वाढवण बंदर प्रकल्पामुळे भूमिपुत्रांना मोठ्या रोजगार संधी - रविंद्र चव्हाण

24 Nov 2023 20:49:53
Ravindra Chavan on wadhwan Bandar


मुंबई
: वाढवण बंदर प्रकल्प हा केवळ राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे भूमिपुत्रांना मोठ्या रोजगार संधी मिळतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

वाढवण बंदर प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवारी रात्री मंत्रालयात पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. या बैठकीला खासदार राजेंद्र गावित, आमदार निरंजन डावखरे, राजेश पाटील, विनोद निकोले, श्रीनिवास वनगा, ज्ञानेश्वर म्हात्रे, हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, सुनिल भुसारा, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जवाहरलाल नेहरु प्राधिकारणाचे अध्यक्ष संजय शेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्राधिकारणाचे अध्यक्ष शेठी यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचे सादरीकण केले. त्या माध्यमातून प्रकल्पाचा आराखडा, मूळ उद्देश, भविष्यात प्रकल्प उभारणीचे टप्पे, बंदर उभारणीसाठी केलेला अभ्यास आदी सर्व बाबींची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपले काही मुद्दे यावेळी मंत्री चव्हाण यांच्यासमोर मांडले. वाढवण बंदर प्रकल्पाच्या अनुषंगाने येत्या २२ डिसेंबर २०२३ रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणी पूर्वी सादरकीरणाचा अभ्यास करुन एक बैठक आयोजित करण्यात येईल, असे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

स्वयंरोजगाराच्याही संधी

 
हा प्रकल्प केवळ राज्याच्या हिताचा नाही, तर देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील भूमीपुत्रांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या संधीही यानिमित्ताने मिळतील. येथील एकही प्रकल्पबाधित विस्थापित होणार नाही व त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात येईल.

- रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री



Powered By Sangraha 9.0