काळा समुद्र पेटणार का?

03 Nov 2023 20:26:36
Russia Ukraine War Situation And Erdogan Stand

रशिया लगेच युक्रेनची मालवाहू जहाजं बुडवायला सुरुवात करेल का? याला उत्तर म्हणून युक्रेन रशियाची जहाजं की, विशेषतः सीरियन एक्सप्रेस बंद पाडू शकेल का आणि सर्वात महत्त्वाचे म्हणने एर्दोगान काय भूमिका घेतील?

आपल्या कोकणातल्या रत्नागिरी शहरात दोन समुद्र आहेत. एक काळा समुद्र आणि दुसरा पांढरा समुद्र. ‘आमच्या पोपटाला किंवा कुत्र्याला आम्ही बोललेलं सगळं समजतं,’ असा दावा करणार्‍या पु. ल. देशपांड्यांच्या विशाल महिला मंडळाप्रमाणेच, या दोन्ही समुद्रांचं पाणी खरोखरच काळं आणि पांढरं दिसतं, असं काही लोक छातीठोकपणे सांगतात. मला स्वतःला तसं आढळलेलं नाही. उलट सागरी तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, एकाच समुद्राचं पाणी हे भरती, ओहोटी, सकाळ, दुपार, संध्याकाळ, वादळी वारे, वसंत किंवा शरद ऋतू अशा विविध कारणांमुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रंगाचं दिसतं किंवा भासतं. एक मात्र नक्की की, रत्नागिरीच्या काळ्या समुद्राची वाळू काळी, तर पांढर्‍या समुद्राची वाळू पांढरी आहे. हा निसर्गाचा चमत्कारच आहे.

पण, आपल्याला आता रत्नागिरीच्या काळ्या समुद्राबद्दल नव्हे, तर युरोप खंड आणि आशिया खंड यांच्या सरहद्दीवर उभ्या असलेल्या काळ्या समुद्राबद्दल बोलायचं आहे. जगात आज पाच महासागर मानले जातात-पॅसिफिक, अ‍ॅटलांटिक, हिंदी, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक. त्यानंतर येतो भूमध्य समुद्र आणि मग तांबडा समुद्र, काळा समुद्र, बाल्टिक समुद्र आणि कॅस्पियन समुद्र. आता या महासागरांना आणि समुद्रांना ही नावे कुणी दिली? तर अर्थातच युरोपीय दर्यावर्दींनी दिली. डॉम हेन्रिक किंवा ‘प्रिन्स हेन्री दि नेव्हिगेटर’ या नावाने ओळखला जाणारा पोर्तुगालचा राजपुत्र हेन्री हा फार हुशार होता. (जन्म-१३९४, मृत्यू-१४६०), त्याने नौकानयन शास्त्रात अनेक नवनवीन प्रयोग केले, शोध लावले, नव्या वाटा शोधण्यास लोकांना उद्युक्त केलं. त्यातूनच कोलंबस, वास्को-द-गामा आणि इतर अनेक दर्यावर्दी जग शोधण्यासाठी, जिंकण्यासाठी, लुटण्यासाठी नि बाटवून ख्रिश्चन बनवण्यासाठी बाहेर पडले. आधुनिक नौकानयन शास्त्र माप लोकांच्या खांद्यावर उभं आहे.

तर या लोकांनी होकायंत्राच्या चार दिशांचे चार रंग ठरवून टाकले. उत्तरेचा रंग काळा, दक्षिणेचा तांबडा, पूर्वेचा निळा आणि पश्चिमेचा पांढरा. जगाच्या नकाशात युरोप खंड मध्यभागी धरायचं, असं त्यांनी ठरवलं. का म्हणून? कारण काही नाही. आम्ही नकाशे बनवले म्हणून आमचं खंड मध्यवर्ती! मग युरोप खंडाच्या उत्तरेचा समुद्र म्हणून तो काळा समुद्र आणि दक्षिणेला समुद्र तो तांबडा समुद्र! पण, मग पूर्वेचा अरबी समुद्र हा नील समुद्र का नाही आणि पश्चिमेचा भूमध्य समुद्र हा श्वेत समुद्र का नाही?

