येवल्यातला सेवाभावी उद्यमी

28 Nov 2023 21:57:19
 Vinod Vade

उद्योजक ते नि:स्वार्थी समाजसेवी, पारंपरिक व्यवसायाने स्वतःसोबत समाजालाही समृद्ध बनवणारे येवल्याचे उच्चशिक्षित विनोद वडे. त्यांच्या कार्यविचारांचा मागोवा घेणारा हा लेख...

पैठणीच्या माध्यमातून येवल्याचे आर्थिक जीवन समृद्ध कसे होईल, असा विचार करणार्‍यांमध्ये वडे कुटुंबाच्या विनोद यांची भूमिका महत्त्वाची. ते ‘नावीन्य पैठणी अ‍ॅण्ड सिल्क साडी’चे प्रोपायटर आहेत. येवल्यात त्यांचे दोन शोरूम्स आहेत. पैठणी आणि हातमागाच्या विविध साडी उत्पादन विक्रेत्यांमध्ये विनोद यांना आघाडीचे स्थान आहे. मात्र, हे स्थान एका दिवसात मिळालेलेनाही. विनोद यांनी गणित विषय घेऊन विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण घेऊनही पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत त्यातून स्वतःचा आणि समाजाचा उत्कर्ष त्यांनी साधला.आज येवला म्हटले की, चटकन पैठणी आठवतात, नव्हे पैठणीचे गाव म्हणजे येवला हे घट्ट समीकरण. मात्र, ‘येवला पातळ’ ते ‘येवला पैठणी’ हा प्रवास अनुभवून त्यातून शिकून सवरून ‘येवला पैठणी’ला मानाचे पान मिळवून देणार्‍यांमध्ये वडे घराण्याचे योगदान मोठे आहे.

70-80चे दशक होते आणि पैठणी येवल्यातून लुप्तच झाली होती. त्याच्याऐवजी येवल्यात घरोघरी ‘येवला पातळ’ विणले जाई. विनोद यांचे आजोबा गोविंद आणि पिता काशिनाथ हे ‘येवला पातळ’ बनवत असत. त्याकाळी गोविंद यांनी या कामात वेळ, ऊर्जा वाचवून चांगल्या गुणवत्तेची आकर्षक ‘पातळ’ कसे बनवता येईल, त्याचा अभ्यास केला. यातूनच मग त्यांना कल्पना सुचली की, ‘येवला पातळ’ एक बाय एक धाग्याने बनते. त्याऐवजी दोन उभे आणि तीन आडवे अशी धागा बांधणी केली, तर साडी चांगली दिसते. त्यावर कलाकुसर, रंगसंगतीही उठून दिसते. या साडीचा पदर त्यांनी रेशमी धाग्याचा ठेवला आणि काठ पारपंरिक पैठणीसारखे नारळी काठ ठेवले. या साडीलाही चांगली मागणी आली. ही साडी मुंबईला विक्रीसाठी जाऊ लागली. मात्र, मुंबईतील मरिन लाईन्सच्या काही विक्रेत्यांनी मागणी केली की पदरावर नुसता जरतारी ताव धागा असण्यापेक्षा जरतारी मोर काढून हवेत. त्यानंतर या साडीच्या पदरावर नाचरा मोर विराजमान झाला. पुन्हा एकदा पैठणीचे युग जोरात सुरू झाले. याचे श्रेय विनोद यांचे आजोबा गोविंद यांना आहे. गोविंद यांनी लाडक्या नातवाला म्हणजे विनोद यांना ‘येवला पातळ’, ताव पदर साडी आणि पैठणी बनवण्याचेही शिकवले.

