समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी १५ इंटरसेप्टर वाहने; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाण्यात लोकार्पण

    27-Nov-2023
Total Views |
 CM SHINDE
 
ठाणे: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली. ठाण्यातील कोलशेत येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली.
 
७०१ कि.मी लांबीपैकी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समुद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता. इगतपुरी (६०० कि.मी.) वाहतूकीस खुला आहे. हजारो वाहने समृद्वीचा प्रतिदिन वापर करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी महामार्ग पोलिसांच्या केंद्राकरिता १५ इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळांकडे केली होती.
 
त्यानुषंगाने महामंडळाकडून १५ स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करून मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आली.यावेळी आ. प्रताप सरनाईक, माजी आ.रविंद्र फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह-व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड व पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस पथक ) अरविंद साळवे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
इंटरसेप्टर वाहनांमध्ये काय आहे ?
इंटरसेप्टर वाहनांमध्ये फर्स्ट एड किट, फायर एक्सटींविशर, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, पीए सिस्टीमसह ब्लिकींग लाईट बार, व्हेईकल ग्राफिक डिझाईन, ब्रेथ अॅनालायझर आदी आवश्यक असलेल्या उपकरणांची जोडणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे १५ पॉईटवर नियुक्त ही वाहने वाहतुक नियम मोडणाऱ्या वाहनांवर वॉच ठेवणार आहे.
 
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी
महामार्गावरील घटनांबाबत सेंट्रल कंट्रोल रुम स्थापित केले असून त्याद्वारे शीघ्र प्रतिसाद वाहने, १०८ रुग्णवाहिका, महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इत्यादींना अपघातांची, इतर घटनांची सूचना देण्यात येते. जेणेकरून घटनास्थळी जलदगतीने मदत पोहोचविणे सोयीचे होते. प्रवाशांना तातडीने मदत मिळण्याकरिता महामार्गावर हेल्पलाईन नंबरचे फलक आहेत.याशिवाय, समृद्धी महामार्गावर घटना व्यवस्थापन सुरळीत होण्याच्या अनुषंगाने स्टॅण्डर्ड आपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार केली आहे. अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने - २१, रुग्णवाहिका - २१, ई.पी.सी गस्त वाहने - १४, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्रे- १३, ३० टन क्षमतेची क्रेन - १३, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत - १४२ सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.