अयोध्येमधील यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, हजारो दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण अयोध्यानगरी उजळून निघणार आहे. यासाठी २४ लाख दिवे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या दीपोत्सवात जे रामभक्त आणि अन्य पर्यटक सहभागी होणार आहेत, त्यांना या सर्वांमुळे आनंद प्राप्त होणार आहे. हा दीपोत्सव जागतिक कीर्तीचा ठरावा म्हणून प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
अयोध्येत एकीकडे राम मंदिराचे निर्माण कार्य वेगात सुरू असतानाच, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीनिमित्त अवघी अयोध्या दीपोत्सवात प्रकाशमय होणार आहे. अयोध्यानगरी, शरयू नदीवरील घाट, विविध मंदिरे, अयोध्येतील सर्व मार्ग या दीपोत्सवात उजळून निघणार आहेत. श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासठी दि. २२ जानेवारी, २०२४ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्या पूर्वीची ही अयोध्येतील दिवाळी सर्व देशवासीयांना स्वर्गसुखाचा आनंद देणार आहे. दिवाळीतील हा सातवा वार्षिक दीपोत्सव असून, तो भव्यदिव्य साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची यंत्रणा कामाला लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारचा पर्यटन विभाग परिक्रमेचे जे पंचकोसी, १४ कोसी आणि ८४ कोसी असे जे मार्ग आहेत, ते सर्व मार्ग रोषणाईने उजळून टाकणार आहे. तसेच या सर्व मार्गांवर असलेली मंदिरे, अन्य महत्त्वाची स्थाने यावरही रोषणाई करण्यात येणार आहे. सात लाख दिवे हा सर्व परिक्रमा मार्ग उजळून टाकणार आहेत. यानिमित्ताने रामायणातील बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, सुंदर कांड आदी नऊ कांडांवर आधारित चित्ररथही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच श्रीरामाचा स्वतंत्र रथही या सोहळ्यात असणार आहे.
अयोध्येमधील यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, हजारो दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण अयोध्यानगरी उजळून निघणार आहे. यासाठी २४ लाख दिवे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या दीपोत्सवात जे रामभक्त आणि अन्य पर्यटक सहभागी होणार आहेत, त्यांना या सर्वांमुळे आनंद प्राप्त होणार आहे. हा दीपोत्सव जागतिक कीर्तीचा ठरावा म्हणून प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पुन्हा स्वतिक आणि नाझी चिन्हाची तुलना!
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे नुसतेच चर्चेत नाहीत, तर ते टीकेचे धनी झाले आहेत. आता कॅनडाच्या पंतप्रधानांनी समस्त हिंदू समाजास पवित्र असलेल्या ‘स्वस्तिक’ या चिन्हाची तुलना हिटलरच्या नाझी चिन्हाशी करून भारतीय समाजाची नाराजी ओढवून घेतली आहे. पण, असे असले तरी ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. “आपण जेव्हा तिरस्कार, द्वेष यांचे प्रतीक पाहतो, त्यावेळी त्याचा आपण निषेध करायलाच हवा. एका व्यक्तीने पार्लमेंट हिलवर स्वस्तिक चिन्ह फडकविण्याचा जो प्रकार केला तो निषेधार्ह आहे,” असे कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. हिटलरचे नाझी चिन्ह हे द्वेषाचे प्रतीक होते, तर स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक पवित्र चिन्ह आहे. त्याची तुलना कॅनेडियन पंतप्रधानांनी ‘स्वस्तिक’ या चिन्हाशी करावी याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच!
केवळ कॅनडाच्या पंतप्रधानांनी अशी हेटाळणीची भाषा वापरली असे नाही. युरोपमधील अनेक देश ‘स्वस्तिक’ चिन्ह हे द्वेषाचे प्रतीक असल्याचे मानतात. अनेक युरोपियन देशांमध्ये स्वस्तिक याचा अर्थ नाझी जर्मनीचे चिन्ह असल्याचे शाळांमधून शिकविले जाते. हे हिंदू धर्मातील पवित्र चिन्ह असल्याचे त्या देशांकडून शिकवलेच जात नाही. गेल्या महिन्यात फिनलंड हवाई दलाने १०२ वर्षांपासून चालत आलेले आपले ‘स्वस्तिक’ चिन्ह वगळून टाकले. ‘स्वस्तिक’ चिन्हाचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात पाणिनी ऋषींच्या अष्टाध्यायीमध्ये आढळतो. ‘स्वस्तिक’ चिन्ह हे ऋग्वेदातील ‘आनो भद्रा कृत्वो यन्तु विश्वतः’ याचे प्रातिनिधिक प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ उदात्त विचार सर्व दिशांनी माझ्याकडे येवोत, असे असताना हिंदूंच्या पवित्र ‘स्वस्तिक’चिन्हाचा पाश्चात्य लोकांनी द्वेष करण्याचे काहीच कारण नाही. कॅनडाचे पंतप्रधान ‘स्वस्तिक’ चिन्हाचा इतिहास आणि त्या चिन्हाचे हिंदू धर्मात असलेले महत्त्वाचे स्थान लक्षात घेतील काय?
