त्या दिवसांतल्या आठवणींच्या नोंदी

25 Nov 2023 20:44:58
Article on Motibaug Written By Prakash Kshirsagar

सेवाभवनची प्रसन्न वास्तू, सकाळचा समय, आठवणींचा खजिना उघडून बसलेले दोन दिग्गज कार्यकर्ते, त्या पेटार्‍यामधून फेसाळत्या लाटेसारखे धो धो वाहणारे शब्द, मोतीबागेबद्दल किती बोलू, किती नाही, अशी त्यांची झालेली अवस्था, असे वातावरण मुलाखतीचे होते. सदानंदजी भागवत, विनायकराव डम्बीर या अनुक्रमे 81 आणि 72 वयाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, तडफ, कामाप्रति असलेली निष्ठा पाहून कोणीही प्रेरित व्हावे.

सदानंदजी भागवत

सुरुवातीला ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, नंतर पुणे जनता सहकारी बँक येथे कार्यरत असणार्‍या सदानंदजी यांना त्यांच्या काकांनी आठव्या वर्षीच संघात दाखल केले. तेव्हापासून आजपर्यंत संघात कार्यरत आहेत. मोतीबागेच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभाग असलेले सदानंदजी सांगत होते - 1967 मध्ये नूतन वास्तूचे काम झाल्यावर ती नूतन वास्तू बघायला आलेल्या कार्यकर्त्यांची रांग मोतीबागेपासून शनिवारवाड्यापर्यंत होती. पण, सर्वत्र शिस्तीचे वातावरण, शांतता होती. सवाई गंधर्व महोत्सव प्रथम येथे झाला. 1962 मध्ये देशभरात युद्धाचे वातावरण असताना सुधीर फडके यांनी समरगीते याच वास्तूत बसवून गाऊन घेतली. मोतीबागेत संघ कार्यकर्त्यांची उठबस वाढली, तरी या भागातील शाळेच्या मुली दुपारी तेथे डबा खायला, अभ्यास करायला येऊन बसत असत. विश्वासार्हता ही इथली मोठीच जमेची बाजू होती. त्यांच्या आठवणीतील मोतीबाग गोकुळासारखी भरलेले, दिवसभर गजबजलेली आहे. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, ना. ग. गोरे यांनी मोतीबागेला भेटी देऊन अनौपचारिक गप्पा मारलेल्या त्यांना आठवतात. मोतीबागेच्या वास्तूमध्ये संघकार्यानिमित्त मुक्कामी असणार्‍या महनीय व्यक्तींची नांवे, वर्णन त्यांच्याकडून ऐकताना फार सुंदर वाटले. श्रीपती शास्त्री एका खोलीत वास्तव्याला असत, त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य तेव्हा लाभले. भारतीय जनसंघाचे कार्यकर्ते, पूना इंग्लिश स्कूलमधील शिक्षक, श्रीकृष्णपंत भिडे हे मोतीबागेत मुक्कामी असले की त्यांच्यासोबत गप्पांचा फड जमल्यावर रात्रीचे भान हरपायचे.

