‘लाल यादी’वरच लाल शेरा!

27 Nov 2023 21:24:09
Article on IUCN Report

‘आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संघा’ची (IUCN) धोक्यात असलेल्या प्रजातींची ‘लाल यादी’ कालबाह्य होत चालल्याचे मत पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन शास्त्रज्ञांनी नुकतेच व्यक्त केले. उत्तर थायलंडमध्ये एका नवीन पालीच्या प्रजातीवर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांनी ही भूमिका मांडली आहे. तेथील जैवविविधता जतन करण्याची गरज मोठी आहे. येथील नवीन शोधलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याच्या प्रक्रियेमध्ये (IUCN) लाल यादीचा समावेश आहे.
 
यासाठी एक कठीण आणि जटिल मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही यादी जगातील नामशेष होणार्‍या प्रजातींची सर्वात अधिकृत सूची मानली जाते. खाणकामासारख्या मानवी क्रियाकलापांमुळे नव्याने शोध लागलेल्या काही प्रजातींचे अस्तित्वदेखील धोक्यात येऊ शकते. या प्रजातींसाठी समर्थन मिळवण्यात अडथळा येतो. तसेच एखाद्या प्रजातीला संरक्षण मिळविण्यासाठी तिची दुर्मीळता नियमांनुसार सिद्ध करावी लागते. अनेक शास्त्रज्ञांनी सहलेखन केलेल्या या पेपरमध्ये ‘लाल यादी’बद्दलच्या विविध आक्षेपांवर लाल शेराच मारण्यात आला असून, ही यादी अविश्वसनीय असल्याचे सांग पक्षपाती मूल्यांकनाचा आरोप या पेपरमध्ये करण्यात आला आहे.

‘लाल यादी’ सर्वप्रथम १९६४ साली सर्वप्रथम तयार करण्यात आली. या पेपरमध्ये नामशेष होऊ घातलेल्या प्रजातींच्या संवर्धनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल या यादीची प्रशंसा केली आहे. पण, मूल्यांकनाची एकूणच गती आणि डाटामधील तफावतीबद्दल टीकादेखील केलेली दिसते. जगभरातील केवळ दोन टक्के प्रजातींचेच अंदाजे सहा दशकांनंतर मूल्यांकन केले गेले. तज्ज्ञांच्या मत-आधारित मूल्यांकन प्रक्रिया, कालबाह्य भौगोलिक पद्धती आणि नोकरशाहीतील अडथळे अशा ‘लाल यादी’च्या मूल्यांकन प्रक्रियेतील विविध त्रुटी हा पेपर अधोरेखित करतो.
 
‘लाल यादी’ ही संकटग्रस्त प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी महत्त्वाची असल्यामुळेच, या यादीच्या मर्यादांचा देखील साकल्याने विचार करणे तितकेच आवश्यक आहे. विशेषतः ‘कुनमिंग-मॉन्ट्रियल ग्लोबल जैवविविधता रचना’ (GBF) आणि मानवामुळे नामशेष होणार्‍या प्रजातींच्या संरक्षण-संवर्धन उद्दिष्टांसंदर्भात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ही यादी जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या माहितीचा सर्वसमावेशक स्रोत आहे, तरीसुद्धा ‘लाल यादी’मध्ये पृथ्वीवरील अंदाजे आठ दशलक्ष प्रजातींपैकी फक्त एक छोटासा भाग समाविष्ट आहे. ’संयुक्त राष्ट्रां’च्या जागतिक मूल्यांकनाचा अंदाज आहे की, एक दशलक्ष प्रजाती धोक्यात आहेत, तर ‘लाल यादी’ केवळ ४२ हजार, १०० प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दर्शविते. अशा या ‘लाल यादी’तील त्रुटींमुळे जैवविविधतेच्या संवर्धनावर परिणाम होतो. वन्यजीव संवर्धनात पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठता यांसाठी ओळखली जाणारी ‘लाल यादी’ आणि तिची एकूण प्रक्रिया म्हणूनच अद्ययावत करण्याची आज नितांत गरज आहे.

प्रजातींसंदर्भात विविध स्रोतांकडून वारंवार डाटा अपडेट करण्यासाठी विशिष्ट ‘मॉनिटरिंग फ्रेमवर्क’ची आवश्यकता आहे. त्याचबरोबर संशोधन निधीवाटपातील पक्षपातीपणा दूर करणेही तितकेच गरजेचे. कारण, जागतिक पातळीवरील प्रमुख संस्था सर्वाधिक धोकादायक श्रेणींमधील प्रजातींनाच प्राधान्य देतात आणि गंभीर धोक्यांचा सामना करणार्‍या प्रजातींकडे परिणामी दुर्लक्ष होताना दिसते. जागतिक संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये प्रभावीपणे योगदान देण्यासाठी (IUCN) ‘लाल यादी’च्या मर्यादांचे निराकरण करण्याची गरज या पेपरमधून प्रतिबिंबित होते. म्हणूनच अशा प्रजातींच्या दस्तावेजीकरणाची प्रक्रिया गतिमान आणि प्रतिसादात्मक करण्यासाठी विशेष प्रयत्न जागतिक पातळीवर करावे लागतील.

‘लाल यादी’नुसार नामशेष होणार्‍या प्रजातींच्या संरक्षण-संवर्धनासाठी श्रीमंत पाश्चात्य देशांकडून निधी पुरवठादेखील केला जातो. परंतु, अनेक विकसनशील देशांमध्ये ही ‘लाल यादी’ वास्तविक ‘संवर्धन प्राधान्य यादी’ बनली आहे, असे टीकाकारांचे म्हणणे. एक काळ असा होता, जेव्हा पाश्चात्य वैज्ञानिकांचा शब्द अनेकदा आफ्रिकन किंवा आशियाई शास्त्रज्ञांपेक्षा जास्त गांभीर्याने घेतला जात असे. पण, आज युरोप-अमेरिका शिक्षित काही मूठभर मंडळी (IUCN)चे मूल्यांकन करत असून ते जगावर लादत आहेत. ही संवर्धनाची वसाहतवादी कल्पनाच म्हणता येईल. एकूणच काय तर, प्रजाती नष्ट होण्याकडे लक्ष केंद्रित करण्याबरोबरच, प्रजातींच्या संरक्षणाकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Powered By Sangraha 9.0