चर्चा, संवाद, मार्गदर्शनपर भाषणे आदींच्या माध्यमांतून जागतिक हिंदू समाजात ऐक्य अधिक बळकट कसे होईल आणि जागतिक हिंदू समाजात सहकार्य कसे वाढेल, यावर या परिषदेमध्ये विचार करण्यात आला. ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’ने जे घोषणापत्र घोषित केले, त्यामध्ये हिंदुत्वावर म्हणजे सनातन धर्मावर जी द्वेषयुक्त टीका केली जात आहे, त्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये नुकतेच म्हणजे दि. २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर असे तीन दिवस ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये ६१ देशांमधील सुमारे २ हजार, २०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामध्ये हिंदू नेते, विचारवंत यांच्यासह समाजावर प्रभाव पाडणार्या हिंदू नेत्यांचा देखील समावेश होता. बँकॉकमधील ज्या सभागृहात ही जागतिक परिषद योजण्यात आली होती, त्या सभागृहाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृह’ असे नामकरण करण्यात आले होते. या तिसर्या ’वर्ल्ड हिंदू काँग्रेस’मध्ये हिंदू धर्म किंवा सनातन धर्माशी संबंधित अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. हिंदू संघटना, मंदिरे, हिंदू इकोनॉमिक फोरम, हिंदू मीडिया फोरम, हिंदू पॉलिटिकल फोरम, हिंदू यूथ फोरम आणि हिंदू वूमेन फोरम अशा विविध विभागांमध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा, संवाद, मार्गदर्शनपर भाषणे आदींच्या माध्यमांतून जागतिक हिंदू समाजात ऐक्य अधिक बळकट कसे होईल आणि जागतिक हिंदू समाजात सहकार्य कसे वाढेल, यावर या परिषदेमध्ये विचार करण्यात आला. ’वर्ल्ड हिंदू काँग्रेस’ने जे घोषणापत्र घोषित केले, त्यामध्ये हिंदुत्वावर म्हणजे सनातन धर्मावर जी द्वेषयुक्त टीका केली जात आहे, त्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
प्रसिद्ध आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तीन दिवसांच्या या परिषदेस प्रारंभ झाला. ‘जयस्य आयतनं धर्मः’ हे या परिषदेचे बोधवाक्य होते, उद्घाटनप्रसंगी माता अमृतानंदमयी यांनी भारत ही अशी भूमी आहे की, ज्या भूमीने जगाला अंतिम सत्य काय आहे, हे शिकविले. संपूर्ण विश्व हे एका कुटुंबासमान होवो, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. उद्घाटनप्रसंगी केलेल्या आपल्या विचारप्रवर्तक भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी परिषदेच्या बोधवाक्याचे सूत्र पकडून, विजयाच्या दिशेने सुरू असलेल्या आपल्या प्रवासात धर्माची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. ”राक्षस विजय, धन विजय आणि धर्म विजय असे धर्माचे तीन प्रकार असल्याचे सांगून आम्हाला धर्मावर आधारित विजय अपेक्षित आहे,” असे त्यांनी सांगितले.
