मुंबई (विशेष प्रतिनिधी): सागर परिसंस्थेशी परिचय व्हावा आणि त्याविषयी जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातुन रत्नागिरीतील आसमंत बेनेवोलंस फाऊंडेशनने यंदा द्वितीय सागर महोत्सवाचे आयोजन केले आहे. येत्या जानेवारी महिन्यात हा महोत्सव पार पडणार असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात हा महोत्सव होणार आहे. गुरुवार दि. ११ जानेवारी ते रविवार दि. १४ जानेवारी २०२४ असा चार दिवसांसाठी हा आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आसमंत बेनेवोलंस फाऊंडेशनने महाराष्ट्रातला पहिला सागर महोत्सव आयोजित केला होता. या पहिल्याच वर्षात मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबरोबर यंदा दै. मुंबई तरुण भारतबरोबर माध्यम भागीदारी करत (Media Partnership) करत रत्नागिरीतील गोगटे जोगळाकर महाविद्यालयात द्वितीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सागराची अध्यात्मिक बाजू, वैज्ञानिक बाजू तसेच प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्यावर जाऊन सागर परिसंस्थेशी ओळख करुन घेता येणार आहे. समुद्र किनाऱ्यांवर असणाऱ्या कांदळवनांविषयीही चर्चा होणार असून या निमित्ताने सागर परिसंस्थेवर काम करणाऱ्या तसेच अभ्यास, संशोधन करणाऱ्या व्यक्तींचं काम यानिमित्ताने पाहता येणार आहे. सागरावर काम कणाऱ्या अनेक सहयोगी संस्था यानिमित्ताने एकत्र आल्या आहेत.
सागर महोत्सवात महाएमटीबीच्या चित्रफिती...
दै. मुंबई तरुण भारतच्या 'महाएमटीबी' आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट यांच्या समन्वयातुन तयार करण्यात आलेल्या स्पिशीज अँड हॅबिटॅट्स अवेअरनेस प्रोग्रॅममधील काही व्हिडीओज या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. सागर आणि त्या परिसंस्थेवर आधारित शास्त्रीय माहितीने परिपुर्ण असलेले व्हिडीओज मोठ्या पडद्यावर पाहणं ही उपस्थितांसाठी पर्वणीच असेल.
'सी-बोट'मधून ५० मीटर खोल समुद्राचं थेट प्रक्षेपण...
नॅश्नल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफीने बनवलेली सी-बोट समुद्राच्या आत जाऊ शकणारी एक पाणबुडी आहे. ही पाणबुडी समुद्रात जाणार असुन तिच्यावर बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांद्वारे ती छायाचित्रेही टिपते. याच कॅमेऱ्याच्या सहाय्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही पाणबुडी समुद्राखाली गेल्यानंतर ५० मीटर खोल समुद्रात काय दिसणार आहे याचे थेट प्रक्षेपण गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हॉलमध्ये बसलेल्या व्यक्तींना पाहता येणार आहे.