मोतीबाग वास्तूने आजतागायत जी स्थित्यंतरे अनुभवली, त्याचा मागोवा घेताना या काळातील मोतीबागेच्या वाटचालीचे महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेले वसंत दत्तात्रेय प्रसादे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना मोतीबागेच्या आठवणींना दिलेेला हा उजाळा...
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वसंतरावांनी शनिवार पेठेतील प्रसादे वाड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मोतीबागेशी स्नेह जुळविला तो आजतागायत कायम आहे. आजही ते या मोतीबागेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या प्रसादे वाड्यात वास्तव्यास असतात. मोतीबाग ही वास्तूू सेवाकार्याचा दीपस्तंभ आहे, असे मी मानतो असे प्रसादे अभिमानाने सांगतात.मोतीबागेबद्दल ठळक आठवणी नमूद करताना त्यांनी 1950 पासूनच्या आठवणींचा पट तरळतो तेव्हा अनेक सहकार्यांची आठवण प्रकर्षाने होते, असे सांगून यात बाळू गोडसे, भैय्या जोशी, अंबा लोंढे, आदींची खूप साथ आणि सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले.
संघाचे संस्कार जपून आयुष्य व्यतीत करीत आहे. ही नावे घेताना मला त्यांचा अभिमान वाटतो. मोतीबागजवळ माझे ‘प्रसाद’ सायकल मार्ट’ होते. माझे हे दुकान आणि मोतीबाग हे नाते 60च्या दशकानंतरच्या काळात इतकं पक्क जुळलं की केवळ व्यक्ती म्हणून नव्हे, तर वास्तू आणि प्रत्येक घटना, प्रसंगांच ते साक्षीदार ठरलं.माझ्या या दुकानात असलेल्या सायकली घेऊन येथे येणारे स्वयंसेवक, जनसंघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या कार्यासाठी निघत असत. तो काळ स्वातंत्र्यानंतरच्या उत्सवाचा असला तरी दादरा-नगर हवेली संग्रामात आम्ही पुणेकरांनी जे योगदान दिले, त्यात मोतीबाग ही एक महत्त्वाची साक्षीदार म्हणून आमच्या कार्यात खंबीरपणे उभी होती, हे मी कधीच विसरणार नाही. साधारणतः 1960 नंतर आणि आणीबाणीच्या कालखंडानंतर मोतीबागेतील हालचाली केंद्रस्थानी येत गेल्या. येथे येणारा आणि येथून तयार झालेला स्वयंसेवक, कार्यकर्ता प्रत्येक सेवा कार्यात अग्रेसर असायचा. मला या वास्तूमुळेच या सेवाकार्याची प्रेरणा मिळत गेली.
आम्हा कार्यकर्त्यांची जी टीम तयार करण्यात आली. त्यात ज्येेष्ठांच्या मार्गदर्शनातून आम्ही कोणत्याही समाजकार्यासाठी जनहिताच्या लढ्यासाठी अन्यायाविरोधात उभे ठाकण्यासाठी तयार असायचो. ‘भारतीय किसान संघा’चे दिनेश कुलकर्णी किसान संघाचे दादा लाड, हिंद तरुण मंडळ, हनुमान व्यायाम मंडळ, वासुदेवराव भिडे यांचा गृप, जीवन रेस्टॉरंटमधील बाहेरगावहून एस.पी.कॉलेजमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचा एक ग्रुप अशा चार मंडळांचे 100 कार्यकर्ते आम्ही तासाभरात जमा झालो आणि दादरा नगर-हवेली मुक्तीसाठी योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.पानशेत धरण दुर्घटनेवेळी लोकांना आम्ही तातडीने बाहेर काढायला सुरुवात केली, ते अहिल्यादेवी शाळेच्या भिंतीवरून आम्ही सुरक्षित ठिकाणी नेले. या काळात माझे सायकलचे दुकान बंद होते. हा पूर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होते, त्यामुळे रात्रीच्यावेळी वीज नसल्याने दुकानातील टायर रस्त्याच्याकडेला लावून ते जाळून त्याचा उजेड निर्माण केला होता. मोतीबागेत सर्व मदतीचा ओघ येत होता, अहिल्यादेवी चौकातून आम्ही पूरग्रस्तांना मदत केली, असेही वसंतराव प्रसादे म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरेंमुळे आम्ही या भागात ’हनुमान व्यायाम मंडळ’ स्थापन केले. रामभाऊ म्हाळगींनी माझे कार्य पाहून, “अरे तुला निवडणुकीत उभे राहायचे आहे,” असे जणू आदेशच दिले होते. दोन वेळा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो, एकदा जनसंघाचा आणि एकदा भाजपचा. मोरोपंत पिंगळे यांची नागपुरात भेट झाली तेव्हा त्यांनी मला “अरे तू सायकलवाला ना” म्हणून माझी ओळख कायम ठेवली होती. कारण, ते पुण्यात आले की माझ्या दुकानातून नेहमी सायकल घेऊन जात असत, त्यामुळे मी कृतकृत्य झालो.सुधीर फडके यांची आठवण सांगताना ते जेव्हा मोतीबागेत समूहगानाच्या तालमी करून घेत त्यात माझा देखील सहभाग होता, असे प्रसादे म्हणाले.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आज देखील जेव्हा मोतीबागेत येतात, तेव्हा आमच्या रात्रशाखेस भेट देतात, असे ते म्हणाले. 1965 पासून या भागात आम्ही शिवजयंती उत्सव सुरू केला, सुरुवातीला आम्ही बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून ऐतिहासिक काळातील शस्त्रे आणून ती प्रदर्शनात ठेवत होतो. तथापि अशी शस्त्रे ठेवण्यावर नंतर बंदी आली, पण आजतागायत आम्ही हा उत्सव साजरा करतो. तसेच ललिता पंचमी उत्सव आणि अन्य उत्सव मोतीबागेत नियमित घेत आहोत. मोतीबाग आणि पर्यायाने संघाच्या 70 वर्षांच्या सहवासामुळेच मला देशाचे महान पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते गौरवित होण्याचे भाग्य लाभले, हे मला नमूद करावेच लागेल, असे वसंतराव प्रसादे म्हणाले.
वसंत दत्तात्रेय प्रसादे
(शब्दांकन अतुल तांदळीकर)