’वर्ल्ड हिंदू काँग्रेस’चे संस्थापक आणि ‘विश्व हिंदू परिषदे’चे संयुक्त महासचिव स्वामी विज्ञानानंद यांनी या परिषदेच्या आयोजनामागील हेतू आणि उद्देश स्पष्ट केला. ”स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे कथित शिक्षणतज्ज्ञ आणि बुद्धिजीवी यांच्या राजकीय वर्गाने हिंदू समाजास अपमानित केले. या कठीण काळात हिंदू समाज आणि अनेक हिंदू संघटनांनी माघारीस प्रारंभ केला होता. पण, त्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खंबीरपणे उभा राहिला. संघाने ही हिंदू समाजाची ओळख असलेली ज्योत पेटती ठेवली आणि आपल्या शाखांच्या माध्यमातून धगधगती ठेवली,” असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या परिषदेस थायलंडचे पंतप्रधान थावीसिन हे उपस्थित राहणार होते. पण, अपरिहार्य कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. पण, त्यांनी या परिषदेसाठी संदेश पाठविला होता. तो या परिषदेमध्ये वाचून दाखविण्यात आला. अहिंसा, सत्य, सहिष्णुता आणि सलोखा या हिंदू मूल्यांचा त्यांनी आपल्या संदेशात गौरवपूर्ण उल्लेख केला. जागतिक शांततेसाठी ही तत्त्वे महत्त्वाची आहेत, यावर त्यांनी भर दिला. या परिषदेचे आयोजन आमच्या देशामध्ये केले, तो आम्ही आमचा सन्मान समजतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या परिषदेत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एकजिनसीकरण ही पाश्चात्य संकल्पना फेटाळून लावून ऐक्यावर भर दिला. “भारतात जी विविधता आहे, त्यामध्ये या देशाची श्रीमंती आहे,” असे ते म्हणाले. बहुसंख्य आणि अल्पसंख्य हा वाद निरर्थक आहे, असे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. जागतिक पातळीवर हिंदू समाजास अधिक संघटित आणि समर्थ करणे हा या परिषदेच्या आयोजनामागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या तीन दिवसांच्या परिषदेमध्ये एकूण ५० सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. अर्थव्यवस्था, शिक्षण, माध्यमे, राजकारण, युवक आणि महिला यांवर या सत्रांमध्ये चर्चा करण्यात आली. या परिषदेस ’भारत सेवाश्रम परिषदे’चे स्वमी पूर्णात्मानंद, ’राष्ट्र सेविका समिती’च्या प्रमुख शांताक्का, विश्व हिंदू परिषदेचे महासचिव मिलिंद परांडे यांच्यासह विविध देशांतून आलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रीलंका ः मौलवीकडून भरतनाट्यमचा अवमान!
श्रीलंकेमधील मौलवी अब्दुल हमीद शराई याने ‘भरतनाट्यम’ या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या मौलवीने आपल्या ऑनलाईन भाषणात ही शेरेबाजी केली आहे. “भरतनाट्यम नृत्यप्रकारात सहभागी होणार्या नर्तिका या वेश्या असून, राजाला मोहात पाडण्याचे काम त्या आपल्या कलेद्वारे करीत असत,” असे तारे या मौलवीने तोडले आहेत. मौलवीने ही जी शेरेबाजी केली आहे, त्याची सांस्कृतिक आणि कलाकारांच्या गोटात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अशी शेरेबाजी करून एका सर्वमान्य प्रतिष्ठित कलेचा मौलवीने अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया या वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मौलवीच्या या शेरेबाजीवरून श्रीलंकेमधील हिंदू समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. बट्टीकलोआ येथे विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. या घाणेरड्या शेरेबाजीबद्दल मौलवीने माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मानवी अधिकारांसाठी कार्य करणारे थामोथाराम प्रथीवन यांनी सदर मौलवी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा सर्व वाद उफाळल्यानंतर त्या मौलवीने एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यामध्ये हिंदूंना दुखविण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्याने म्हटले आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखवल्या असतील, तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्याने म्हटले आहे.
इस्रायलची ‘लष्कर-ए-तोयबा’वर बंदी
मुंबईवर २६/११चा जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्या हल्ल्यास नुकतीच १५ वर्षे पूर्ण झाली. त्या हल्ल्यांमध्ये वीरगती प्राप्त झालेल्यांना आणि जे निरपराध या हल्ल्यात बळी पडले, त्यांना नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर इस्रायल या देशाने ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनेवर बंदी घालावी, अशी कोणतीही विनंती भारताकडून करण्यात आली नव्हती. इस्रायलने स्वतःहून ही बंदी घोषित केली. ही अत्यंत घातक संघटना असून, ती भारतातील शेकडो निरपराध लोकांच्या आणि अन्य काहींच्या हत्येस जबाबदार आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांना इस्रायल आदरांजली वाहत आहे. आम्ही भारताच्या मागे उभे आहोत, असेही इस्रायलने म्हटले आहे. दहशतवादाविरुद्ध संघटित आघाडी निर्माण करण्याच्या हेतूने ‘लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेवर बंदी घालण्यासंदर्भात इस्रायलचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय गेल्या काही महिन्यांपासून कार्य करीत होते. २६/ ११चा स्मृती दिन लक्षात घेऊन, या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय इस्रायलने घेतला.
९८६९०२०७३२