नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून प्रचारासभा ठिकठिकाणी घेण्यात आहेत. १९८४ च्या शीख नरसंहारात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची मोठी भूमिका असल्याचा मोठा गौप्यस्फोट एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला. दरम्यान, AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसींनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "बाबरी मशीद पाडण्यात काँग्रेसची ही भूमिका होती. कमलनाथ यांनी हे सिद्ध केले आहे. काँग्रेस आणि भाजप दोघेही हिंदुत्वाच्या विचारसरणीवर काम करतात.", असेही ओवेसी म्हणाले.
दि. २२ जानेवारीला अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १२.३० वाजता होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यावर ओवेसी म्हणाले, "राहुल गांधी जानेवारीत कोणत्याही कार्यक्रमाला जातात तेव्हा पीएम मोदींनी त्यांना सोबत घेऊन जावे, राम-श्यामची जोडी चांगली असेल. आम्हाला आशा आहे की पीएम मोदी हे करतील." दरम्यान असदुद्दीन ओवेसी यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते कमलनाथ यांनी एएनआयला सांगितले की, "कोणी काहीही म्हणत असले तरी, प्रभू रामाचे मंदिर संपूर्ण देशाचे आहे आणि त्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे, असे मी जे म्हटले आहे त्यावर मी ठाम आहे."
यापूर्वी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दि. २ नोव्हेंबर रोजी म्हटले होते, "१९८५ मध्ये राजीव गांधींनी अयोध्येतील तत्कालीन बाबरी मशिदीचे कुलूप उघडले होते. त्यामुळे राम मंदिराचे श्रेय कोणीही घेऊ नये." दरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसी तेलंगणा निवडणूक प्रचारात भाजप आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आहेत. यापूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ओवेसींवर निशाणा साधला होता. आता AIMIM प्रमुखांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ओवेसी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे वचन देतात तेच आश्वासन राहुल गांधी तेलंगणातील जनतेला देत आहेत. खासदार राहुल गांधी यांनी सीएम केसीआर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.