या प्रश्नांना काहीही तर्कशुद्ध उत्तरं नाहीत किंवा असलीच, तर युरोपीय विद्वानांना ती तुम्हाला सांगायची नाहीत. कारण, असे पाहा की, युरोपचं सगळं आधुनिक चिंतन हे रोमन किंवा ग्रीक चिंतनावर आधारित आहे. आता प्राचीन रोमन आणि ग्रीक लोक म्हणतात की, ‘आम्हाला बीजगणित, खगोलशास्त्र इत्यादी विद्या अरबांकडून मिळाल्या.’ अरबांकडून म्हणजे इस्लामपूर्व अरबांकडून आणि हे इस्लामपूर्व प्राचीन अरब म्हणतात की, ’आम्हाला या विद्या प्राचीन हिंदूंकडून मिळाल्या.’ म्हणजे हे प्रकरण कुठवर गेलं पाहा. कॅप्टन जॉन हॅनिंग स्पीक हा एक इंग्रज लष्करी अधिकारी. त्याला बनारसच्या एका प्राचीन संस्कृत शैव ग्रंथात माहिती सापडली की, भारताच्या नैऋत्य दिशेला अपराक् (आफ्रिका) नावाचं मोठं द्वीप असून, तिथल्या एका अतिविशाल सरोवरातून नील नावाची एक महानदी उगम पावते.

कॅप्टन स्पीकने द्वीप म्हणजेच आफ्रिका खंडात जाऊन ते सरोवर आणि ती नदी शोधून काढली. त्याच्या मायदेशाने झटपट या सरोवराला ‘लेक व्हिक्टोरिया’ आणि नील नदीला ‘नाईल’ असं नाव देऊन टाकलं. अपराक द्वीप, नील नदी, शैव पुराण वगैरे विषय दाबून टाकण्यात आले. न्यूनगंडाने पछाडलेल्या हिंदूंना शेंडी लावणं अगदीच सोपं काम! असो. तर इराणचे आखात, एडनचं आखात, तांबडा समुद्र, भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारं सुवेझचं आखात,सुवेझ कालवा इत्यादी शब्द अलीकडे वारंवार आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात येतात. कारण, संपूर्ण जगावर ज्या वस्तूचा सर्वाधिक प्रभाव आहे, ती वस्तू या सगळ्या समुद्री पट्ट्यात उत्पादीत होते आणि कच्च्या किंवा शुद्ध स्वरुपात खरीदली-विकली जाते. राक्षसी आकाराच्या टँकर्समधून जगभर नेली जाते. ती वस्तू म्हणजे तेल!

तेल हे कितीही महत्त्वाचं असले तरी तेल पिऊन पोट भरत नाही. यासाठी अन्नधान्य लागतं आणि मुख्यतः युरोप खंडाची नि मग अन्य देशांची अन्नधान्याची आयात-निर्यात चालते-ती काळ्या समुद्राद्वारे. युक्रेन हा देश म्हणजे अख्ख्या युरोप खंडाचं गव्हाचं कोठार मानला जातो. युक्रेनमधल्या नीपर नदीच्या खोर्‍यात आणि रशियामधल्या डॉन आणि डॅन्यूब या नद्यांच्या खोर्‍यात अक्षरशः अमर्याद गहू पिकतो. रशियन गहू सॉची बंदरातून आणि युक्रेनियन गहू सोव्होस्तोपोल आणि ओडेसा बंदरांमधून युरोपात सर्वत्र निर्यात होतो. या तीन मोठ्या नद्या आणि या तीन मोठ्या बंदरांसह इतरही अनेक बंदरं ज्याच्या काठावर आहेत-तो सागर म्हणजे काळा समुद्र. सुमारे ४ लाख, ३६ हजार चौरस किमी क्षेत्रफळाचं साधारण बदामाकृती, असं हे सरोवरच बनलं असतं.
 
