रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे सूत्रधार, हिंदुभाव जागरणाचे शिल्पकार, अनेक सामाजिक संस्थांचे संस्थापक मा. मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारे, रवींद्र गोळे लिखित, ‘विवेक’ प्रकाशित ’योजक संघमहर्षी’ या ग्रंथाचे प्रकाशन सोमवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबईतील विलेपार्ले (पू) येथील पाटीदार मंडळ सभागृहात रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक व उद्योजक बिमल केडिया व ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, पद्मश्री रमेश पतंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथाची प्रस्तावना देत आहोत.
‘योजक संघमहर्षी’ हा माननीय मोरोपंत पिंगळे यांचा चरित्रग्रंथ. मोरोपंत पिंगळे १९४२ पासून संघ प्रचारक राहिले. संघकार्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. अशा प्रकारे जीवन समर्पित करून संघकार्य करणारे असंख्य प्रचारक आहेत. अशा प्रचारकाचे जीवनचरित्र लिहिणे, हे चरित्रग्रंथ प्रकारातील सर्वात अवघड काम आहे.
चरित्रनायकाचे चरित्र लिहीत असताना नायकाचे जीवन घटनाप्रधान असावे लागते. सामाजिक चळवळ, राजकीय चळवळ, धार्मिक चळवळ आणि ज्या क्षेत्रात त्याचे भरीव काम असते, योगदान असते, ते मांडावे लागते. चरित्रनायकाची भाषणे, लेख, पुस्तके यांचा आढावा घ्यावा लागतो. चरित्र त्याचेच लिहिले जाते, ज्याचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रांतील योगदान असामान्य असते. सामान्य माणसाची चरित्रे कुणी लिहीत नाही.
या कसोट्या जर लक्षात घेतल्या, तर जीवनव्रती संघ प्रचारकांच्या संपूर्ण आयुष्यात वरील दिलेले योगदान शोधून काढणे महाकठीण काम आहे. सामान्यपणे संघ प्रचारकांचा दिनक्रम कसा असतो? रोजची शाखा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठक, समाजाशी संपर्क, स्वयंसेवक करीत असलेल्या कामांना भेट हे आठवड्याचे २४ तास सात दिवस चालू असते. वर्षानुवर्षे हेच काम चालू राहते. त्यात तोचतोचपणा असतो. नाट्यमय घटना, प्रसंग अपवादाने निर्माण होतात. नाट्यमय घटना, प्रसंग असले की चरित्र रंजक होते. प्रचारकाच्या जीवनात असे प्रसंग शोधणे फार अवघड आहे.
तरीही संघसृष्टीत असे काही प्रचारक होऊन गेले, ज्यांचे कार्यकर्तृत्व न पुसता येणारे आणि सर्व पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असे झाले आहे. काहींची नावे सांगायची, तर बाबासाहेब आपटे, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे, दत्तोपंत ठेंगडी, पं. दीनदयाळ उपाध्याय. राजकीय क्षेत्रातील अटलबिहारी वाजपेयी, सुंदरसिंग भंडारी, नानाजी देशमुख अशांची नावे घ्यावी लागतात. वरील प्रचारक आणि त्यांच्यासारखे तुल्यबळ प्रचारक यांच्याविषयी पुस्तके लिहिली गेली आहेत. मोरोपंत पिंगळे यांच्याविषयी एक विशेषांक आणि दोन स्मृतिग्रंथ महाराष्ट्रात प्रकाशित झाले आहेत. त्याचा आधार घेऊन मोरोपंतांचा सहवास ज्यांना लाभला, त्यांच्याशी चर्चा करून हा चरित्रग्रंथ रवींद्र गोळे यांनी सिद्ध केला आहे.
या ठिकाणी आणखी एका शब्दाचा विचार केला पाहिजे. हा शब्द आहे ‘प्रचारक.’ ‘प्रचारक’ आणि ‘संन्यासी’ हे तसे समानार्थी शब्द आहेत. ‘संन्यासी’ हा शब्द अतिशय प्राचीन आहे. सांसारिक मोहपाशाचा त्याग करून, जो अंतिम सत्याच्या शोधार्थ स्वेच्छेने वनवास पत्करतो, त्याला ’संन्यासी’ म्हणतात. संन्यासी परंपरेप्रमाणे काही संप्रदायांत संन्यासी डोक्याचे मुंडन करतात आणि भगवी वस्त्रे परिधान करतात. संन्याशाची संपत्ती म्हणजे अंगावरचे कपडे, पादत्राणे आणि भिक्षापात्र. संन्यासी एका जागी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ राहत नाही. साधनेच्या एका टप्प्यावर तो निर्मोही होतो. त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. मृत्यूचे आणि संपत्तीनाशाचे भय सामान्य माणसाला भयंकर असते. संन्यासी मृत्यूवर मात करून उभा राहतो आणि संपत्तीनाशाचे भय त्याला शिवू शकत नाही.
