बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने नुकतेच २०२४ करिता शाळांसाठीच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकात नितीश यांनी तुष्टीकरणाची एकही संधी न सोडता, दोन धर्मात तेढ कशी निर्माण होईल, याचीच पुरेपूर तजवीज केल्याचे दिसून येते. धक्कादायक म्हणजे, महाशिवरात्री, सीतानवमी, रामनवमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, हरतालिका आणि जिऊतीया या दिवशी याआधी दिली जाणारी सुट्टी पुढील वर्षापासून रद्द करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर अशोका अष्टमी, महात्मा गांधी जयंती आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी दिल्या जाणार्या सुट्टीलाही नितीशबाबूंनी कात्री लावली. याउलट ईदची सुट्टी दोन दिवस आणि बकरी ईद व मोहरमची सुट्टी प्रत्येकी एक दिवसांनी वाढविण्यात आली. बिहारमधील सर्व उर्दू प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये साप्ताहिक सुट्टी आता रविवारऐवजी शुक्रवारी असेल. त्याचप्रमाणे, मुस्लीमबहुल क्षेत्रातील शाळादेखील रविवारऐवजी साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी घोषित करू शकतात, फक्त त्यासाठी त्यांना जिल्हाधिकार्यांच्या परवानगीची गरज भासणार आहे. भाऊबीज, मकरसंक्रांतीच्या दिवशीही शाळा भरणार. त्यामुळे आधीपासून ज्या सणांसाठी सुट्ट्या दिल्या जातात, त्या सणांच्या दिवशी आता बिहार सरकार शाळा भरवणार आहे. मुस्लीम सण-उत्सवांसाठी याआधी वर्षभरात असणार्या सहा सुट्ट्या वाढवून दहावर नेेण्यात आल्या.केरळ, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, राजस्थान या राज्यांमध्ये हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा द्वेष करण्याचा किती आटोकाट प्रयत्न केला जातो, हे समोर आहेच. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन पुत्राने थेट हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या सनातन धर्मावरच अश्लाघ्य शब्दांत टीका केली. त्याचप्रमाणे, युतीचा शब्द न पाळता केवळ आणि केवळ राजकीय फायद्यासाठी नितीशबाबूंनीही कोलांटउडी मारली. ‘इंडिया’ आघाडीत आपण महत्त्वाची भूमिका बजावू, असे स्वप्नरंजन त्यांनी केले, पण तिथेही स्वप्नभंगच झाला. ‘जंगलराज’ म्हणून ज्यांच्या नावाने बोंबा मारल्या, त्याच लालू सुपुत्रांसोबत आज ते सत्तासोबती आहेत. एकूणच काय तर नितीशकुमार यांची राजकीय कारकिर्द आता संपल्यात जमा आहे. तरीही लालूंच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला हिरवा झेंडा दाखवण्याचा हा सत्तालोभ घातकच!
सत्तेवरून सुट्टी लवकरच?
नितीश सरकारने सुट्ट्यांचे वेळापत्रक पुढील वर्षापासून बदलण्याचा निर्णय घेतल्याने बिहारसह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. बिहार विधानसभेमध्ये देशाला लाज आणणारे वक्तव्य करणार्या नितीश यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचाही भर विधानसभेत अपमान केला होता. नितीशबाबू सत्तेच्या मायाजाळामध्ये सगळंच विसरलेले दिसतात. जंगलराजवाल्यांकडून तर अपेक्षा करणेही महापाप. परंतु, नितीशबाबूंना आपण स्वतः हिंदू आहोत, याचाच विसर पडलेला दिसतो. मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीरामाच्या जन्मदिवशी सुट्टी नाही. भगवान श्री कृष्णाच्या जन्मदिवशी बिहारमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी नाकारली. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री रामांचा नितीशबाबूंना अपमान करायचा आहे, असेच यावरून दिसून येते. मुस्लीमबहुल वस्तीतील शाळाही साप्ताहिक सुट्टी रविवारी घेऊ शकतात. मग तेथील हिंदू विद्यार्थ्यांनी का म्हणून शुक्रवारी सुट्टी स्वीकारावी? रविवारी साप्ताहिक सुट्टी असणे कधीही सोयीचे. कारण, बहुतांश पालकांना रविवारीच सुट्टी असते. त्यामुळे रविवारी सुट्टी असेल, तर ते मुलांसोबत फिरायला जाऊ शकतात, त्याच्यासोबत वेळ घालवू शकतात. पण, शुक्रवारी मुलाला आणि पालकांना रविवारी सुट्टी असेल, तर त्या सुट्टीचा विद्यार्थ्यांना आणि पालकांना असा कोणता फायदा होणार आहे? फक्त विशिष्ट दिवशी असा सुट्टी देण्याचा अट्टहास ठेवून दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि उगाच दोन धर्मात वावटळ उठविण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. बिहार सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या जातगणनेच्या आकडेवारीनुसार बिहारची लोकसंख्या १३ कोटी असून यात ८१.९९ ़टक्के हिंदू आणि १७.७० टक्के मुस्लीम आहे. विशेष म्हणजे, २०११ च्या जनगणनेची तुलना केली असता, बिहारमध्ये २०२३ साली हिंदूंची संख्या घटली आहे, तर मुस्लिमांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. हिंदूंची संख्या ०.८ टक्क्यांनी घटली असून मुस्लिमांची लोकसंख्या मात्र ०.८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे नितीश यांना बिहारमध्ये नेमके कोणते सुशासन राबवायचे आहे, हे समजते. शालेय सुट्ट्यांचा घाटही हा त्यापैकीच एक प्रकार, जो नितीशबाबूंना लवकरच सत्तेवरून कायमस्वरुपी सुट्टी देण्यास कारणीभूत ठरू शकतो, हे नक्की!