काँग्रेसची ‘पनौती’ आणि भाजपची ‘विकासनीती’

23 Nov 2023 21:27:00
BJP's 'Development Policy'

उद्या सोनियाजी या राजीव गांधी यांच्याशी विवाह करून गांधी कुटुंबात आल्यानंतर संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू, तर इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची हत्या झाली. सबब सोनिया गांधी यादेखील राहुल गांधी यांनी ‘जो’ शब्द वापरला ‘त्या’ ठरतात; असे म्हटले तर आज ‘पनौती’ शब्दावरून नाचणारे लोक शहाणपणा शिकवण्यास पुढे येतील. मात्र, सोनिया गांधी यांच्या ‘मौत का सौदागर’ या शब्दापासून जोरदार दणका बसलेले काँग्रेसजन अद्याप सुधारत नसतील, तर खरोखरच अवघड स्थिती आहे.

भाजपने गुरुवारी सकाळीच आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्याचे कव्हर फोटो बदलला. या फोटोवर पार्श्वभागावर अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा फोटो आणि ‘जय श्रीराम - २२ जानेवारी २०२४’ असे लिहिले आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचेही फोटो आहेत. याद्वारे भाजपने आपला अजेंडा स्पष्ट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर दि. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा झाला की, दि. ३१ जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रकाशित होईल. त्यानंतर दि. १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर होऊन, त्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा केली जाईल. त्यादृष्टीने भाजपने आपला ‘हिंदुत्वासह विकास’ हा अजेंडा स्पष्टपणे मांडला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप गत दहा वर्षांतील सर्वांगीण विकासासह अगदी जनसंघाच्या काळापासून असलेल्या दोन मुख्य विषयांची ’कलम ३७०’ हटविणे आणि अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारणे, यांची पूर्तता झाल्याचा प्रचार अतिशय आक्रमकतेने करणार, यात कोणतीही शंका नाही. त्यासाठीच भाजपने ‘एक्स’वरील कव्हर फोटोमध्ये बदल करून रणनीती राबविण्यास प्रारंभदेखील केलेला दिसतो.

त्याचवेळी लोकसभा निवडणूक असल्याने प्राणप्रतिष्ठेनंतर श्रीरामललाच्या दर्शनावर बंदी घालावी, अशी आचरट मागणी करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा अथवा तशी जाहीर मागणी करण्याचा बिनडोकपणा विरोधी आघाडी (केवळ राजकीय आघाडीच नव्हे!) करण्याचीही सर्वाधिक शक्यता आहे. कारण, स्वतःहून आपल्या पायावर धोंडा कसा पाडून घ्यावा, हे त्यांना चांगले जमते. त्यामुळेच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी क्रिकेट ’विश्वचषका’च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव होण्यास ‘पनौती’ नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. खरे तर त्यात राहुल गांधी यांची चूक नाही. कारण, समाजमाध्यमांवरील एका गटासह देशातील पुरोगामी म्हणवणार्‍या टोळीने हा बालिश प्रकार सर्वप्रथम सुरू केला. ही टोळी सध्या एवढी नैराश्यात आहे की, ’विश्वचषक’ पराभवास पंतप्रधान मोदी जबाबदार आहे, हे ’नरेटिव्ह’ चालविल्यास त्यांचा व भाजपचा पराभव करता येईल, असे त्यांना खरोखरच वाटते. राहुल गांधी यांचे सल्लागारही त्यातलेच असण्याची शक्यता असल्याने, त्यांनी राहुल यांना ताबडतोब तसे बोलण्यास भाग पाडले असावे. त्यानुसार कोणताही विचार न करता राहुल यांनीही ते वक्तव्य केले असावे. मात्र, उद्या सोनियाजी या राजीव गांधी यांच्याशी विवाह करून गांधी कुटुंबात आल्यानंतर संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू तर इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची हत्या झाली. सबब सोनिया गांधी यादेखील राहुल गांधी यांनी ‘जो’ शब्द वापरला ‘त्या’ ठरतात; असे म्हटले तर आज ‘पनौती’ शब्दावरून नाचणारे लोक शहाणपणा शिकवण्यास पुढे येतील. मात्र, सोनिया गांधी यांच्या ‘मौत का सौदागर’ या शब्दापासून जोरदार दणका बसलेले काँग्रेसजन अद्याप सुधारत नसतील, तर खरोखरच अवघड स्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपुढे केवळ आचरट वक्तव्यांचेच नव्हे, तर ‘नॅशनल हेराल्ड’ घोटाळ्याचेही आव्हान आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (एजेएल)ची ७५० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्याच्या ’ईडी’च्या ताज्या निर्णयाविरुद्ध राजकीय लढाई लढण्याचा आपला इरादा स्पष्ट करत, काँग्रेसने कायदेशीर आघाडीवर दीर्घ लढाईची तयारीदेखील सुरू केली आहे. ’ईडी’च्या या कारवाईला कायद्यानुसार, चुकीचे ठरवून मोदी सरकारचे सुडाचे राजकारण, असे संबोधणारा पक्ष कायदेशीर प्रक्रियेद्वारे मालमत्ता जप्त करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ कायदेशीर सल्लागारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली अनेक अनुभवी कायदेशीर रणनीतीकारांच्या पथकाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या या कायदेशीर लढ्याला बळ देण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ राज्यसभा खासदार कपिल सिब्बलही यात अप्रत्यक्ष पाठिंबा देणार असल्याचीही चिन्हे आहेत. ही बाब पक्षाच्या प्रमुख मालमत्ता आणि वारशाशी संबंधित असल्याने काँग्रेस कायदेशीर लढाईत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे सिंघवी यांच्याशिवाय पी चिदंबरम, मनीष तिवारी, विवेक तंखा, सलमान खुर्शीद आदींसह काही व्यावसायिक नामवंत वकिलांचीही मदत घेतली जाणार आहे.

