मिशन दुर्गा शक्ती

28 Nov 2023 22:13:02
Mission Durga Shakti
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘मिशन दुर्गा शक्ती’ उपक्रम दक्षिण मुंबईमध्ये सुरू आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने यासाठी पुढाकार घेतला आहे. मुली महिलांमधील आत्मशक्तीची, स्वंयप्रेरणेची जाणीव जागृती निर्माण करणारा हा उपक्रम सध्या दक्षिण मुंबईतील प्रभागस्तरावर अतिशय लोकप्रिय होताना दिसत आहे. जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल...

 
हिंदू पतितो भवेत्’ या गोळवलकर गुरूजींना दिलेल्या शक्तीमंत्राने राजकारणातही धर्मकारण, समाजकारणानेच काम करणारे मंत्री मंगलप्रभात लोढा, अंत्योदयासाठी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रेरणेने अथकपणे कार्य करणारे मंगलप्रभात लोढा सगळ्यांनाच माहिती आहेत. त्यांच्या संकल्पनेतून दक्षिण मुंबईमध्ये साकार होत असलेला उपक्रम म्हणजे ‘मिशन दुर्गा शक्ती.’ या उपक्रमामध्ये तीन कार्यक्रम एकत्रितरित्या केले जातात. पहिला कार्यक्रम समुपदेशन ज्यामध्ये दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ व्याख्यान. त्यानंतर उपस्थित मुली-महिलांसाठी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक आणि शेवटचा उपक्रम त्या परिसरातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार. सध्या दक्षिण मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाचा हेतू हाच आहे की, जिल्ह्यातील अगदी प्रभाग स्तरावरील माताभगिनींना ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्जजिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ची वास्तव भयानता समजावी, धर्म संस्कृती संवर्धनाची आवश्यकता समजून मुलीमहिलांनी प्रत्येक धोक्यापासून सुरक्षित राहावे. तसेच, ज्या महिला समाजासाठी, देशासाठी काही ना काही चांगले कार्य करतात त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून हा उपक्रम आहे.

‘मिशन दुर्गाशक्ती’चा शुभारंभ दि. 19 नोव्हेंबर रोजी वरळी ‘बीडीडी’ चाळीजवळील मार्कडेंश्वर मंदिर प्रांगणातून करण्यात आला. भाजपच्या दक्षिण मुंबई महिला मोर्चाने प्रभाग क्र. 195 मध्ये अगदी सूक्ष्मातले सूक्ष्म नियोजन करून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी पंकज पाठक यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचेच होते. पण, तरीसुद्धा वरळीमध्ये त्यातही क्रिकेट वर्ल्डकपची शेवटची मॅच असताना, छटपूजा असतान मुली महिला या कार्यक्रमाला येतील का असे वाटत होते. कारण, अतिभौतिकतेमुळे लोकसहभाग हा जिथे मौजमज्जा, विरंगुळा, मनोरंजन असेल तिथे होताना दिसते. त्यामुळे ‘दुर्गा मिशन’ कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग कितपत असेल की मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संकल्पित केले म्हणून भाजपच्याच महिला पदाधिकारी असतील का? असेही वाटले. पण हा गैरसमज होता. कार्यक्रमाच्या निश्चित वेळी शेकडोंनी महिला आल्या. सर्वभाषिक महिला उत्साहानेसहभागी झाल्या. मोकळ्या पटांगणातील कार्यक्रमामध्ये टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल, अशा शांततेमध्ये माताभगिनी आणि कन्यांनी समुपदेशन ऐकले.


इतकेच काय स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक सुरू झाल्यावर सुरुवातील ‘मला जमेल का’, असा विचार करणार्‍या बालिका मुली स्वतःहून पुढे येऊन प्रात्यक्षिक करू लागल्या. लहू सरांनी अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने मुलींना प्रात्यक्षिकाद्वारे संरक्षण शिकवले. या कार्यक्रमामध्ये कल्पिता साटम, वंदना कुंभार, समृद्धी देवळेकर यांना सन्मानित करण्यात आले. कल्पिता साटम म्हणजे अत्यंत उत्साही सामाजिक कार्यकर्ता. महिलांसाठी विविध स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे, हे त्यांचे ध्येय आणि त्यासाठी वर्षोनुवर्षेत्या काम करतात. वंदना कुंभार यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान तर समृद्धी देवळेकर या गोड मुलीने ‘पॉवर लिफ्टींग’ क्षेत्रात देदीप्यमान यश मिळवलेले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्रुती येल्दी, साक्षी सावंत यांनी मेहनत घेतली होती. ज्या प्रभागामध्ये कार्यक्रम यशस्वी होईल का हा प्रश्न पडला होता, त्याच प्रभागामध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ अगदी दिमाखात झाला हे पाहून या कार्यक्रमासाठी सर्वार्थाने मेहनत, नियोजन करणार्‍या दक्षिण मुंबई भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष रचना शिरसाट यांचा उत्साह दुणावला. ‘मिशन दुर्गा शक्ती’च्या प्रत्येक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई महिला मोर्चा उपाध्यक्ष वृषाली झगडे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले.

