गुंफू मोत्यांच्या माळा...

25 Nov 2023 19:42:38
Nanasaheb Jadhav on Motibaug

मोतीबाग हे संघ परिवारातील कार्यकर्त्यांचे तीर्थस्थळ आहे. नव्याने जोडले जाणारे अनेक पांथस्थ या वास्तूत वास्तव्यास येणार आहेत व संघकार्यात आपले अमूल्य योगदान देणार आहेत.

कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, जोगेश्वरी देवी, लाल महाल, शनिवार वाडा, आगाखान पॅलेस ही जशी पुण्यातील धार्मिक व ऐतिहासिक तीर्थस्थाने आहेत. तसेच महात्मा फुले वाडा, केसरी वाडा ही सामाजिक तीर्थस्थळे आहेत. ‘309, मोतीबाग, शनिवार पेठ, पुणे 30’ या पत्त्यावर असलेले एक अजून तीर्थस्थळ आहे की, जे आम्हा पुणे शहरातील संघ परिवारातील कार्यकर्त्यांचे तीर्थस्थळ आहे. ही भूमी अनेक मान्यवर, कार्यकर्त्यांच्या चरण स्पर्शाने पावन झाली आहे. अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे येथे अनेक काळ वास्तव्यासाठी होते. या सर्वांनी संघाच्या अनेक बैठकातून आपल्या विचारमंथनाचे अमृत सर्व स्वयंसेवकांना दिले आहे, हे विचारमंथन स्वरुपी अमृत अनेक कार्यकर्त्यांना आपल्या क्षेत्रात मोठे कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

माझा मोतीबागाशी संबंध आला एप्रिल 1992 मध्ये. तेव्हा झालेल्या प्राथमिक शिक्षा वर्गाला शिबिरार्थी म्हणून जाण्याचा योग आला. त्यावेळी आठ दिवस तेथे मुक्काम होता. तेव्हा मोतीबागेची जवळून ओळख झाली. तेव्हा प्रसाद राव जाफराबादकर व विनायकराव सहस्रबुद्धे हे आमच्या शिबिरातील शिक्षक होते. त्यानंतर मोतीबागेवर गेल्यावर अनेक ज्येष्ठ प्रचारक भेटायचे. अजून आठवण होते, ती ज्येष्ठ प्रचारक स्व. दामूअण्णा दाते यांची त्याचे दर्शन झाले, तरी एखाद्या संताला भेटण्याचा आनंद मिळायचा. त्यांनी आपल्या विचारातून व्यक्त केलेले विचारधन मौलिक विचार अनेक कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरले. त्यांची शिस्त, स्वच्छता, टापटीप ही सर्वांना आदर्श घेण्यासारखी होती.

अजून एक आठवण येते, तेव्हा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या महाराष्ट्रशाहीर वामनराव कर्डक यांच्या भेटीची. अशक्य कोटीचे वाटणारे हे वामनदादांचे वास्तव्य मोतीबागेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले होते. त्यांना ’सामाजिक समरसता मंचा’चा ’गाडगेबाबा समरसता पुरस्कार’ देण्यात आला होता. अजून आठवण येते ती आबा अभ्यंकर, मिलिंदराव ओक, भाऊराव कुदळे, भाऊराव क्षीरसागर, यांसारख्या ज्येष्ठ प्रचारकांची. त्या सर्वांनी येथे जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध निर्माण केले व वेळोवेळी मार्गदर्शन केले, कित्येक वेळा अनेक बैठका व अभ्यास वर्ग, बौद्धिक वर्ग यांसाठी मोतीबागेत जाणे होत असते. दाजी काकांच्या हातचे जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.

जुनी वास्तू असलेल्या मोतीबागेत नवे बांधकाम झाले आहे आणि आता आधुनिक नवीन रुपात सर्वांच्या समोर येत आहे. आता अद्ययावत सभागृह, स्टुडिओ अशा अनेक सुविधांनी मोतीबाग सज्ज होत आहे. जसे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रचारकांची छायाचित्रे मोतीबागेत लावण्यात आली आहेत. तेव्हा त्यांनी केलेल्या कष्टाची समर्पणाची आठवण होते. मोतीबाग खरे तर संघाच्या मुशीत घडलेल्या अनेक मोतीरुपी कार्यकर्त्यांची बाग आहे. म्हणूनच म्हणावसे वाटते की, ’गुंफू मोत्यांच्या माळा.’ आजवर आणि पुढील काळात संघाची शताब्दी येत असताना, संघाच्या वाटचालीत नव्याने जोडले जाणारे अनेक पांथस्थ या वास्तूत वास्तव्यास येणार आहेत व संघ कार्यात आपले अमूल्य योगदान देणार आहेत.

सचिन साठ्ये
(लेखक पुणे महानगर समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह आहेत.)
Powered By Sangraha 9.0