शासकीय सेवेत असतानाही क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी बजावणारे ‘आयर्न मॅन’ विकास गजरे यांची यशोगाथा...
शरीर चांगले असेल तर विचारही चांगले असतात, हे सूत्र मनाशी बाळगून आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी खेळामध्ये रुची वाढवून, काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीचे ध्येय त्यांनी शालेय शिक्षण घेत असतानाच, डोळ्यासमोर ठेवले होते. फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल हे खेळ खेळत असतानाच दहावी-बारावीत केंद्रात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. पुढे इंजिनिअरिंग, एमबीए त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आज ठाणे जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. शासकीय सेवेत नोकरी करत असताना, सोबत क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य प्राप्त करणारे विकास गजरे आता ’आयर्न मॅन’ म्हणूनही ओळखले जातात.
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात विकास गजरे यांचा जन्म झाला. बालपणही गावीच गेले. प्राथमिक शिक्षण गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. आईवडील दोघेही माध्यमिक शाळेत शिक्षक असल्याने बदली होईल, तिथे बिर्हाड घेऊन जावे लागे. त्यामुळे विकास यांचे माध्यमिक शिक्षणही वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. लहानपणीपासून सर्जनशील असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकण्यासाठी त्यांची निवड झाली. नवोदय विद्यालयात फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांमध्ये रुची वाढली. यामुळे क्रीडा क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तेव्हापासूनच त्यांनी मनी बाळगली होती. दहावी व बारावीत केंद्रात प्रथम आल्यानंतर, पुण्याला मॅकेनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगनंतर त्यांनी ’एमबीए’ पूर्ण केले. २००६ साली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २००७ मध्ये जळगाव जिल्ह्यात थेट उपजिल्हाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली. तेथून प्रशासकीय कारकिर्द सुरू झाली. जळगाव, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर अशी मजल दरमजल करत दि. १ जून २०२३ ला पुन्हा ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला.
आपली शारीरिक क्षमता उत्तम असेल, तर आपल्या कामकाजावरही त्याचा ठसा उमटतो, हे तत्त्व अंगीकारणारे विकास गजरे यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून क्रीडा क्षेत्रात आपणही काहीतरी भव्यदिव्य करू शकतो. हे मनोमन ठरवत कठोर मेहनतीने ते यश मिळवत गेले. आजवर ज्या-ज्या ठिकाणी काम केले, त्या-त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांत तसेच मुंबई उपनगरात कार्यरत असताना विभागीय महसूल व क्रीडा संचालनालयातर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून, स्पर्धामध्ये सहभागही घेतला.
’कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब’तर्फे आयोजित लोहपुरूष (ट्रायथलॉन) या स्पर्धेत गजरे हे इतर ९९ स्पर्धकांसह मोठ्या जिद्दीने उतरले होते. ही स्पर्धा तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजाराम तलावात १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर दुसर्या टप्प्यात लगेचच कोल्हापूर-बंगळुरू महामार्गावर ९० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर तिसर्या टप्प्यात ३.२१ किलोमीटर ही स्पर्धा ८ तास २५ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करून, ’आयर्न मॅन’ हा किताब त्यांनी पटकावला.
गोव्यात ऑक्टोबर महिन्यात आयोजित केलेल्या ’आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धे’त ५० देशांतील एकूण ७८७ स्पर्धक सहभागी झाले हाते. जगातील सर्वात अवघड मानल्या जाणार्या या स्पर्धेत समुद्रात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालविणे आणि २१.१ किमी धावणे यांचा समावेश होता. स्पर्धकांसमोर ११२.९ किमी अंतराची ही स्पर्धा ८ तास ३० मिनिटांत पूर्ण करण्याचे आव्हान होते. स्पर्धेचा प्रारंभ मिरामार बीच येथे झाला होता. यापैकी ५१७ स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. अशी अत्यंत अवघड, आव्हानात्मक, शरीर आणि मनाच्या ताकदीची कसोटी पाहणारी ’आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धा’ गजरे यांनी अवघ्या ८ तास ८ मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम केला. दक्षिण आफ्रिकेत ९० किलोमीटर अंतर १२ तासांत पूर्ण करण्याची अट असलेली जगातील सर्वात कठीण व जुनी मॅरेथॉन त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण केली.
वयाच्या ४५व्या वर्षीही ते दररोज पहाटे उठून दोन तास सराव करतात. या क्रीडा उपद्व्यापात शासकीय कामात ते मुळीच हेळसांड होऊ देत नाहीत. कुटुंबही क्रीडाप्रेमी आहे. त्यांच्या पत्नी सविता पेशाने डॉक्टर असून, त्या अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. मुलगी अन्विता ही राष्ट्रीय जलतरणपटू आहे, तर छोटा मुलगा अद्वैत हादेखील उत्तम फुटबॉलपटू आहे.
आजकाल एका क्लिकवर सर्व उपलब्ध होते. जग मुठीत आले असले तरी तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा, यासाठी ते युवा पिढीला व्यायाम करण्याचा सल्ला देतात, तर शासकीय अधिकार्यांना आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचा संदेश देऊन व्यायामासाठी जरूर वेळ काढा, असे आवाहनही करतात. नियमित सायकल चालविणे, पोहणे व धावणे या तिन्ही खेळांचा सातत्याने सराव करणारे गजरे वेळात वेळ काढून वाचनाची व गिर्यारोहणाची आवडदेखील जोपासतात. एखादे नवीन पुस्तक आले की, ते वाचून पूर्ण करतात. गिर्यारोहणाची प्रचंड आवड असल्याने पावनखिंड त्यांनी सलग तीन वर्षे पार केली. अशा या शासकीय सेवेतील ’आयर्न मॅन’ विकास गजरे यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
९३२००८९१००