मुंबई : "सध्या बँकांमध्ये जास्त व्याज देऊन ठेवी मिळविण्याची स्पर्धा सुरू आहे. मायक्रो फायनान्स संस्था (एमएफआय) ग्राहकांकडून जास्त व्याज आकारत आहेत. हे वित्तीय क्षेत्रातील घटकांनी हे टाळावे." अशी सूचना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकाना केले आहे. ते फिक्की-आयबीए बँकिंग परिषदेत संबोधित करत होते.
पुढे बोलताना शक्तिकांत दास म्हणाले की, "सध्या चिंतेचे कारण नाही, परंतु याबद्दल जास्त उत्साही होण्याची गरज नाही. बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांनी (एनबीएफसी) त्यांच्या सतर्कतेकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक क्षेत्रातील स्थैर्याला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने असुरक्षित कर्जांबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गृहनिर्माण, वाहन कर्ज आणि छोट्या व्यवसायांना दिलेली कर्जे यांना पूर्णपणे सूट देण्यात आली आहे कारण ते देशाच्या आर्थिक विकासात सकारात्मक भूमिका बजावतात.
आपल्या भाषणात त्यांनी बँकाना कर्ज वाटपावेळी अतिउत्साह टाळण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, "सध्या कर्ज वाटप वाढत आहे यात शंका नाही, परंतु बँका आणि एनबीएफसी यांना कर्ज वाटपाची गती क्षेत्रनिहाय आणि खालच्या स्तरावर नियंत्रित करावी लागेल आणि अतिउत्साह टाळावा लागेल."
त्यासोबतच त्यांनी असुरक्षित कर्जावरील थकबाकी नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने केलेल्या उपाययोजनांची सुद्धा माहिती दिली. ते म्हणाले की, "वैयक्तिक कर्जे आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या असुरक्षित कर्जावरील थकबाकीचा वाढता आकडा लक्षात घेता, आरबीआयने अशा कर्जांसाठी जोखीम वजन १०० टक्क्यांवरून १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे."