आता दत्तक घ्या 'महाधनेशा'चे घरटे; 'हे' आहे उदिष्ट्य

संकटग्रस्त पक्ष्याच्या संवर्धनासाठी अनोखे पाऊल

    29-Nov-2023
Total Views |
adopt hornbill nest


मुंबई (विशेष प्रतिनिधी): कोकणातून नामशेष होण्याची भिती असणाऱ्या महाधनेश (Great Hornbill) या पक्ष्याच्या संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महाधनेशाचे (Great Hornbill) घरटेच दत्तक घेता येणार आहे. याव्दारे पक्ष्याबरोबरच त्यांच्या अधिवासाचे देखील संवर्धन करण्याचे उदिष्ट्य आयोजक 'सह्याद्री संकल्प सोसायटी'चे आहे. (Great Hornbill)

पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आढळणाऱ्या महाधनेश हा पक्षी अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे. मात्र, दिवसेंदिवस संख्या कमी होत चाललेल्या महाधनेश पक्ष्यांचे संवर्धन व्हावे या दृष्टीकोनातून या पक्ष्याचे घरटे दत्तक घेण्याची अनोखी योजना 'सह्याद्री संकल्प सोसायटी' या संस्थेने सुरू केली आहे. यामध्ये महाधनेशाचे घरटे काही ठराविक रक्कम देऊन दत्तक घेता येणार असून यामधून मिळणारा निधी महाधनेशांच्या घरट्यांचे संरक्षण करुन ते संवर्धित केले जाणार आहेत. महाधनेश (Great Hornbill) ही पक्षी प्रजात 'आययूसीएन'च्या यादीत 'संकटग्रस्त' प्रजातींमध्ये समाविष्ट असून मुख्यतः फलाहारी असलेल्या या पक्ष्यांची संख्या दिवेसेंदिवस कमी होत आहे.


सामान्यतः कोकणातील जंगले, देवराया तर क्वचितच मानवी वस्तीजवळ आढळणारा हा पक्षी त्याच्या पंखांचा होणारा मोठा आवाज आणि दुरवरून ऐकू येणारी साद यामुळे अनेकांच्या परिचयाचा आहे. भेळा, शेवर, आंबा, सातविण अशा झाडांवर या पक्ष्यांची घरटी आढळतात. तर फलाहारी असलेल्या या पक्ष्याचे मुख्य अन्न वड, पिंपळ, उंबर, भेरलीमाड, घुरवड, काजरा, चांदफळ या वृक्षांची फळे आहेत. यामुळेच या देववृक्षांच्या बिया सर्वदूर पोहोचवून वृक्ष निर्मिती आणि वृक्षप्रसाराचे कार्य अखंडपणे करणारा हा पक्षी पर्यावरणीय परिसंस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. झाडाच्या ढोलीत असणाऱ्या महाधनेशाच्या अंड्यांना किंवा पिल्लांना सरपटणाऱ्या प्राण्यांनी केलेली शिकारी तसेच अंड्यांची तस्करी असे काही धोके आहेत. यामुळे सातत्याने कमी होत असलेली महाधनेशांची संख्या वाढविण्यासाठी त्यांना संरक्षण आणि संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.
 

या पार्श्वभूमीवर महाधनेश संवर्धनाच्या वाटचालीत सामान्यांना थेट आर्थिक योगदान देता येणार आहे. यामध्ये घरट्यांचे संरक्षण आणि निरिक्षण करणे, निवासस्थान पुनर्संचयित करणे आणि सामाजिक प्रशिक्षण अशा तीन टप्प्यांचा समावेश असणार आहे. महाधनेश पक्ष्यांच्या घरट्यांचे नियमितपणे निरीक्षण केले जाणार असून त्यांच्या प्रजननासाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याचा ही प्रयत्न केला जाणार आहे. स्थानिक वृक्षांची लागवड करून महाधनेशांचा अधिवास पुनर्संचयित केला जाणार त्याचबरोबर स्थानिकांमध्ये याविषयी जनजागृती ही या निधीमधून करण्यात येणार आहे.

“सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. घरटे दत्तक घेण्याच्या निधीसाठी मिलाप या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना देणगी देता येणार आहे. https://milaap.org/fundraisers/support-sahyadri-sankalp-society?utm_source=whatsapp&utm_medium=thank_you&mlp_referrer_id=9075488 या संकेतस्थळावर पैसे भरता येणार आहेत.”




hornbill nest





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.