‘प्रचारक’ ही संज्ञा अलीकडची आहे. संघात १९४२ साली तिचा उगम झाला. श्रीगुरुजींनी संघासाठी म्हणजे समाजासाठी आपल्या आयुष्यातील काही वर्षे देण्याचे आवाहन केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून देशातून हजारो तरूण प्रचारक निघाले. त्यातील काही जण पाच-दहा वर्षे काम करून पुन्हा गृहस्थी जीवनात गेले, तर काही जण आजन्म प्रचारक राहिले. मोरोपंत त्यातील एक होते. सामान्य माणसे जो पोशाख घालतात, तो प्रचारकाचा पोशाख असतो. अंगावरील वस्त्रे आणि पादत्राणे हीच त्याची संपत्ती. संन्यासी भिक्षा मागून पोट भरतो. प्रचारकाचे भोजन कार्यकर्त्याच्या घरी असते. संन्यासी ईश्वरप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी संन्यासी होतो. त्याचे संन्यासी होणे, हे व्यक्तिगत सर्वोच्च सुख प्राप्त करण्यासाठी असते. प्रचारक व्यक्तिगत सर्वोच्च सुखाविषयी उदासीन असतोे. समाजाचे उत्थान झाले पाहिजे, ही त्याची मनोकामना असते. त्याचा देव, धर्म आणि साधनामंत्र एकच असतो, तो म्हणजे भारतमाता की जय, राष्ट्र प्रथम, अन्य सर्व गोष्टी दुय्यम हाच त्याचा जीवनमार्ग असतो.
मोरोपंत पिंगळे हे अशा मार्गाचे प्रचारक होते. या मार्गावरून चालताना मोरोपंतांनी व्यक्तिगत नाममाहात्म्य वाढावे, म्हणून शून्य गोष्टी केल्या. ते दिव्य प्रतिभेचे धनी होते. एखादी भव्य संकल्पना मांडणे खूप सोपे असते. त्याचा कृती आराखडा तयार करणे अतिशय अवघड काम असते. मोरोपंत असे कर्मयोगी होते. आज अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे. पिढ्यान्पिढ्यांचे हे स्वप्न मोरोपंतांच्या प्रतिभेने साकार झालेले आहे. हा इतिहास आहे; पण तो अज्ञातच राहणारा आहे. या पुस्तकात त्याची झलक अनुभवता येईल. लुप्त सरस्वती नदीचा शोध हेदेखील मोरोपंतांचे अफाट कार्य आहे. आर्य आक्रमण सिद्धांत कायमचा गाडून टाकण्याचे काम या संशोधनाने केले. ‘गोरक्षण’, ‘गोविज्ञान’ याविषयी आज प्रचंड जागृती झालेली आहे. या जागृतीचे शिल्पकार आहेत-मोरोपंत पिंगळे. ते कसे आहेत, ते या चरित्रग्रंथातून कळेल. १९४८च्या संघबंदीनंतर महाराष्ट्रातील संघकाम खूप मागे गेले. त्याचे पुनर्बांधणी करण्याचे कष्टसाध्य काम मोरोपंतांनी केले. आणीबाणीचा कालखंड लोकशाहीचा गळा घोटणारा कालखंड होता. मोरोपंत आणीबाणीविरुद्धच्या लढ्याचे सेनापती होते.
वरील परिच्छेदात सांगितलेली सगळी कामे मोरोपंतांनी केली; पण श्रेयनामावलीत आपले नाव कुठेच येणार नाही, हे त्यांनी कटाक्षाने पाहिले. सर्व काही करून सर्वांपासून अलिप्त राहणे, हे मोरोपंतांसारख्या प्रचारकांचे लक्षण असते. अयोध्येत राम मंदिर उभे राहावे म्हणून ज्या रथयात्रा निघाल्या आणि त्याच्यापूर्वी जी एकात्मता यात्रा निघाली, त्यांच्या योजना मोरोपंतांच्याच होत्या; पण ते रथावर कधी आरूढ झाले नाहीत. त्यांनी कोणत्याही ठिकाणी भाषण केले नाही. भगवद्गीता याला ‘निष्काम कर्मयोग’ म्हणते.
