आमच्या घराचा पत्ता म्हणजे ‘316, शनिवार पेठ’ आणि ‘309, शनिवार पेठ’ हा मोतीबागेचा पत्ता. आता मोतीबाग कार्यालय अगदी घराजवळच असल्यामुळे प्रारंभीपासून घरात संघाचे वातावरण. त्यामुळे आम्ही भाऊ खरेतर मोतीबागेतच लहानाचे मोठे झालो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या वास्तूशी, तेथील शाखांशी आणि त्या काळातील अनेक आंदोलने, कार्यक्रम यांच्या असंख्य आठवणी आजही स्मरणात आहेत. या वास्तूसोबतच अनेक संघ प्रचारक, कार्यकर्ते यांच्याही आठवणी आहेत. यानिमित्ताने मोतीबागेच्या जुन्या वास्तूच्या अशाच काही रम्य आठवणी स्मृतिपटलावर आल्या.
माझ्या आठवणीत असलेली सगळ्यात जुनी आठवण आहे ती 1975 मध्ये संघबंदी काळात मोतीबाग बंद असतानाची. तो जुन्या वास्तूचा सुप्रसिद्ध दिंडी दरवाजा बंद करून बाहेर पोलीस बसलेले असायचे. बंदी उठल्यानंतर मोतीबागेची मोठ्या प्रमाणात केलेली सफाई मला आजही आठवते. त्या काळात जुन्या वास्तूत दिंडी दरवाजाजवळ स्वागत कक्ष होता आणि तेव्हा अगदी अत्यावश्यक असेल, तरच वापरला जाणारा एक काळा फोन होता. आसपास अनेकांकडे तेव्हा फोन नसल्याने हा फोनसुद्धा अनेकांचा संपर्काचा आधार होता. आयुष्यातला पहिला ट्रंक कॉल मी याच फोनवर घेतला होता.
स्वागत कक्षाच्या रेषेत कोपर्यात एक चिंचेचे झाड होते. सगळ्यात वरच्या गच्चीत जायला मिळाले, तर क्वचित चिंचा आणि शिक्षकांची बोलणी दोन्ही खायला मिळे. इथे केलेली शिबिराची तयारी, संचलनासाठी तयारी, घोष साहित्याची चकाकी आणि चंदन कार्यक्रम, कोजागिरी, मटार, उसळ असंख्य धमाल आठवणी आजही अगदी ताज्या आहेत. दिंडी दरवाजासमोर एक वाचनालय होते. त्या काळातील सर्व वर्तमानपत्रे तेथे सर्वांना वाचायला मिळत. या वाचनालयासमोर एक ‘मेटाडोर’ उभी असे. त्याच्या शेजारी असलेल्या जागेत बराच काळ महानगर कार्यालय होते. त्या पलीकडे तळघरात विहिरीकडे जाणारा जिना होता. एक विशेष आठवण अशी की, त्या काळी या नदी जवळच्या भागात 24 तास पालिकेचे पाणी येई. काही कारणाने अचानक एक दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तेव्हा संघ कार्यालयातील या विहिरीतून सर्वांना पाणी घेण्याची व्यवस्था केली गेली.
लहानपणी या वास्तूचा सर्वात खास वाटणारा भाग होता सभागृहाच्या खालील तळघराचा. इथे ठेवलेले तळजाई शिबीर पूर्वीचे राहुट्या, तंबू इत्यादी साहित्य आणि नंतरचे लोखंडी साहित्य, त्या तळघराच्या वातावरणाला साजेसेच होते. या वास्तूचा अगदी कानाकोपरा परिचित झाला तो बाल असताना इथे खेळलेल्या लपंडाव खेळाने. या वास्तूत अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रचारक वावरत असत. सरसंघचालक, प्रांत संघचालक मुक्कामी असत, पण इथली बाल शाखा मात्र कायम बहरलेली असे. इथे त्या काळात अनेक विद्यार्थी, तरुण कार्यकर्तेही मुक्कामी असत. जेवण आणि चहाच्या वेळेस एक बेल वाजत असे. पण, पूर्वी पहाटे पहाटे भट काका (प्रभाकर पंत भट) चहा करायला येत आणि चहा झाल्याची दत्ता मोहन ‘उठा...’ अशी हाळी बरोबर 5.30 वाजता देत. थंडीच्या दिवसांत ती शेजारी आमच्या घरात ऐकू येत असे.
या वास्तूत गोडवा निर्माण करण्यात पंत फडके यांच्या गोळ्या, आबा अभ्यंकर यांनी दिलेली खडीसाखर जशी महत्त्वाची, तसे प्रचारक, अधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच इथे असणारे बाबा (श्रीपाद राव) सरदेशपांडे, अशोकराव काळे, धुंडिराज पंत गोखले, दत्तोपंत म्हसकर किती नावे घ्यायची; या सार्यांनी फक्त स्वयंसेवकच नाही, तर अनेक कुटुंब जोडली. त्या त्या कुटुंबात त्यांच्या विशेष प्रसंगांत मोतीबाग वास्तूला एक आगळे स्थान निर्माण झाले. असेच नवीन वास्तूतूनसुद्धा अनेक नवे ऋणानुबंध निर्माण होवोत, हीच प्रार्थना.
शैलेश घाटपांडे