महाराष्ट्र प्रांताच्या प्रांतप्रचारकांच्या एकमेव खोलीत विविध कार्यकर्ते जमल्यानंतर अनेक अनुभवांची देवाणघेवाण व्हायची. तात्या बापट यांची तिसर्‍या मजल्यावर जेमतेम अर्धी खोली होती, त्यात कार्यकर्त्यांच्या दाटीवाटीतच बसून गप्पा मारण्यात एक चैतन्य असायचे. सगळी वास्तू उत्साहाने सळसळत असे. सेवाभाव संघाने नेेहमीच जपला. त्यातील काही मोठ्या कामांबाबत सदानंदजी बोलले. 1963 मध्ये भवानीपेठेत टिंबर मार्केटला मोठी आग लागली. अनेकांचा रोजगार असलेले ते स्थानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले पाहून अनेक संघकार्यकर्ते तेथे मदतीसाठी धावले. मार्केट परत उभे करण्यासाठी सर्वांनी प्रयास केले. 1962 मध्ये भारत-चीनचे युद्ध झाले, तेव्हा पुणे पोलीस कमिशनर यांनी अनेक संघटनांना बोलावून शिस्तबद्ध मदतीसाठी मनुष्यबळ किती मिळेल, यासाठी विचारणा केली, अनेक संघटनांनी मोठेमोठे आकडे सांगितले. मोतीबागेतर्फे फक्त 150 कार्यकर्ते येतील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात इतर संघटनांचे अगदीच अल्पलोक, तर संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने हजर होते. ‘आधी करा, मग सांगा किंवा योग्य बोला, तेच करा’ ही मोठी शिकवण मिळाली. 1961 ला पानशेतच्या पुरात मोतीबागेत पाणी शिरले, तरी मदतीची तीच आस प्रत्येक कार्यकर्त्याकडे होती. गोवा सत्याग्रहाच्या वेळेस गोळीबारात ठार झालेल्या सत्याग्रहींचे अंत्यविधी करण्याची मोठी अवघड जबाबदारी पार पाडली.

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे पुण्यात वास्तव्य असेल, तेव्हा मोतीबागेत दामूअण्णा दाते यांच्याकडे येत असत. दामूअण्णांच्या निधनानंतर हे दोघे मुंबईवरून त्यांच्या दर्शनाला आले होते. मोतीबागेमुळे अनेकांशी संबंध वाढले, वृद्धिंगत झाले, त्यामुळे आयुष्यच समृद्ध झाले, ही त्यांची नम्र भावना. सदानंदजी यांची 1974 मध्ये दिल्लीला बदली झाली, तेथून काही महिन्यांच्या अंतराने घरी कुटुंबाच्या भेटीसाठी आले असताना ते प्रथम स्टेशनवर उतरल्यावर मोतीबागेत गेले. कारण, गेले काही महिने ते बदलीमुळे त्या वास्तूला भेट देऊ शकले नव्हते. हे ऐकताना मोतीबागेची ओढ किती प्रबळ होती, हे जाणवले. संघाचे काम निष्ठेने करणार्‍या सदानंदजी यांची एक खंत आहे, ती म्हणजे प्रचारक म्हणून फार फिरता आले नाही. त्यांनी एकदा 15 दिवसांची रजा घेऊन जामखेड गाठले. खेडोपाडी काम करणार्‍या कार्यकर्त्याचे कष्ट त्यांनी जाणून घेतले. हाच प्रयोग त्यांनी नंतर सिल्लोडला केला. शिवाय मोतीबागेला आर्थिक मदत देऊन प्रचारकांना मदत करायची, हे त्यांचे ध्येय नंतर त्यांनी अंमलात आणले. या दोन्ही प्रेरणा जामखेड, सिल्लोडमुळेच मिळाल्या, ही त्यांची प्रामाणिक भावना.

विनायकराव डम्बीर

विनायकराव हे वयाच्या आठव्या वर्षापासून शाखेत येऊ लागले. लहानपणी निव्वळ खेळण्यासाठी शाखेत येणारे विनायकराव पुढे कार्यकर्ते बनले. कार्यालय प्रमुख, या पदापासून सुरुवात करून सध्या राष्ट्रीय जनकल्याण समिती प्रांत कार्यकारिणी सदस्य पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. त्यांना श्रीपती शास्त्री, दामूअण्णा दाते, बाबाराव भिडे, तात्या बापट, सुहासराव हिरेमठ यांचा सहवास लाभला. नरेंद्रजी मोदींशी बोलण्याचा योग आला. गोळवलकर गुरूजींची सेवा करण्याची संधी मिळाली, अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. या अनेकांच्या उत्साहपूर्ण, झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे विनायकरावांच्या आयुष्याला जणू परिसस्पर्शच झाला.

