मोतीबाग : नररत्नांची खाण

25 Nov 2023 19:47:03
Padmakar Balwant Kulkarni on Motibag


मी १९६४ मध्ये ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्था’ मोतीबाग येथे सहा महिने नोकरी केली. त्यावेळी येथे बापूराव दात्ये हे व्यवस्थापक होते. ते पुस्तक विक्रीचे काम संपल्यावर संघाच्या घोषाच्या रचनांचा अभ्यास करीत असत व रचना बसवित असत. त्यांनी घोषाच्या सर्व रचना भारतीय संगीत रचनेत बसविल्या. त्यांच्या ’गायनी कला’ या पुस्तकात शासनातर्फे पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या घोषाच्या भारतीय संगीत रचना लष्कराच्या घोषात बँडमध्ये बसवल्या गेल्या. दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बापूराव दात्येंच्या भारतीय रचना बँड वर वाजवण्यात आल्या होत्या. कै. बाबुराव दाते मोतीबाग या वास्तूच्या प्रेरणेतून, घडले गेले.

या सहा महिन्यांच्या मोतीबागेच्या वास्तव्यात, मोतीबागेत राहत असल्यामुळे, दिवस-रात्र तरुण स्वयंसेवकांची वर्दळ पाहिली होती. भारतीय विचार साधना पुस्तक भांडार, गणवेश विक्री भांडार, स्वागत कक्ष, यामध्ये सेवानिवृत्त स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने तरुणांना लाजवील, अशी कामे करीत आहेत. त्यांच्याकडे पाहिले की, या सेवानिवृत्त स्वयंसेवकांना कुठून चेतना मिळाली, तर ती मोतीबाग वास्तुतूनच मिळाली!१९५८-५९ साली माझे बंधू बंडोपंत कुलकर्णी व दाजी खेडकर हे कॉलेज शिक्षणासाठी आले. त्यांचे निवासस्थान मोतीबागच होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते दोघेही पूर्ण वेळ प्रचारक म्हणून निघाले होते. हा मोतीबागेचा परिणाम.

मोतीबागेच्या संपर्कात आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी माणिकराव पाटील, राजाभाऊ झरकर (नगर), गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन, डॉ. अशोकराव कुकडे ही नावे प्रातिनिधिक स्वरूपात घेता येतील. त्यांनी ‘इदम् न मम, राष्ट्राय स्वाहा:’ या तत्त्वानुसार, आपले सारे आयुष्य संघकार्यासाठी, सामाजिक कामासाठी दिले, अशी शेकडो स्वयंसेवकांची नावे घेता येतील. मोतीबाग ही वास्तू प्रेरणास्थान आहे. या वास्तूत संघचालकांचेही वास्तव्य झाले आहे. यामुळे ही वास्तू पुनीत झालेली आहे. या वास्तूच्या स्पर्श झालेल्या स्वयंसेवकांनी अनेक सेवाभावी संस्था उभ्या केल्या.

मोतीबागेत दामूअण्णा दाते, नामदेवराव घाडगे, बाळासाहेब साठे, तात्या बापट, आबा अभ्यंकर यांचे बराच काळ वास्तव्य होते. ते सर्व महाराष्ट्रातील तरुण स्वयंसेवकांचे प्रेरणास्थान होते.मोतीबागेत श्रीगुरुजींच्या अनेक बैठका झाल्या. संघ प्रचारक दादाराव परमार्थ, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे यांचे बौद्धिक वर्ग होत असत. संघाचे पुणे शहराचे कार्यक्रम, उपक्रम, मासिक बैठका मोतीबागेत होत असत.मोतीबाग काही ऐतिहासिक सणांची आणि प्रसंगांची साक्षीदार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी सवाई गंधर्व महोत्सवाचा प्रारंभ केला. गोवा आणि दादरा नगर-हवेलीच्या मुक्तिसंग्रामात भाग घेण्यासाठी संघ स्वयंसेवकांच्या तुकड्या गेल्या, त्यांचे एकत्रीकरण मोतीबागेत व्हायचे.


- पद्माकर बळवंत कुलकर्णी

Powered By Sangraha 9.0