आज रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाली कार्तिक पौर्णिमा असल्याने वैकुंठ चतुर्दशीच्याच दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ होतो. रात्रीमानाचे पाच भाग केले असता, सूर्यास्तानंतरच्या पहिल्या भागाला ‘प्रदोषकाल‘ म्हणतात. यावर्षी या कालात कार्तिक पौर्णिमा आहे. म्हणून रविवारीच ’त्रिपुरारी पौर्णिमा‘ आहे. त्यानिमित्ताने ’त्रिपुरारी पौर्णिमे‘शी निगडित विविध आख्यायिका आणि या पौर्णिमेचे महात्म्य सांगणारा हा लेख...
त्रिपुरारी पौर्णिमेला ‘त्रिपुरी पौर्णिमा‘ असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणार्या त्रिपूर राक्षसाची तीन पुरे जाळून त्याला ठार केले म्हणून या पौर्णिमेला ’त्रिपुरी’ किंवा ’त्रिपुरारी पौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात दिवे लावावेत, दीपदान करावे, गंगास्नान करावे आणि कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यावे असा विधी आहे. निरनिराळ्या देवस्थानांत ज्या दगडी दीपमाळा असतात, त्याही या दिवशी दिवे लावून पाजळतात. या दीपोत्सवाला ’त्रिपुर पाजळणे’ असे म्हणतात.
पौर्णिमांचे महत्त्व
शुक्ल प्रतिपदेपासून चंद्रकोर प्रकाशाने वृद्धिंगत होत जाते. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चंद्रबिंब प्रकाशमान होते. भारतीय सण-उत्सवात पौर्णिमांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. प्रत्येक महिन्याचा पौर्णिमेचा दिवस हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती येते. स्वामीनिष्ठा ही हनुमानापासूनच शिकावी. बलोपासनेचे महत्त्व हनुमानापासून समजून घ्यावे. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा येते. प्रेम-अहिंसा-शांतीच्या संदेशाची शिकवण हा दिवस देत असतो. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा येते. वटवृक्षाचे महत्त्व सांगणारा हा दिवस पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारा असतो. आषाढ पौर्णिमा गुरू- शिष्याच्या नात्याची महती सांगत असते. श्रावण पौर्णिमा ही रक्षाबंधन सणाने बहीण-भावाच्या प्रेमाची साक्ष पटवून देत असते. हिंदुस्थानला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. मच्छीमारीच्या व्यवसायावर अनेक लोक गुजराण करीत असतात. अन्न देणार्या सागराविषयी कृतज्ञता नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजन करून व्यक्त केली जाते. भाद्रपद पौर्णिमेला प्रोष्ठपदी पौर्णिमा येते. यादिवशी आपल्या आजोबांच्या पूर्वीच्या पूर्वजांचे श्रद्धेने श्राद्ध करून श्रद्धांजली अर्पण केली जाते. आश्विन पौर्णिमा कोजागरी पौर्णिमेला घेऊन येते. यादिवशी सदैव सर्वच बाबतीत जागृत राहण्याचे महत्त्व लक्ष्मी पटवून देत असते. पावसाळा संपलेला असतो. वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि आकाश निरभ्र असल्याने पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याचा आनंद कोजागरी पौर्णिमेच्या रात्री अनुभवता येतो.
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा येते, या दिवशी भगवान शंकरांने त्रिपुर राक्षसाला ठार मारले. शंकराच्या या पराक्रमाला ’त्रिपुर विजय’ म्हणतात. यादिवशी शंकरापुढे दीप लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्तजयंती येते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची म्हणजे श्रीदत्तात्रेयाची जयंती या दिवशी साजरी केली जाते. निर्मिती, पालन आणि अशुभाचा लय करणारी ही शक्ती असल्याचे मानले जाते. पौष पौर्णिमेला ’शाकंभरी पौर्णिमा’ म्हणतात. या दिवशी शाकंभरी देवीचा उत्सव साजरा केला जातो. माघ पौर्णिमेच्या दिवशी नवान्न भक्षण केले जाते आणि फाल्गुन पौर्णिमेला ’हुताशनी पौर्णिमा’ येते. रात्री होलिका प्रज्वलित केली जाते. शिशिर ऋतूमध्ये होणार्या पानगळीमुळे जमिनीवर पडलेली पाने एकत्र करून जाळली जातात. परिसर स्वच्छ केला जातो. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी रंगांची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला जातो. अशारितीने संपूर्ण वर्षातील प्रत्येक पौर्णिमा प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य, आनंद आणि समाधान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असते.
त्रिपुर राक्षसाची कथा
त्रिपुरारारी पौर्णिमेसंबंधी दोन कथा आहेत. त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर माग असे सांगितले. त्रिपुराने देवता, मनुष्य, निशाचर, स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊ दे आणि त्यांच्यापासून अभय मिळावे, असा वर मागितला. ब्रह्मदेवाने त्यावर ‘तथास्तु‘ म्हटले. ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुरासुर भलताच माजला. त्याची तीन पुरे होती. ती आकाशसंचारी होती. त्रिपुर त्या पुरात बसून त्रैलोक्याला त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासामुळे सर्व देव वैतागले आणि भगवान शंकराला शरण गेले. भगवान शंकरानी त्याची तीन आकाशसंचारी पुरे जाळून टाकली आणि त्रिपुरासुराला ठार मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली घडली. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाली असेल, त्या पौर्णिमेला ‘त्रिपुरारी‘ किंवा ‘त्रिपुरी पौर्णिमा’ असे नाव मिळाले. लोक त्या दिवसापासून दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाली दीपोत्सव करून त्रिपुरसंहाराचा आनंद व्यक्त करू लागले.