1948ला बंदी आली तेव्हा अनेक कार्यकर्त्यांची नोकरी गेली, संसार उद्ध्वस्त झाले, तेव्हाचे कार्यकर्ते बाबा सरदेशपांडे यांचे मोतीबागेचे दुग्धालय अनेकांना तारणहार ठरले. दूध विक्री करून अनेकांनी आपले संसार सांभाळले. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही शिकवण मोतीबागेने प्रत्यक्षात राबवली. नंतर हे दुग्धालय बाबासाहेब देशपांडे यांनी दुसरीकडे हलवून संघाला जागा उपलब्ध करून दिली. बापूराव दातेे यांच्या ‘हिंदुस्थान साहित्य’ या पुस्तकांच्या दुकानात तेव्हा एकमेव फोन होता. वेळीअवेळी येणारे फोन घेणे, निरोप पोहोचवणे हे काम दाते यांनी आनंदाने केले. त्यांनी गुरूजींवर ‘तेजाची आरती’ हे पुस्तक लिहून प्रकाशित केले.

त्या काळात वाहनांची संख्या अगदीच नगण्य असल्यामुळे सर्व कार्यकर्ते पायी फिरत असत. जगन्नाथराव जोशी शनिवारवाड्यावर सभेला पायी जात असत, रामभाऊ म्हाळगी पायी फिरत. भारतीय जनसंघाचे प्रभाकरपंत पटवर्धन यांची ‘भगवद्गीतेतील अर्थविचार’ ही तीन दिवसांची व्याख्यानमाला मोतीबागेत झाली होती. चांगल्या आठवणींसोबतच काही दुःखद अनुभव पण विनायकरावांनी सांगितले. प.पू.बाळासाहेब देवरसांचे निधन झाले, तेव्हा त्यांचे पार्थिव मोतीबागेत ठेवण्यात आले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. 1972 मध्ये जनकल्याण समितीचे काम मोतीबागेत सुरू झाले, तेथे भरपूर मदत गोळा व्हायची, त्याचे वाटप करून लोकांपर्यंत ती मदत पोहोचवणे, दुष्काळ पडला असता प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या देणे, टँकरने पाणी देणे ही कामे तसेच लातूरच्या मांजरा नदीच्या पुनर्वसनाचे काम, अशा मोतीबागेतील विविध कामांमध्ये विनायकरावांचा आवर्जून सहभाग असायचा.

1964 साली बाबूजींनी जी नाना पालकरांची गीते बसवली, त्या ‘सरसावूनी देशाच्या उद्धरणी’ या गीताच्या कार्यक्रमात विनायकरावांनी उत्साहाने भाग घेतला. त्यावेळी मोतीबागेच्या शाखांची तीन नावे ‘प्रल्हाद सायं’, ‘प्रल्हाद प्रभात’, ‘खंडोबल्लाळ प्रदोष’ अशी होती. शनिवारी ‘मंडल’ हा कार्यक्रम असायचा, दिवाळीत बाबासाहेब पुरंदरे तीन दिवस मोतीबागेत शिवाजी महाराजांचे चरित्र सांगायचे. मोतीबागेच्या आसपास तेव्हा फक्त आठ शाखा होत्या. त्यात ओंकारेश्वरची ‘संभाजी शाखा,’ हरिहरेश्वर शाखा, नेने घाटावर ‘विश्वास सायंशाखा’ पुणे मराठी ग्रंथालयाजवळ ‘भरत शाखा’, मोदी गणपतीजवळ ‘गणेश शाखा’ होत्या, अशा अनेक आठवणी विनायकरावांनी सांगितल्या.

सदानंदजी, विनायकरावांची स्मरणशक्ती, ओघवती वाणी, शारीरिक क्षमता आजही संघाच्या शाखेत जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची इच्छा, या सार्‍याला प्रणाम!

सुलभा राजीव कुलकर्णी
Powered By Sangraha 9.0