पण, दक्षिणेकडे बॉस्पोरस सामुद्रधुनी, मार्मारा समुद्र आणि दार्दानेल्स सामुद्रधुनी या तीन कमालीच्या चिंचोळ्या समुद्र गल्ल्यांनी, हा काळा समुद्र भूमध्य समुद्राशी जोडला गेलेला आहे. बॉस्पोरस सामुद्रधुनीवरच कॉन्स्टन्टिनोपल उर्फ इस्तंबूल हे अतिप्राचीन आणि अतिविख्यात शहर उभं आहे. म्हणजे मुळात या सामुद्रधुनीवर पहारा ठेवण्यासाठी एक समुद्री किल्ला उभा राहिला. मग या किल्ल्याभोवती शहर उभं राहिलं. तिथेच आशिया खंड आणि युरोप खंड यांना विभागणारी सांकेतिक रेषा आहे. इस्तंबूल शहराचा तो भाग ‘गोल्डन हॉर्न’ या नावाने ओळखला जातो. तिथे जाऊन आलेले प्रवासी सांगतात की, इस्तंबूलचा युरोपीय भाग एकदम नीटनेटका, रेखीव, टापटिपीचा आहे आणि बॉस्पोरस वरचा पूल ओलांडून तुम्ही आशिया खंडात प्रवेश केलात की, लगेच आजूबाजूचा परिसर बकाल, बेशिस्त दिसतो.

ते कसंही असो. शहर इस्तंबूल आणि भूमध्य समुद्र ते काळा समुद्र हा सगळा परिसर व्यापारीदृष्ट्या आणि आरमारीदृष्ट्या नेहमीच अत्यंत संवेदनशील राहत आलेला आहे. ताज्या युक्रेन-रशिया युद्धातही तो संवेदनशील आहेच. पण, त्याची ही महत्त्वपूर्ण स्थिती रशिया, तुर्कस्तान आणि युक्रेनसह ’नाटो’ संघटनेमधील सगळे सभासद देश यांच्यासाठी अधिकच नाजूक बनत चालली आहे. कशी ते पाहा. युक्रेन-रशिया युद्ध हे आतापर्यंत तरी मुख्यतः लष्कराचे म्हणजे भूदलाचे युद्ध आहे. आरमार किंवा हवाई दल यांचा वाटा अजिबात नाही, असं नव्हे; पण रणगाडे, ट्रक्स, चिलखती वाहने, तोफखाना आणि मशीनगन्सच्या मार्‍यासह पुढे सरकणारे सैनिकी मोर्चे यांच्या तुलनेत तो वाटा नगण्य आहे. रशियाने क्रीमिया हा भूभाग २०१४ सालीच युक्रेनकडून हिसकावून घेतला आहे. त्यामुळे क्रीमियातले सोव्हेस्तोपोल हे अत्यंत महत्वाचे व्यापारी नि आरमारी बंदर केव्हाच रशियाकडे गेलं आहे. म्हणजे आता रशियाचा गहू सॉची आणि सोव्हेस्तोपोल या मुख्य दोन बंदरांमधून तुर्कस्तानच्या इस्तंबूलकडे रवाना होतो. तिथून पुढे तो युरोपकडे जातो.
 
आपल्याला माहीतच आहे की, २०११ साली इजिप्त, लीबिया इत्यादी अरबी देशांमध्ये बंड होऊन तिथल्या हुकूमशाही राजवटी कोसळल्या. याच वेळी सीरियातही बंड झाले; पण सीरियन हुकूमशहा बशर-अल्-असद भलताच झोटिंग निघाला, त्याने स्वतः तर बंडवाल्यांना चिरडलंच; पण २०१५ साली आपल्या मदतीला रशियन सैन्याला बोलावलं. तेव्हापासून एक रशियन सैन्यविभाग सीरियात तळ ठोकून आहे. या सैन्याला दाणागोटा, दारुगोळा, औषधपाणी असा संपूर्ण रसदपुरवठा सोव्हेस्तोपोल, इस्तंबूलमार्गे होतो. व्यापारी आणि खलाशी जगात या रसद पुरवठ्याला नाव मिळालं आहे-‘सीरियन एक्सप्रेस.’