उत्तर प्रदेशातील ४४ हजार रस्ते खड्डेमुक्त!
उत्तर प्रदेशमधील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून ४४ हजार रस्ते हे खड्डेमुक्त आहेत, असे त्या सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश हे राज्य उत्तम प्रदेश बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले पाहिजे. राज्यातील रस्त्यांचे जाळे उत्तम करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. त्याची याप्रकारे पूर्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने २०२३-२४च्या आर्थिक वर्षामध्ये ४४ हजार रस्ते खड्डेमुक्त करण्याचे लक्ष्य पूर्ण केले. या रस्ते चांगले करण्याच्या कार्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासमवेत अन्य म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, मंडी परिषद, नगर विकास, ग्रामीण विकास अशा एकूण दहा विभागांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. राज्याच्या प्रगतीसाठी पायभूत सुविधा या चांगल्या असल्या पाहिजेत, यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भर दिल्याने हे लक्ष्य गाठणे सहज शक्य झाले. २०२३ -२४ या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत ५१ हजार रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार त्या सरकारने केला आहे. तसेच आणखी ३४ हजार रस्ते नव्याने उभारण्याचे त्या सरकारने ठरविले आहे. ही आकडेवारी एकत्रित करता ८५ हजार रस्ते चांगले करण्याचा निश्चय त्या सरकारने केला आहे. चांगले काम करून दाखविण्याचा निर्धार असला की काय केले जाऊ शकते, हे उत्तर प्रदेश सरकारने या उदाहरणावरून दाखवून दिले आहे.
आंध्र प्रदेशात घरवापसी!
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील हनिमीरेड्डी या खेडेगावातील १८ कुटुंबानी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. ही १८ कुटुंबे ख्रिस्ती तसेच हरिजन होती. ‘ग्लोबल हिंदू हेरिटेज फाऊंडेशन’ आणि ‘सेव्ह टेम्प्ल्स’ या संस्थांनी या ‘घरवापसी’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वीर ब्रह्मा मंदिरात विविध प्रकारचे होम आणि मंदिरातील मुख्य देवतेस अभिषेक करून या सर्वांनी सनातन धर्मात पुन्हा प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष देवराज आणि ‘समरसता फाऊंडेशन’चे सचिव रेड्डी यांनी पूर्णाहुती कार्यक्रमात भाग घेतला. या १८ कुटुंबातील ४० लोकांनी पुन्हा सनातन धर्म स्वीकारला. या ‘घरवापसी’ कार्यक्रमास ४०० ते ५०० लोक उपस्थित होते. ‘घरवापसी’ कार्यक्रम योजण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सनातन धर्माचे महत्त्व ख्रिस्ती झालेल्यांना पटवून दिले. तसेच सनातन धर्म कसा उच्च विचारांचा आहे, हे लोकांना पटवून दिले. त्यांनी जे परिश्रम घेतले त्याचे फलित म्हणजे हा ‘घर वापसी’ कार्यक्रम.
दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने दलित ख्रिस्तींना मागास जातीचा दर्जा देण्याचा आणि बोया व वाल्मिकी समाजाचा अंतर्भाव मागास जमातींमध्ये करण्याबाबतचे जे दोन प्रस्ताव संमत केले, त्यास विश्व हिंदू परिषदेने तीव्र आक्षेप घेतला आहे. जे ख्रिस्ती झाले आहेत, त्यांना मागास जातीचा दर्जा देता कामा नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. मागास जातींमधील लोक अनेक वर्षांपासून वंचित राहिले आहेत. पण, ख्रिस्ती धर्म जात मानत नसल्याने अशा प्रकारचा दर्जा देता कामा नये, असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. धर्मांतरित झालेल्यांना मागास जातीचे अधिकार बळकविण्यास अनुमती दिली जाऊ शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
९८६९०२०७३२