कार्यक्रम का आणि कसा करायचा? याचे ध्येय उद्दिष्ट रचना आणि त्यांच्या साथीसोबती महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांना कळले होते. त्यामुळेच 21 तारखेला शिवडी विधानसभेतील काळाचौकी प्रभाग क्र. 205 येथील ‘मिशन दुर्गा शक्ती’ कार्यक्रमही अफाट म्हणजे अफाटच यशस्वी झाला. हॉल, हॉलच्या वर्‍हांड्यात गॅलरीत आणि रस्त्यावरही उभे राहून महिलांनी या कार्यक्रमात त्यांची सहभागिता दर्शवली. या कार्यक्रमात समुदपदेशन आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिक तसेच डॉ. समिधा पाटील, डॉ. पुष्पा सानप खेळाडू मैथीली कांबळी या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जान्हवी ताह्मणकर आणि जान्हवी राणे यांनी खूपच उत्तम संघटितरित्या नियोजन केले. ‘मिशन दुर्गा शक्ती’चा तिसरा कार्यक्रम मलबार हिल येथील प्रभाग क्र. 215मध्ये आयोजित करण्यात आला. भाऊसाहेब हिरे उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन झाले. कार्यक्रमामध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ता सुमन नांगरे, पत्रकार वैशाली राठोड, प्रसारमाध्यम तज्ज्ञ गायत्री घुग यांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजनी बुरकूल कविता मांडवकर यांनी यशस्वी नियोजन केले होते. हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्णच म्हणायला हवा. कारण, उद्यान असल्याने कार्यक्रमात सहभागी होणार्‍या शेकडो मुली महिला तर उपस्थित होत्याच, पण त्याचबरोबर उद्यानात फिरायला म्हणून आलेल्या महिला नागरिक शेकडोने उपस्थित होते त्यामध्येे बुरखाधारी महिलांची संख्या लक्षणीय होती. समुपदेशनामध्ये मुलीमहिलांच्या आयुष्याला नरक बनवणार्‍या ‘लव्ह जिहाद’ प्रश्नांवर बोलले. बोलताना वाटत होते त्या बुरखा घातलेल्या भगिनी त्यांच्यासोबतचे पुरुष आक्षेप घेतील का? पण तसे काही झाले नाही, उलट उद्यानात निरूद्देश किंवा मनोरंजनासाठी फिरायचे सोडून तेही उद्यानाच्या कठड्यावर समुपदेशन आणि पुढील सर्व कार्यक्रम ऐकण्यात पाहण्यात गुंग झाले. माझ्या मते ‘मिशन दुर्गा शक्ती’ कार्यक्रमाचे हे यश होते. याच कार्यक्रमामध्ये आ. मंगलप्रभात लोढा अचानक आले. त्यांना पाहून कार्यक्रमात सहभागी असलेल्या शेकडो महिला उत्साहाने त्यांचे स्वागत केले. त्या स्वागतामध्ये काय नव्हते?