मोरोपंत जसे कर्मयोगी होते, तसे भक्तियोगी होते. मातृभूमीची भक्ती त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केली. मातृभूमीचे संतान असलेल्या दीनदुबळ्या, वंचित समाजासाठी त्यांनी केलेले कार्य असेच अनामिक आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उभ्या असलेल्या वनवासी विकास प्रकल्पातील मोरोपंतांचे योगदान न मोजता येणारे आहे. मातृभूमीची सेवा म्हणजे भूमीच्या संतानांची सेवा, हीच मातृभूमीची सेवा असते. मोरोपंतांनी यावर भाषणे केली नाहीत; पण कृती आराखडा त्यांनी तयार केला. भटके-विमुक्त समाजात काम सुरू झाल्यानंतर यमगरवाडी प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली होती. प्रकल्प उभा राहण्यासाठी जे बळ लागेल, ते त्यांनी प्राप्त करून दिले.
मोरोपंत पिंगळे ज्ञानयोगी होते. भगवद्गीतेमध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती या योगांचा समन्वय साधण्यात आला आहे. मोरोपंत पिंगळे या तिन्ही योगांची समन्वय मूर्ती होते. महाराष्ट्रात आणि देशभर त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. प्रकल्प म्हणजे चुना-विटांच्या इमारती नाहीत किंवा यंत्रवत काम करणारे कार्यकर्ते नाहीत. त्यामागे जीवंत विचार असावा लागतो. तो ज्ञानसाधनेतून येतो. मोरोपंतांचे ज्ञान हे अतिशय सूक्ष्म होते. हिंदू राष्ट्र म्हणजे काय? हिंदू समाजाच्या श्रद्धा कोणत्या आहेत? त्याच्यातील सुप्त चैतन्य जागृत करण्यासाठी या काळात काय केले पाहिजे? इतिहास संशोधन, सरस्वती शोध यातून नेमके काय साधायचे आहे? याचे सर्वश्रेष्ठ ज्ञान त्यांच्याकडे होते. या अर्थाने ते ज्ञानयोगी होते.
मोरोपंत जसे ज्ञानयोगी होते तसेच भक्तियोगीदेखील होते. अनेकदा ज्ञान हे शुष्क असते आणि अनेकदा कर्मदेखील तांत्रिक व यंत्रवत असते. ज्ञानाला आणि कर्माला भक्तीची जोड लागते. त्यामुळे ज्ञानाधारित कर्म हे भक्तिरसात बुडून जाते. भक्तीमध्ये प्रेम आहे, वात्सल्य आहे, समर्पण आहे, मी-तूपणाची बोळवण आहे, निर्मोहित्व, निरहंकार, अमानित्व, असे अद्भुत गुण ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या त्रिवेणी संगमातून प्रकट होतात. मोरोपंत पिंगळे हे या तिन्ही योगांचा समन्वय होते.
या ग्रंथाचे नाव ‘योजक संघमहर्षी’ असे आहे. मोरोपंत पिंगळे हे महर्षी आहेत. पण, ते अध्यात्मातील महर्षी नसून संघकार्यातील महर्षी आहेत. संघकार्य ही म्हटली तर आध्यात्मिक साधना आहे. पण, ती व्यक्तिगत पातळीवर राहत नाही, तर ही संघसाधना आहे. मोरोपंत या साधनेतील योजक होते. योजनेची तपशीलवार आखणी मोरोपंतांनी करावी, योजनेच्या कारवाईचा आराखडा त्यांनीच करावा आणि शेकडो नव्हे, तर हजारो कार्यकर्त्यांच्या संघप्रयत्नांतून कार्यसिद्धी करावी, हे मोरोपंतांचे यश आहे. अफाट, असामान्य असे शब्दही हे यश व्यक्त करण्यास अपुरे ठरतील, असे मला वाटते.
अशा योजक संघमहर्षींचा चरित्रग्रंथ लिहिणे, हे खरोखरच कठीण काम आहे. ‘विवेक’ने हे काम स्वीकारले आणि त्याचे दायित्व रवींद्र गोळे यांच्याकडे दिले. त्यांनी दोन-अडीच वर्षे अतिशय मेहनत घेऊन, प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून, मोरोपंतांच्या उपलब्ध साहित्याचा अभ्यास करून हा चरित्रग्रंथ सिद्ध केला आहे. तो परिपूर्ण झाला आहे, असा त्यांचाही दावा नाही आणि प्रकाशक म्हणून ‘विवेक’चाही दावा नाही, तरीसुद्धा हा ग्रंथ संघकार्यातील एका उत्तुंग व्यक्तित्वाचा स्वयंसेवकांना जसा परिचय करून देणारा ठरेल, तसाच संघाबाहेरील लोकांनादेखील संघ समजून घेण्यास साहाय्यक ठरेल, असे वाटते.
(पुस्तकाची मूळ किंमत ५००/- रुपये असून, सवलतीत ३५०/- रुपयाला उपलब्ध आहे. नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६२३०२)