‘नॅशनल हेराल्ड’ घोटाळा प्रकरण हे काँग्रेससाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे. कारण, या प्रकरणात काँग्रेस पक्षासह गांधी कुटुंबही अडकल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणावर तपास यंत्रणा अतिशय सविस्तर तपास करत आहेत. याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेला युक्तिवाद फारच मनोरंजक आहे. ते म्हणतात की, ”मोदींनी माझ्या पक्षाच्या वृत्तपत्रांची आणि काँग्रेसची संपत्ती जप्त केल्याचे मला वाईट वाटत आहे. ही संपत्ती कोणा एका व्यक्तीची नसून, पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे वृत्तपत्र काढले होते, जे स्वातंत्र्यसैनिकांचा आवाज बनले होते. काँग्रेसला यामुळे भीती वाटेल, तर तो चुकीचा विचार आहे. काँग्रेस कधीही घाबरणार नाही आणि शेवटपर्यंत लढणार आहे.”
आता खर्गे यांच्या दाव्याप्रमाणे ‘नॅशनल हेराल्ड’ हे जर स्वातंत्र्यसैनिकांचा आवाज वगैरे होते, तर त्याच्या संपत्तीची अतिशय चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली नसती. त्यातच या प्रकरणात हरहुन्नरी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अचूक कायदेशीर मेख मारून ठेवली आहे. या प्रकरणात आणखी बराच तपास होऊन, अनेक खुलासे व्हायचे आहेत. काँग्रेस पक्षाच्या भाटांना नसले तरी काँग्रेस पक्षाला या प्रकरणाचे गांभीर्य चांगलेच माहिती आहे. त्यामुळेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ’ईडी’ चौकशीवेळी पक्षाने एवढा थयथयाट केल्याचे दिसून आले होते.

त्याचवेळी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्ष अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. ते पाच वर्षं सत्तेत होते, तरीदेखील आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असे वक्तव्य करण्यास काँग्रेस आणि गेहलोत तयार नाहीत. अशी स्थिती असताना काय होणे अपेक्षित आहे? असे अतिशय सूचक वक्तव्य केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी भाजपच्या ’पत्रकार दिवाळी मिलन’ कार्यक्रमात पत्रकारांशी गप्पा मारताना केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजेश पायलट यांनी गांधी कुटुंबास आव्हान देऊन पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली आणि त्याची शिक्षा आता सचिन पायलट यांना काँग्रेस नेतृत्व देत आहे, असे वक्तव्य करून सचिन पायलट यांच्या मुस्कटदाबीस वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे यावेळी पायलट समर्थक गुज्जर मतपेढी भाजपकडे सरकल्यास ते आश्चर्य ठरणार नाही.
 
Powered By Sangraha 9.0