 प्रेम, स्नेह, आदर सगळेच. राजकीय नेत्याला घाबरून किंवा त्याच्याकडून काहीतरी लाभ मिळवण्यासाठी त्याच्या पाठीपुढे हाजी हाजी करणारे लोक आपण नेहमीच पाहतो. पण या माता भगिनी राजकीय पार्श्वभूमीतल्या नव्हत्या. आपला आमदार, आपला मंत्री नव्हे तर आपला भाऊ आपल्या भगिनीसाठी- लेकीसाठी हा कार्यक्रम निस्वार्थीपणे आयोजन करत आहे. धर्म संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी सर्वार्थाने यथाशक्ती संघर्ष समनव्य करत आहे ही भावना त्यांच्या स्वागतातून दिसून येत होती. साक्षात मंत्री आले त्यामुळे माझे समुपदेशन आटोपते घेतले. यावर मंगलप्रभात लोढा म्हणाले, नाही नाही तुम्ही कार्यक्रम सुरू ठेवा. समोर शेकडोने लोक जमलेत आता माईक हातात घ्यायला हवा, अशी प्रवृत्ती सर्रास बोकाळलेली दिसते. पण, मंगलप्रभात लोढा यांनी केवळ उपस्थित माता भगिनींना हात जोडले. नमस्कार केला. हा त्यांच्या मनाचा नक्कीच मोठेपणा आहे. या ‘मिशन दुर्गा शक्ती’च्या तिन्ही कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर वाटले की, देशभरात लव्ह जिहादसारख्या आणि धर्मसमाजजीवनाबाबत अनेक समस्या धर्मांधाकडून निर्माण केल्या गेल्या. मात्र मलबार हिल असू दे की मालाड -मालवणी की माहिमचा गड किल्ला की अफजलखानाची कबर.. सर्वत्र मंत्री मंगलप्रभात लोढा हे निर्भिड नि:स्वार्थीपणेआणि अर्थातच रा. स्व. संघाच्या निस्सिम स्वयंसेवकाच्या बाण्याने कार्य करत आहेत.त्यामुळेच राजकीय लाभ स्वार्थ न पाहता प्रत्येक गल्लीतील मुलगी सुरक्षित आणि स्वयंप्रेरणेने जागृत कशी होईल, यासाठी काम, यासाठी नियोजन मंगलप्रभात लोढाच करू शकतात, हे नि:संंशय!


‘मिशन दुर्गा शक्ती’बद्दल दक्षिण मुंबईतील माता भगिनी म्हणतात...

श्रद्धा वालकर आणि दिल्लीमध्ये साक्षीचा तो भयंकर खून पाहून प्रत्येक आईबाबांना त्यांच्या लेकीची खूप काळजी वाटते. ‘लव्ह जिहाद’, ’ड्रग्ज जिहाद’पासून वाचण्यासाठी मुलींनी आणि आम्ही पालकांनी काय केले पाहिजे याबाबतची वास्तव माहिती हवी होती. कोण सांगणार? पण ‘मिशन दुर्गा शक्ती’ने आमच्या समोरचा प्रश्न मिटला. आमच्या परिसरातच सुरक्षित वातावरणामध्ये आम्हाला ‘मिशन दुर्गा शक्ती’च्या माध्यमातून समुपदेशन मिळाले. तसेच, देव न करो कधी मुलींना अतिप्रसंगाचा सामना करावा लागला, तर सहजपणे त्या प्रसंगाशी चारदोन हात कसे करायचे हेसुद्धा प्रात्यक्षिक मुलींना आणि मातांनाही मिळते. परिसरातील आपल्यासारखीच महिला गृहिणी घरसंसार सांभाळून समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करते, हे पाहून आम्हाला प्रेरणाही मिळते. अशा प्रकारे आमच्या सुरक्षिततेसाठी विकासासाठी सर्वच स्तरावर मंत्री मंगलप्रभात लोढा गेले कित्येक दशक काम करतात. आम्हाला अभिमान आहे की, हिंदुत्वासाठी काम करणारा आमदार, मंत्री आम्हाला लाभला आहे!


हिंदुत्व, धर्म, संस्कार याची शिकवण देणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन मंगलप्रभात लोढा सरांनी केले. ‘मिशन दुर्गा शक्ती’ कार्यक्रमामध्ये माझा खेळाडू म्हणून सत्कारही झाला. आम्हाला प्रोत्साहन देऊन समाजदेशहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा ‘मिशन दुर्गा शक्ती’ कार्यक्रमामधून मिळाली. -समृद्धी देवळेकर, वरळी.

 
काळाचौकीच्या ‘मिशन दुर्गा शक्ती’ कार्यक्रमात सहभागी झाल्याचा प्रेरणादायी अनुभव आहे. देशभरात मोदीजी, उत्तर प्रदेशात योगीजी आणि मुंबईत देवेंद्र सरांसोबत मंगलप्रभात लोढा सर हिंदुत्वाचे काम करतात.- मनस्वी साहू, शिवडी



Powered By Sangraha 9.0