क्रीमिया आणि पर्यायाने सोव्हेस्तोपोल बंदर हातातून गेल्यावर युक्रेनकडे आता एकच मोठं बंदर राहिलं. ते म्हणजे ओडेसा युक्रेनचा गहू ओडेसा- इस्तंबूलमार्गे युरोपकडे जातो. रशियाने युद्धाच्या सुरवातीलाच ओडेसा बंदराची कोंडी करण्याचा प्रयत्न केला; पण का कोण जाणे, रशियन आरमार दुर्बल झालंय की, ही लढाई फक्त हूल देण्यासाठी करण्याच्या सूचना त्यांना होत्या, म्हणून युक्रेनियन हवाईदलाने अखंड बॉम्ब वर्षाव करून रशियन आरमाराला माघार घ्यायला लावली. एप्रिल २०१२ मध्ये तर युक्रेनियन आरमाराने एक नका प्रकारचं क्षेपणास्त्र डागून रशियाची ’मोस्क्वा’ ही ध्वजनौका चक्क बुडवली.

तेव्हापासून युक्रेनियन आरमार पुढे सरसावत आहे आणि रशियन आरमार माघार तरी घेतंय किंवा फारसा प्रतिकार करीत नाहीये, असे दृश्य दिसते. ऑगस्ट २०२३ मध्ये लागोपाठ दोन दिवस युक्रेनियन ड्रोन्सनी सॉची जवळच्या नोव्होरोसिस्क या रशियन नाविक तळाजवळच्या आरमाराचं आणि क्रीमियाच्या तेलवाहू जहाजाचं खूप नुकसान केलं. दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी युक्रेनियन ड्रोन्सनी सोव्हेस्तोपोल बंदरातल्या रशियन आरमारी मुख्यालयावरचं बॉम्बवर्षाव केला. दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी तर युक्रेनियन ड्रोन्सनी काळ्या समुद्राच्या पूर्व किनार्‍यावरच्या म्हणजे ६०० किमी अंतरावरच्या सॉची या रशियन बंदरावर हल्ला केला.

रशिया आता या सागरी युद्धात वेगळ्या रितीने चाली करतोय. जुलै २०२३ मध्ये रशियाने ‘युनो’बरोबरच्या एका व्यापारी करारातून स्वतःला मोकळं करून घेतलं. काय आहे, हा करार? युक्रेनचा गहू काळ्या समुद्रातून सुरक्षितपणे इस्तंबूलकडे जावा. यात रशिया, जॉर्जिया, रुमेनिया, बल्गेरिया आणि तुर्कस्तान या काळ्या समुद्रतटीय देशांपैकी कुणीही काहीही अडथळा आणू नये, असा हा करार आहे. रशिया त्यातून बाहेर पडला म्हणजे तो आता युक्रेनची गव्हाची गलबतं बुडवायला मोकळा झाला. युक्रेनला यावर उपाय म्हणजे ओडेसा बंदरातून बाहेर पडलेली जहाजं शक्य तितकी काठाकाठाने इस्तंबूलपर्यंत नेणं. रुमेनिया आणि बल्गेरिया यांच्यापासून काही धोका नाही, पण तुर्कस्तानचं काय? तुर्कस्तानचे अध्यक्ष रसीप रय्यप एर्दोगान हे एकीकडे ’नाटो’ गटाचे सदस्य तर आहेत. पण, दुसरीकडे ते पुतीन यांचेही मित्र आहेत आणि अलीकडे त्यांची पावलं कट्टर इस्लामी मतप्रणालीकडे म्हणजेच युरोप-अमेरिका विरोधात पडत आहेत.

मग आता काय होईल? रशिया लगेच युक्रेनची मालवाहू जहाजं बुडवायला सुरुवात करेल का? याला उत्तर म्हणून युक्रेन रशियाची जहाजं की, विशेषतः सीरियन एक्सप्रेस बंद पाडू शकेल का आणि सर्वात महत्त्वाचे म्हणने एर्दोगान काय भूमिका घेतील? कारण, काळ्या समुद्राचं नाक जे इस्तंबूल ते त्यांच्या ताब्यात आहे. जगभरचे अन्याधान्याचे व्यापारी आणि समुद्री विमा कंपन्या बारकाईने परिस्थिती न्याहाळत आहेत. तो देखते रहेंगे, क्या होता हैं आगे आगे!

Powered By Sangraha 9.0