मुझफ्फरनगरमधील एका महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींनी बुरखा घालून नुकताच रॅम्प वॉक केला म्हणून, ‘जमियत-ए-उलेमा’चे मौलाना मुर्करम कासमी म्हणाले की, “त्यांनी मुसलमानांच्या भावना भडकावल्या आहेत. बुरखा हे कोणत्याही फॅशन शोचा हिस्सा असूच शकत नाही.“ चांगल्या घरच्या मुस्लीम मुलींनी पूर्ण पोषाखात रॅम्प वॉकही करायचे नाही, असे म्हणणारे लोक या समाजात आहेत. मात्र, पॉर्न स्टार मिया खलिफा हिने पॅलेस्टाईनचे समर्थन केले, म्हणून तिला पायघड्या घालणारेही याच समाजातले लोक आहेत. याला काय म्हणावे? मुलींनी केस झाकावेत, भुवया कोरू नयेत, शरीरावरचे केस काढू नयेत वगैरे नियमही आहेतच. पण, भारतात ब्युटी सलून कुणाचे आहेत, याचा मागोवा घेतला तर? या उद्योगात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात आहेत. हा सगळा दुटप्पीपणा कशासाठी?अर्थात, मुस्लीम मुलींनासुद्धा मन असते आणि त्यांनाही वाटते की आधुनिक जगाचे आपणही भागीदार व्हावे. परंपरेचा आणि त्यातही धर्माचा अतिपगडा असल्याने त्या त्यांच्या रितीरिवाजानुसार जगतात. अगदी तिहेरी तलाक, बहुविवाह पद्धती यांचेही समर्थन करताना, अनेक जणींना पाहिले आहे. त्यांच्या मनात त्यांच्या रुढी-परंपरा रूजलेल्या असतात. या दृष्टिकोनातून बुरखा घालून रॅम्प शोचा पर्याय निवडणार्या मुलींची मानसिकता पाहायला हवी. मात्र, आपल्या धर्मभगिनी परंपरा जपतात, याचे कौतुक कासमींना नाही. उलट त्या निरूपद्रवी घटनेला त्यांनी धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला. ही मानसिकता सोशल मीडियावरही दिसते.सोशल मीडियावर एखादी मुस्लीम महिला बुरखा घालून नृत्य करत असेल, गाणी म्हणत असेल, नुसतेच हातवार्याचे अभिनय जरी करत असेल, तरी मुस्लीम पुरूष सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचक धमकी देतात की, बुरखा घालून पोस्ट बनवू नकोस. पण, बुरखा न घालता एखाद्या मुस्लीम महिलेने जरी एखादी पोस्ट सोशल मीडियावर टाकली तर तिलासुद्धा सूचक धमकी दिली जातेच की, ’अल्ला हिसाब करणार, तू अल्ला अल्ला न करता, नमाजमध्ये वेळ न घालवता अशा पोस्ट बनवतेस, तर तुला जहन्नुम मिळेल.’ असो. बुरखा घालून रॅम्प शो करणार्या मुलींच्याबाबत सहानुभूती आहे. कारण, आपल्या मनासारखं जगण्यासाठी त्यांनी कसा का होईना प्रयत्न केला आहे. संविधानाने दिलेली मानवी मूल्ये, अधिकार त्यांना पूर्णतः प्राप्त होवोत, हीच शुभेच्छा!
मनी नाही भाव आणि...
आदित्य ठाकरे यमुनातीरी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी गेले. यात विशेष काय? तर काही लोकांना मागील एक घटना आठवते. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि ते सहकुटुंब सहपरिवार पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा आदित्यही होते. मात्र, मंदिरात त्यांना अस्वस्थ वाटले आणि ते बाहेर आले. त्यानंतर सत्ता गेली. आता मात्र महाराष्ट्रातातच नव्हे, तर देशभरातल्या कोणत्याही मंदिरामध्ये ते जातात.असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देवधर्म जपतात, मंदिरात भक्तिभावाने जातात. त्यामुळे त्यांची नक्कल करण्यासाठी विरोधी पक्षातले अनेक छोटे-मोठे नेते मंदिरात जाऊ लागले आहेत. विरोधी पक्षातले नेते हिंदूंची प्रमुख श्रद्धास्थाने, देवस्थाने निवडतात. तिथे चेल्याचपाट्यांसकट दौरा करतात आणि त्याच्या बातम्या २४ तास प्रसारमाध्यमांत दाखवतात. असे करून ते जनतेसमोर प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की, ते खूपच हिंदुत्ववादी वगैरे आहेत. अर्थात, या विरोधी पक्षातील छोट्या-मोठ्या नेत्यांना आता पर्यायच नाही म्हणा. मतांच्या स्वार्थातून पाहायचे, तर हिंदू मनाला रिझवण्यासाठी धार्मिकतेचे ढोंग अनेक जण करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी आहेतच. तामिळनाडूमध्ये येशूशिवाय दुसरे कुणी नाही, असा संवाद करणारे राहुल दर्ग्यात अगदी टोपी आणि हिरवी शाल पांघरून नमाजचा आविर्भावही उत्तम प्रकारे आणतात.इतकेच काय, तर जानवं दाखवून ते काश्मिरी ब्राह्मण वगैरे आहेत, असेही छातीठोकपणे सांगतात. कारण, भाजपने रामजन्मभूमीचा प्रश्न मार्गी लावला. शेकडो वर्षांचे हिंदू मनाचे स्वप्न पूर्ण झाले. ’अयोध्या तो झाकी हैं मथुरा अभी बाकी हैं’ असेही अनेक धार्मिक म्हणतात. हिंदू विचारधारेच्या अनेक समविचारी संघटना काशिविश्वेश्वर आणि श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत अत्यंत संवेदनशील आहेत. देशात कधी नव्हे ते हिंदू समाजमन राजकीयदृष्ट्या जागृत झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळेच काही लोकांचे म्हणणे आहे की, विरोधी पक्षाचे नेते त्यात राहुल गांधींसह आदित्य ठाकरेही पुन्हा सत्ता यावी म्हणून मंदिरांचे दौरे करत आहेत. यानिमित्ताने मात्र-मनी नाही भाव देवा मला पाव, जनतेत नाही मान, देव कसे देईल सत्तेचे दान!