मी मोतीबाग बोलतेय

25 Nov 2023 19:49:09
Pradeep Naik on Motibag


'मी मोतीबाग’.... ५० वर्षांपेक्षा अधिक काळ ओळखतो आहेस ना? आता बघ ना, मी किती बदलले आहे... आधीचा तो वाडा, त्या खोल्या खोल्या, पत्र्याची शेड, नंतरच्या काळात दुमजली बांधकाम आणि आज तर विच्चारू नको. भली मोठी उंच इमारत!

मला आठवतेहेत ते जुने दिवस... कुणी कुणी म्हणायचे मोतीबाग म्हणजे ‘संस्थान’ आहे! हो, खरंच आहे ते, संस्थानच आहे. देशासाठी आयुष्य झोकून देऊन जगलेल्या शेकडो ध्येयवादी ‘प्रचारकांच्या वास्तव्याने पावन झालेलं, बहरलेलं, फुललेलं संस्थानच होते मी आणि आजही आहे. इथे सतत राबता असतो नवनव्या उत्साही कार्यकर्त्यांचा... देशासाठी, समाजासाठी काही तरी रचनात्मक कार्य करण्याची उर्मी असलेल्यांचे हे चैतन्यदायी संस्थान. रात्री अपरात्री अन् भल्या पहाटेसुद्धा येथे गजबज असते.

‘मोतीबाग’ म्हंटलं की ऊर्जा संचारते. अशा किती तरी पिढ्या मी अनुभवल्यात! माझ्या आधी होतं म्हणे काही काळ, शनिपाराजवळ आणि नंतर ‘उद्यान प्रसाद’ जवळ कार्यालय. तेथून बळ अन् आशीर्वाद घेऊन सुरू झाला इथला कारभार! दगड, माती, विटांची वास्तू नव्हे रे मी; केवळ आणि रुक्ष कागदी व्यवहार करणारे ‘ऑफिस’ पण नव्हे रे मी! मी आहे सळसळत्या उत्साहाच्या तरुणांचे प्रेरणास्थान. ज्यांच्याकडे नुसते पाहिले तरी अंगी १२ हत्तीचे बळ संचारावं, अशी थोर थोर मंडळी! भेटीगाठी, गप्पा, चर्चा, हसणं-खिदळणं, त्यातून कार्यवाढ, नवनव्या योजना, प्रकल्पांची, नव्या आयामांची निर्मिती. सारी मला आठवतात.

अनेक कार्यकर्त्यांच्या साहचर्याने आणि कार्यक्रमांमुळे माझं संस्थाजीवन समृद्ध होत राहीलं आहे. देशभरातून कार्येकर्ते येथे मनात मोठा विश्वास घेऊन येतात. कोणी स्वयंसेवक आमदार, खासदार, मंत्री झाला की तो भारतमातेच्या पूजेसाठी इथं येणारच! अशी थोर परंपरा मी जपली आहे. येथील ‘अन्नपूर्णा’ म्हणजे तर जगातल्या उत्तम चवींचं पाकगृह! सारा माहौल अगत्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा! ना कुठला बडेजाव ना कुठले भेदाभेद! सारे समान पातळीवर. माझं तळघरसुद्धा भरगच्च. शिबिरांच्या आणि संघा शिक्षा वर्गांच्या काळात तेथे केवढी लगबग असते. उत्सवांच्या काळात भांडारमध्ये गणवेश खरेदीसाठी येणारी तरुणाई म्हणजे माझं नवचैतन्य! कुठही खिन्नता, उदासीनता नाही! हास्याची कारंजी.... आनंदाचे डोही आनंद तरंग मी येथे वर्षानुवर्ष अनुभवले... त्यात आता नवीन भरच पडत राहणारच!

हो, पण काही दुःखाचे, वेदनेचे, उदासीनतेचेही प्रसंग आले नाहीत असं नाही.. आणीबाणीत या संस्थेला अवकळा आणली होती, तेव्हा थोडी निराशा निर्माण झाली होती. पण, आणीबाणी गेली तेव्हा सत्यनारायण पूजेचा मोठा कार्यक्रम योजला... काय गर्दी लोटली होती. एकमेकांना मिठी मारून भेटण्याचा आनंद.. एका दिव्यातून यशस्वीपणे बाहेर पडल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर मी पाहिलाय.. आणि कितीतरी दिग्गजांनी अखेरचा श्वास येथे घेतलाय त्याचं दुःख मी अनुभवलय. रामजन्मभूमी आंदोलन काळातली बंदी मी अनुभवली... पण त्या बंदीत विशेष दम नव्हता म्हणा!

तळजाई शिबीर,प. पू. डॉक्टरांची जन्मशताब्दी, जगजागरण अभियान अशा मोठ्या घटना- प्रसंगात तर माझा सहभाग सतत असणारच.. किती माणसं कुठून कुठून यायची तेव्हां! माणसांचं असं वैभव अन्य कुणापेक्षा माझ्या वाटेला जास्त आलं, याचा अभिमान वाटतो.चंदनाप्रमाणे झिजलेल्या अनेक विभूतींच्या पावन स्मृतीचा गंध सदैव भरून राहिलेला आहे. तो दरवळ उज्वल भवितव्याचा विश्वासच जागवतो आहे. कालसुसंगत असं माझं बदललेलं रूप म्हणजे पूर्वसुरींचा कृपाप्रसादच. तोच आधार आहे भारतमातेच्या विश्वविजयाचा. त्यासाठी नित्यं केशवपंथे गमन करूया !!

प्रदीप नाईक


Powered By Sangraha 9.0