अडचणीत असताना सहकार्य करा! प्रकाश आंबेडकरांना भुजबळांची विनंती
26-Nov-2023
Total Views |
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद सुरु आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये असे म्हटले आहे. मंत्री छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांचे नाव घेता त्यांनी हा इशारा दिला आहे.
"कृपा करुन ओबीसींच्या नेत्यांनी माझ्या नादी लागू नका. जगात इतिहास काढला तर तुम्ही मंडलबरोबर नव्हता तर कमंडलसोबत होता. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. ओबीसींचे आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत. आज त्यांना वाचवता येत नाही म्हणून त्यांना भिडवण्याची भाषा चालली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
त्यानंतर यावर छगन भुजबळ यांनी आम्हाला प्रकाश आंबेडकरांचे सहकार्य हवे आहे असे म्हटले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, "मी एक शब्दसुद्धा प्रकाश आंबेडकरांविरोधात बोललो नाही. माझी त्यांना विनंती आहे की, या अडचणीच्या काळात आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे आहे. मला माहिती आहे की, त्यांनी मंडल आयोगासारख्या अनेक कामांसाठी मेहनत घेतली आहे. पण आज अडचणीत असताना आपण आम्हाला सहकार्य करा, अशी आम्ही विनंती करतो. माझी खात्री आहे की, एक दिवस ते निश्चितपणे आमच्यासोबत उभे राहतील," असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.