चेन्नई : सत्तेत असलेल्या नेत्यांनी फूट पाडणारी वक्तव्ये करू नयेत, असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने द्रविड विचारधारेविरोधात रॅली आयोजित करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे. तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनला नष्ट करण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
सप्टेंबर महिन्यात मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने मेळाव्यात सनातनविरोधी वक्तव्य केले होते. “अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नष्ट करायच्या आहेत. डास, डेंग्यू ताप, मलेरिया, कोरोना, या सर्व गोष्टी आहेत ज्यांना आपण विरोध करू शकत नाही, त्यामुळे त्यांचा नायनाट करायचा आहे. सनातनही असेच आहे. विरोध करण्याऐवजी सनातनला नष्ट करणे हे आपले पहिले काम असले पाहिजे,” असे वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते.
उदयनिधींच्या या विधानाला देशभरातून जोरदार विरोध झाला होता. याप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला नोटीस बजावत उदयनिधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यास सांगितले होते. दरम्यान, या रॅलीत सनातनविरोधी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई न केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयानेही तामिळनाडू पोलिसांना खडसावले.
लोकांमध्ये फूट पडेल अशा कोणत्याही रॅलीचे आयोजन करू देणार नाही आणि या प्रकरणात न्यायालयाकडून कोणाचीही मदत मिळणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या देशात विविध विचारधारा एकत्र राहत असून हीच भारताची ओळख असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच जे सनातनला संपवण्याची भाषा करत आहेत त्यांनी अमली पदार्थ, भ्रष्टाचार आणि अस्पृश्यता नष्ट करण्याचे काम करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.