दुसर्या एका कथेप्रमाणे, तारकासुर नावाच्या राक्षसाला ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे तीन पुत्र होते. मयासुराने या तीन पुत्रांसाठी तीन पुरे बनवून, या तिघांना ती दिली. मयासुराने ही पुरे देताना त्याना बजाविले की, ‘तुम्ही कधीही देवांच्या वाटेला जाऊ नका. तसेच देवांचा कधीही अनादर करू नका.’ परंतु, कालांतराने या तिन्ही पुराधिपतींची बुद्धी चळली. त्याना दुर्बुद्धी सूचली. ते देवांना त्रास देऊ लागले. सर्व देव भगवान शंकराला शरण गेले. शंकराने या तिन्ही राक्षसांशी युद्ध करून, त्यांच्या त्रिपुरांचे दहन केले. त्यामध्येच ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या तिन्ही राक्षसांचा अंत झाला. त्यानंतर लोक ’आनंदाप्रीत्यर्थ दीपोत्सव’ करू लागले.
कार्तिक पौर्णिमेचा दिवस उत्तर प्रदेशात ‘स्कंदजयंती’ म्हणून मानतात. यादिवशी स्कंदमूर्तीची ( कार्तिकेयाची ) पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्रात असताना जर स्कंदाचे ( कार्तिकेयाचे ) दर्शन घेतले, तर ते महापुण्यकारक असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावर्षी रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.५३ वाजल्यापासून सोमवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३५ वाजेपर्यंत हा कार्तिकस्वामी दर्शनाचा योग आहे. भारतातील सर्व कार्तिकस्वामी मंदिरात या वेळात भाविक जाऊन दर्शन घेतात.
कार्तिकेय हा शिव-पार्वतीचा पुत्र. कृत्तिका त्याच्या माता ठरल्या म्हणून त्याला ’कार्तिकेय’ हे नाव पडले. याला सेनानी, षडानन, विशाख, शिखिवाहन, षाण्मातुर, कुमार, स्कंद इत्यादी नावेही आहेत. गणेशापूर्वी याची उपासना सुरू झाली, त्यावरून तो गणेशाचा मोठा बंधू समजला जातो. स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन इतरवेळी घेऊ नये, अशी समजूत फक्त महाराष्ट्रात आढळते. महिला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कृत्तिका नक्षत्रात असताना फक्त दर्शन घेतात.
भगवान शिव
त्रिपुरारी पौर्णिमा ही शिवमंदिरांसमोरील दीप पाजळून साजरी केली जाते. हा भगवान शंकराचा विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. पुराणकथांमध्ये सांगितले गेल्याप्रमाणे भगवान शंकरांनी आणि देवीने अनेक दुष्ट राक्षसांना ठार मारले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीतला शिव हा एक तमोगुणी देव आहे. कैलासावर वास्तव्य असणार्या या शंकराची पत्नी पार्वती आणि गजानन-षडानन हे पुत्र आहेत. नंदी हे शंकराचे वाहन असून, भैरवादी गण हे सेवक आहेत.
शिव म्हणजे मंगलमय, कल्याणस्वरूप सदाशिव तत्त्व आहे. जो प्रकाशतो-तो शिव होय. हा स्वतः प्रकाशित राहून संपूर्ण विश्वालाही प्रकाशित करतो, अशी श्रद्धा आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव म्हणून संबोधला गेला आहे. वैदिक आर्य शिवाला रुद्र म्हणून ओळखत होते. अथर्ववेदात रुद्राचा व्रात्यांशी घनिष्ठ संबंध दाखविलेला आहे. यजुर्वेदाच्या रुद्राध्यायात रुद्राला ’व्रातपती’ म्हटलेले आहे. यालाच पुढे ’महादेव’ असेही म्हटले आहे. हा महादेव योगमार्गी किंवा योगसिद्ध होता. म्हणून शिव हा योगमार्गाचा प्रणेता म्हणून ओळखला जातो. स्वतः शिव ‘महायोगी’ असल्याचा उल्लेख महाभारतात आहे.
पशुपती हे रुद्राचे आणखी एक विशेषण आहे. रुद्राला ‘शिव’, ‘शिवतर’, ‘शंकर’ ही कल्याणकारी नावे आहेत. पौराणिक शिवाची केदार, श्रीशैल, त्र्यंबक, अमरनाथ, भीमाशंकर इत्यादी क्षेत्रे ही पर्वतांवरच आहेत. रुद्राला ‘त्र्यंबक’ हे नाव यजुर्वेदातच मिळाले आहे. वैदिक साहित्यात ‘अंब‘ या शब्दाचा अर्थ ’पिता’ असा आहे. त्यामुळे त्र्यिंबक हा तीन पित्यांचा पुत्र ठरतो. शैव पुराणात त्र्यंबक या नावावरून अनेक कथा आहेत.
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाची उपासना केवळ मानवच करीत नसून देव आणि दानव हेही शिवाचे उपासक होते. रावण, बाणासुर हे दैत्य परम शिवभक्त होते. विष्णू आणि शिव यामध्ये फरक असा आहे की, विष्णूने कोणत्याही दैत्याला वर दिलेला नाही. परंतु, शिवाने अनेक दैत्यांनाही वर दिले आहेत. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले विष सर्व जगाला जाळीत सुटले, तेव्हा सर्व देव शिवाला शरण गेले. जगाला संकटमुक्त करण्यासाठी शिवाने ते हालाहल प्राशन केले. त्यामुळे त्याचा गळा काळानिळा झाला. शिवाने मदनाला जाळल्याचीही एक कथा आहे.
दा. कृ. सोमण
(लेखक ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत.)
dakrusoman@gmail.com