काही संस्मरणे मोतीबागेची

25 Nov 2023 19:52:24
Ravindra Shingnapurkar on Motibag

सुधीर फ डके यांच्याकडून शिकलेले गाणे, पानशेतच्या पुरानंतर मोतीबागेजवळील विहिरीवर महिनाभर असलेली गर्दी यांसह अनेक दशकांच्या आठवणी ‘मोतीबाग’ हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर येतात.

मोतीबागेच्या अनेक दशकांच्या कितीतरी आठवणी मनात साठलेल्या आहेत. त्यातली एक खूप पूर्वीची आठवण आहे, मी त्याला साक्षीदार आहे. तात्या बापट हे पुणे महानगर प्रचारक होते. त्यांनी एके दिवशी दुपारी, आम्हा पाच-सहा तरुणांना मोतीबाग येथे बोलावले. मोतीबाग प्रवेशाद्वारामधून आत गेल्यावर, समोरील ठिकाणी एक मोटार पार्किंगची शेड होती. तिथे दोन सतरंज्या घातल्या होत्या. तिथे तात्यांनी प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजींना बोलावले होते. ते एका सतरंजीवर बसले होते. आम्ही पाच जण समोर बसलो. तात्यांनी बाबूजींना एक पेटी, एक हिंदी आणि एक मराठी अशी दोन संघ गीतांची पुस्तकं आणून दिली होती. बाबजूींना सांगितले की, ‘यात चार गीते आहेत, त्यांना चाली लावा आणि त्या चाली या मुलांना शिकवा.

’खरे म्हणजे बाबूजींचे व्यक्तिमत्व मोठे होते, मात्र त्यांचा संघ म्हणून तात्या बापटांशी परिचय इतका घनिष्ठ होता की, तात्यांनी त्यांना प्रेमाची आज्ञाच केली होती. आम्हाला सांगितले त्यांच्याकडून चारही गीते शिकून घ्या आणि तात्या तेथून निघून गेले. त्यानंतर बाबूजींनी पुढच्या जवळजवळ तीन तासांमध्ये चार चाली बसवल्या आणि आमच्याकडून बसवून, अगदी घोटून घेतल्या. या चारही चाली बाबूजींनी आमच्या समोर लावल्या. त्यावेळी बाबूजी अन्य सारे विश्व विसरून गेले होते. त्यांच्या भावविश्वातील डॉ. हेडगेवार व श्री गुरुजी आम्ही पाहिले होते. ती चारही गीते या दोनी विभूतींच्या स्मरणाची होती. त्या चारही गीतांच्या चाली आजही माझ्या स्मरणात नव्हे, आंतर मनात आहेत, त्यांच्या चाली माझ्या पूर्ण स्मरणात आहेत. त्यातल्या दोन गीते ‘चाहिए आशिष माधव’ आणि ‘लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष’ ही पू. गुरुजी आणि पू. डॉक्टर यांच्यावरची होती. पुढे या दोन गीतांची डिस्क (ध्वनिमुद्रिका) तयार झाली. ही ध्वनिमुद्रिका तयार होण्यासाठी बाबूजींनी पुढाकार घेतला होता.. दिव्य ‘ध्येयकी ओर तपस्वी’ आणि ‘क्रांतदर्शी केशवांनी...‘ ही ती अन्य दोन गीते आजही सर्व परिचित आहेत.

एकदा माझ्या आठवणीप्रमाणे बहुधा ते 1968-69 वर्ष असावे. शंकराचार्य मोतीबागमध्ये आले होते. त्यावेळी महानगरातून सर्वदूर निरोप दिले होते की, शंकराचार्य मोतीबाग शाखेत येणार आहेत आणि त्यांचे संबोधन असणार आहे. त्यासाठी मोतीबागेतले सभागृह, आता ज्याला ‘मोरोपंत पिंगळे सभागृह’ असे नाव आहे ते सभागृह आणि समोरच्या बाजूला मैदान होते. ते मैदान आणि सभागृह पूर्णपणे स्वयंसेवकांनी भरले होते. हा कार्यक्रम माझ्या आठवणीत राहिला. कारण, त्यावेळी माझा मोठा योग होता, माझ्याकडून प्रार्थना सांगितली गेली होती.