वयाच्या बाराव्या वर्षी विनोद यंत्रमागाद्वारे पैठणी बनवण्यात निपूण झाले. पैठणी कलाकुसर, रंगसंगती, त्यातील विविधता काय केल्यावर पैठणीमध्ये आणखीन आकर्षिकता निर्माण होईल, याबाबत ते सतत चिंतन मनन करत असत. तसा प्रयत्नही करत असत. याच काळात गोविंद यांचे पुत्र आणि विनोद यांचे पिता काशिनाथ हे सामाजिक कार्यातही सक्रिय होते. सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाजाची एक जागा होती. ती जागा एका मुस्लीम व्यक्तीने भाड्याने घेतली. मात्र, काही वर्षांतच त्या जागेवर त्याने कब्जा केला. अशावेळी काशिनाथ यांनी समाजाच्या लोकांना एकत्र केले आणि त्यांनी थेट त्या कब्जा करणार्‍या व्यक्तीकडून ती जागा परत मिळवली. हे सगळे पाहत विनोद घडत होते.

घरात आर्थिक सुबत्ता नसली तरीसुद्धाकष्ट श्रीमंती होती. धार्मिक वातावरण होते. विनोद अभ्यासात तल्लख होते. तसेच कष्टाचीही त्यांच्यात धमक होती. बाबांच्या सोबतीने तेही ‘पातळ’ बनवू लागले. ती ‘पातळ’ मुंबईला व्रिकीसाठी नेऊ लागले. पहाटे पंचवटी ट्रेन पकडायची. दिवसभर ‘पातळ’ घेऊन मुंबईच्या मोठमोठ्या दुकानात जायचे. मोलभाव करायचे. ‘पातळ’ विकायची आणि रात्री घरी परतायचे. विनोद हे करताना कधीही त्रासले नाहीत. कारण, पाच बहिणींचे ते भाऊ होते. त्यांच्यापेक्षा दोन बहिणी मोठ्या आणि तीन बहिणी लहान सोबत एक लहान भाऊ. समाजाच्या रितीरिवाजानुसार बहिणींची लग्न वेळेत व्हायला हवीत. लग्न लावायची तर सगळा सोहळा पार पडण्यासाठी पैसे हवेत. त्यामुळे विनोद 20-20 तास काम करायचे. विनोद आणि त्यांच्या बाबांनी कष्टाची परिसीमा केली आणि विनोद 17 वर्षांचे असतानाच त्यांच्या दोन बहिणींचे विवाह यथासांग संपन्न झाले. विनोद यांच्यासाठी तो क्षण आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे.

आज विनोद हे साईबाबा मंदिर ट्रस्ट विश्वस्त, खंडोबा देवस्थान विश्वस्त, बालेश्वरी पंच विश्वस्त, ‘बालेश्वरी प्रतिष्ठान’ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाजाचे विश्वस्त आहेत. घरात सुबत्ता आहे. स्थिरताआहे. आयुष्यात मान-सन्मान आहे. अशावेळी उद्योग-व्यवसायाच्या वृद्धीसोबतच विनोद सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणाईने उद्योग-व्यवसायात जम बसवावा, यासाठी ते प्रेरणादायी मार्गदर्शन करतात. समाजातील युवकांमध्ये धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान कायम राहावे, अशा उपक्रमांसाठी विनोद प्रयत्न करतात. ‘बालेश्वरी प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वी केले. त्यामुळेच तर समाजाच्या पारंपरिक पंच समितीमध्ये म्हणजे बालेश्वरी पंच समितीमध्ये त्यांना विश्वस्त म्हणून समाजाने नियुक्त केले. समाजासाठी, धर्मकार्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले सेवाभावी विनोद वडे. ते म्हणतात की, ”सहस्त्रार्जुन हे पृथ्वीवर राज्य करणाार्‍या सात राजांपैकी एक होते. त्यांच्या शुरतेचा वारसा जागवण्यासाठी धर्म-समाजजागृती करण्यासाठी मी आयुष्यभर कार्य करणार आहे.” विनोद हे केवळ सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाजाचे सुपूत्र नाहीत, तर समाजाचा वारसा चालवणार्‍या प्रत्येक उद्यमी व्यक्तीचे ते आदर्श आहेत!



Powered By Sangraha 9.0