खानिवडे : हवामान खात्याचे अंदाज तंतोतंत खरे ठरवत २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शिडकावा केल्यानंतर पहाटे चार सुमारास जोरदार वारा सुटला होता .यावाऱ्यासह काही वेळात पावसाने जोरदार वृष्टी सुरू केली .आणि काही मिनिटातच मेघ गर्जनेसह धारदार बरसात सुरू केली. ही बरसात पहाटे सहा वाजेपर्यंत म्हणजेच अंदाजे दोन तास सुरुच होती .अगदी भर पावसाळ्यात कोसळणाऱ्या पावसासारखी बरसात झाल्याने शेत खाचरे पाण्याने भरून गेली.
यामुळे खरिपातील काढणीला आलेली गरवी भात शेती आडवी झाली .तर खळ्यात रचलेल्या उडव्यांमध्ये पाणी शिरले .तसेच झोडणी नन्तर साठवलेली पावाली भिजून गेली .यामुळे खरीप उत्पादनाचे नुकसान झाले आहे .तर नुकत्याच आटोपलेल्या रब्बी पेरण्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे वाया जाण्याची दाट शक्यता असून पुन्हा दुबार पेरण्या करण्याचे संकट रब्बी हंगामातील उत्पादक शेतकऱ्यांवर ओढावले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाचा वेध घेऊन ज्या जागरूक शेतकऱ्यांनी कापणी केलेले पीक बांधणी करून भात पिकांचे उडवे रचले होते .त्यातील काहींनी लागलीच झोडणी करून भात घरात आणले त्यांचे पीक वाचले .मात्र पावाली भिजली .ज्यांचे पीक उडवे खळ्यात होते त्यांच्यावर पावसाच्या शक्यतेमुळे ताडपत्री ही अंथरली होती .मात्र तरीही अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यापुढे ताडपत्री उडाल्याने पिकात पाणी शिरले आहे.
या अवकाळीमुळे खरिपातील शेवटची पिके आडवी झाली तर रब्बीच्या पेरण्या वाया गेल्या. खरीपानंतर रब्बी बरोबर जी वाडी पिके म्हणजेच भाजीपाला पिके घेतली जातात त्यांच्या वाफ्यात पाणी झाल्याने ती कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
सुमारे दोन तास जोरदार पाऊस
पाऊस इतका जोरदार कोसळला की शेत खाचारात वीतभर पाणी साचले .तर रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून जात होते. जंगलातून वाहणारे ओहोळ पावसाळ्यानंतर नुकतेच जे सुकले होते ते पुन्हा प्रवाहित झाले .