मोतीबागेत सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने होत. प्रसिद्ध टीकाकार रा. शं. वाळिंबे यांची काही व्याख्याने तिथे झाल्याचे आठवते. यात आपले प्रचारक बापूराव दात्ये यांचा मोठा पुढाकार होता. बापूराव दात्ये यांनी ‘हिंदुस्तान साहित्य‘ ही वितरण सेवा ही सुरू ठेवली होती. त्याच जागेत बापूराव यांचा घोष रचनांचा अभ्यास सुरू असे. बापूराव यांनी श्रीगुरुजींचे एक तैलचित्र स्वहस्ते रेखाटले होते. ते साडेचार फुटी रंगीत चित्र आजही गुरुजींच्या मूळ गावी गोळवली येथे आहे असे वाटते.

मोतीबागेत अगदी सुरुवातीच्या काळात आपल्या काही स्वयंसेवकांनी एकत्रितरित्या चालवलेला दुधाचा व्यवसाय होता. त्याचे नाव ‘भारत दुग्धालय’. आता त्या दुग्धालयाची जागा बदलली आहे. मोतीबागेच्या कोपर्‍यात पश्चिमेला एक विहीर आहे. त्या काळीही ती विहीर इतकी थंड होती की, अगदी आजच्या फ्रीजचा अनुभव यावा. दुग्धालयात संध्याकाळी जे दूध यायचे, ते रात्रभर थंड ठेवण्यासाठी त्या थंड विहिरीचा उपयोग केला जायचा. त्यासाठी विहिरीवर एक यंत्रणा केलेली होती. त्याच्या मदतीने दुधाच्या घागरी तोंडावरती गवत बांधून विहिरीत सोडल्या जायच्या. विहिरीतले थंड वातावरण असल्याने, दूध सकाळपर्यंत अगदी छान राहायचे. सकाळी त्या दुधाचे वितरण व्हायचे. आजच्या काळामध्ये एअर कंडिशन आणि फ्रीजर आहे. मात्र, त्याकाळी ही विहीर वापरली जायची. आजही विहिरीचे वातावरण थंडगार आहे. पूर्वी मोतीबागेजवळ एक चिंचेचे झाड होते. तिथे एक मारुतीचे छोटे मंदिर होते. आता मारुती मंदिर विहिरीच्या वर व बाजूला आहे.

1983 मध्ये तळजाई येथे तीन दिवसांचे शिबीर झाले होते. त्या तीन दिवसांत विदर्भ सोडून उर्वरित महाराष्ट्र प्रांतातून 35 हजार स्वयंसेवक आले होते. त्या 35 हजार स्वयंसेवकांच्या भोजन व्यवस्थेसाठी खूप मोठमोठी पातेली, डाव, बादल्या असे सगळे वितरणासाठी नवे घेतले होते. बहुतांश भांडी अ‍ॅल्युमिनिअम किंवा पितळेची होती. तीन दिवसांचे शिबीर झाले. नंतर त्याचे काय करायचे, हा प्रश्न होता. सुरुवातीला ही सगळी मोठमोठी भांडी मोतीबागेत हॉलमध्ये आणून ठेवली होती. त्याने हॉल भरून गेला होता आणि ती भांडी आपण अत्यल्प किमतीत विकली होती. तळजाई शिबीर कार्यक्रमांच्या नियोजनापासून कार्यक्रम संपल्यानंतर सर्व व्यवस्था लावण्यापर्यंत अनेक कामे मोतीबागेत चालत.

पानशेतच्या पुराच्या वेळेची आठवण अगदी लक्षात आहे. पुरामध्ये शनिवार पेठेत सर्वदूर सर्वत्र पाणी आले होते. मोतीबागेतही दहा ते बारा फूट पाणी आले होते, कदाचित जास्तही असेल. यथावकाश पुराचे पाणी वाहून गेले. मात्र, दुसर्‍या दिवशीपासून पुणे शहराची घरोघर पाणीपुरवठ्याची सगळी व्यवस्था विस्कळीत झाली होती. अशा परिस्थितीत आसपासच्या सगळ्या घरांना मुबलक पाणी प्यायला, वापरायला लागायचे. त्या काळपर्यंत घरोघर असलेल्या विहिरी बुजवल्या गेल्या होत्या. कारण, नळाचे पाणी आले होते. त्यामुळे लोक नळावर विसंबून राहिले होते. मात्र, पानशेतच्या पुरामुळे नळाची व्यवस्था जवळपास एक महिन्यांपर्यंत विस्कळीत झाली होती. मोतीबागेतल्या विहिरीला मात्र पाणी होते. त्यामुळे या विहिरीचे पाणी घ्यायला लोकांची रीघ लागली होती आणि जवळपास महिनाभर लोक रांग लावून इथून पाणी नेत होते. त्याचे नियोजन स्वयंसेवक करीत. सेवाकार्य म्हणून...

शरद गोडसे
Powered By Sangraha 9.0