरंगी आणि करामती स्वभाव असलेल्या स्वस्तिक यांनी त्यांच्या स्वभावामुळे आजवर अनेक माणसं जोडून ठेवली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढे महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत घेतले. बारावीनंतर तेच ते पठडीतले शिक्षण घेण्याऐवजी काहीतरी वेगळं करावं या विचारातून कला क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रांतील संधींची वाट चोखळत असताना त्यांनी फॉरेस्ट्रीच्या कोर्सला प्रवेश घेतला. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातील वनशास्त्र महाविद्यालय दापोली येथे फॉरेस्ट्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी वनविभागाबरोबर तसेच काही संस्थांबरोबर काम केले. सध्या ते महाराष्ट्र कांदळवन कक्षामध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
‘एलिमेंट्री’ आणि ‘इंटरमिजिएट’ या दोन्ही परीक्षा शालेय जीवनात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या स्वस्तिक यांच्या हातात ही कला वडिलांमुळेच आली असं ते सांगतात. वडील ही चित्रकलेत पारंगत असल्यामुळे लहानपणापासूनच स्वस्तिक त्यांच्याबरोबर नाटकांचे सेट, गणपतीचे देखावे या सगळ्याचं काम करायला जात असत. चित्रकलेची आवड तिथेच लागली आणि पुढेही कलेचा हात धरत स्वस्तिक यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. साध्या कॅन्व्हास पेंटिंगबरोबरच स्वस्तिक बॉटल पेंटिंग, बॉटल आर्ट, क्ले मॉडेलिंग, काष्टशिल्प, रेझिन आर्ट, स्टोन आर्ट अशा अनेक कला स्वतःच सरावाने शिकले आहेत. बॉटल आर्ट ही त्यांची विशेष खासियत असून बंद बाटलीमध्ये थ्रीडी स्वरुपात घर, बिल्डिंग, गणपती, नटराज अशा विविध वस्तू तयार करण्याची कला त्यांना अवगत आहे. नुकतेच, रेझिन आर्ट शिकून त्यांनी कांदळवन परिसंस्थेचा एक छोटासा देखावाही तयार केला होता.
लहानपणापासूनच स्वस्तिक लोकगिते, ग्रुप डान्स, रांगोळी स्पर्धा कोलाज पेंटिंग, मेहेंदी अशा बारिक कलाकुसरीच्या कामाबरोबरच व्हॉलीबॉल, खो-खो, बास्केटबॉल अशा क्रीडा स्पर्धांमध्येही सहभाग घेत असत. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय अश्वमेध स्पर्धाही त्यांनी जिंकली आहे. सांस्कृतिक कलाप्रकारांमध्ये सहभाग नोंदवत मयूरपंख ही स्पर्धाही त्यांनी जिंकली आहे. एवढंच नाही, तर थिएटरचीसुद्धा आवड असल्याने माईम, विविध नृत्यप्रकार, एकांकिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. इतक्या कलांमध्ये पारंगत असलेल्या स्वस्तिक यांनी बासरी वादनाचे धडेही घेतले होते. हातात असलेल्या चित्रकलेला कोरोनामध्ये अधिक वाव मिळाला असं ते सांगतात. वेळ बराच मिळाल्यामुळे चित्रकलेवर पुन्हा काम सुरू केले. कपड्यावर हाताने केलेलं पेंटिंग, विविध दगडांच्या आकारावर केलेले पेंटिंग, नारळाच्या करवंटीवर केलेले कलात्मक काम, मास्क पेंटिंग, बॉटल पेंटिंग असे अनेक प्रकार शिकून घेत काम केलं आणि बघता बघता लोकांची या कामाला पसंती मिळू लागली.
निसर्गाच्या जवळ असलेल्या स्वस्तिक यांना वाहून आलेले वेगळी लाकडे, दगड गोटे यांचा संग्रही करण्याचा छंद आहे. त्याला कलात्मक आकार देण्यातही त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदामुळे स्वस्तिक यांचं ’स्व-कलादालन’ ही उभं राहिलं. त्यामार्फत ते आपली कला अनेकांपर्यंत पोहोचवत असून त्यातून खरेदी-विक्री ही करतात. यामध्येच कोरोना काळात त्यांनी स्वतः तयार केलेल्या मास्कला चांगलीच पसंती मिळाली होती. ‘वेस्ट आऊट ऑफ बेस्ट’ ही संकल्पना डोक्यात ठेवून अनेक कलाप्रकारांमध्ये ते अंमलात आणण्याचा ही स्वस्तिक सातत्याने प्रयत्न करतात. त्यांच्या कलेचा समाजातील विविध घटकांना फायदा होतो हे अत्यंत समाधानाने सांगणार्या या कलाकाराला स्वतःची कला गवसणे ही आपली पहिली ‘अचिव्हमेंट’ वाटते.
आवड असली की, सवड मिळतेच असं सांगत आपल्या कलेवर श्रद्धा असणारे, जंगल आणि कलेशी संवेदनापूर्ण नातं जोपासणारे स्वस्तिक कविता, चारोळ्या, शायरीतूनही व्यक्त होताना दिसतात. निसर्ग संवर्धनाच्या कामात कुठेतरी हातभार लागतोय आणि त्यामुळेच गेली अनेक वर्ष काम करत असून निसर्गही माझं तेवढंच रक्षण करत आलाय असं ते म्हणतात. जंगल आणि कला यांची सांगड घालून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीचे काम करता यावं, अशी स्वस्तिक यांची मनस्वी इच्छा आहे. शेवटी कलात्मक पद्धतीने केलेले प्रबोधन हे अधिक खोलवर पोहोचतं हे मान्य करायलाच हवं. ज्याप्रमाणे कलेला मरण नाही तसे कलाकारालाही मरण नाही असं सांगणार्या, जंगलातील जीवन आणि कलेच्या विश्वातील जीवनानुभवती घेणार्या या सच्च्या कलाकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या रंगमय शुभेच्छा!!