बळीराजाला सौरऊर्जेचे बळ...

21 Nov 2023 21:13:23
 Editorial on Maharashtra govt plans solar-powered agricultural feeders

महाराष्ट्रात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची वर्षानुवर्षांची मागणी. कारण, रात्री-अपरात्री होणारा वीजपुरवठा हा बेभरवशाचा असून, थंडीच्या दिवसांत रात्री पिकांना पाणी देणे, हे मोठे आव्हानात्मक. त्यावर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सकाळी १२ तास वीजपुरवठ्याचा घेतलेला निर्णय हा सर्वार्थाने बळीराजाचे जीवन प्रकाशमान करणाराच!

शेतातील कृषी पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक. शेतकर्‍यांसह सर्वच स्तरांवरून ही मागणी कित्येकदा केली गेली. त्यामुळेच ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू झाली असून, आगामी काळात कृषी फीडर सौरऊर्जेवर टाकून शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी घोषणा परवाच फडणवीस यांनी केली. शेतीला दिवसा वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी विधानसभेतही करण्यात आली होती. शेतीसाठी दिवसा १२ तास वीजपुरवठा होणे, ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची आग्रही मागणी. यंदाच्या पावसाळ्यात काही जिल्ह्यांत पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले. मात्र, त्या नुकसानीवर मात करत, शेतकरी बांधव पुन्हा उभा राहिला. आता या हंगामात गहू, ज्वारी, हरभरा यांसारख्या पिकांना उभारी आली आहे. म्हणूनच दिवसा वीजपुरवठा करावा, यासाठी शेतकरी आग्रही होते.

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी व्यथा फारशा नव्या नाहीत. त्यांना कोणत्या ना कोणत्या संकटाला नेहमी सामोरे जावे लागते. कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा, कधी नापिकीचे संकट तर कधी रोगराईचे. मात्र, अशातूनही शेतकरी बांधव खंबीरपणे वाटचाल करत, पीक जगवण्याचे काम अविरतपणे करत असतो. पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वेळेवर वीज मिळणे, ही खूपच आव्हानात्मक बाब. राज्यात तयार होणारी वीज प्रामुख्याने उद्योगधंदे, शहरे, व्यावसायिकांना देऊन उरली, तरच शेतीसाठी दिली जाते. फार तर आठ तास वीजपुरवठा होतो, तोही रात्री. त्यात तो कमी दाबाने आणि वारंवार खंडित होणारा. रोहित्र नादुरुस्त झाले, तर महिनोन्महिने ते बदलूनही मिळत नाही. यात पाण्याअभावी पिकांचे मात्र नुकसान होते.
 
शेतकर्‍यांबरोबर वीज वितरण कंपनी जो करारनामा करते, त्यात शेतीसाठी किती तास वीजपुरवठा होणार, तसेच विजेचा दर्जा काय राहणार, याची कोणतीही जबाबदारी कंपनी घेत नाही. शहरे व उद्योगांसाठी सलग वीजपुरवठ्याची हमी करारात असली, तरी शेतीसाठी ती नाही. शहर व उद्योगांसाठी एखाद्या फीडरवर पुरवठा खंडित झाला, तर दुसर्‍या फीडरवरून पुरवठा घेऊन तो सुरळीत केला जातो. शेतीसाठी मात्र खंडित पुरवठ्याची हमी नक्कीच आहे. शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करावा असे गृहीत धरले, तरी तितका वीजपुरवठा केला जात नाही. सरासरी चार तासच तो होतो. दाब कमी असल्यामुळे विद्युतपंप पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. तसेच स्टार्टर, मोटर, केबल जळण्याचे प्रमाणही खूप जास्त असते.

वीज देयक भरूनही वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने, तसेच दिवसाऐवजी रात्री तो केला जात असल्याने, शेतकरी बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते. थंडीच्या दिवसांत विंचू तसेच सर्पदंश होण्याची भीती त्यांना असते. मात्र, रात्री-अपरात्री वीजपुरवठा होईल, तसा ते पिकांना पाणी देतात. म्हणूनच रात्रीऐवजी दिवसा हा पुरवठा करण्यात यावा, ही वारंवार केली जाणारी मागणी आहे. महाराष्ट्रात सर्वत्रच शेतीसाठी जो वीजपुरवठा केला जातो, त्याकडे कमालीचे दुर्लक्ष ‘महावितरण’ करते. म्हणूनच बीडमधील एका शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना ‘रात्रीचे शेतात दारं धरून दाखवावं,’ असे मध्यंतरी आवाहन केले होते.

वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे, देखभालीअभावी ट्रान्सफॉर्मर जळणे, वीज तारा लोंबकळणे असे प्रकार सर्रास घडत असतात. पेटी जळली की तिची दुरुस्ती दोन ते तीन दिवस होत नाही. त्यासाठी ‘महावितरण’च्या कर्मचार्‍याला हाताला धरून, शेतात घेऊन यावे लागते. तारा लोंबकळत असतील, तर झोल काढून घेण्यासाठीही त्याच्याच हातापाया पडावे लागते. अशा लोंबकळणार्‍या तारा धोकादायक ठरतात. वाघ, बिबट्या, रानडुकरे आदी जंगली प्राणी व तत्सम संकटामुळे शेतकरी बांधव त्रस्त असताना, रात्रीच्या वेळी होणारा वीजपुरवठा त्यांच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरत आहे. संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा आदी पिके तसेच भाजीपाला अंतिम टप्प्यात आला असल्याने, उभारलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी सलग वीजपुरवठा आवश्यक आहे. दिवसा वीज गायब तर रात्री वीजपुरवठा करून शेतकर्‍यांना ‘महावितरण’ वेठीला धरते का, असाही प्रश्न आहे.
 
तेलंगण सरकार शेतीसाठी २४ तास वीज पुरवण्याचा प्रयत्न करत असताना, महाराष्ट्रात दिवसा १२ तासही वीजपुरवठा होत नाही, हा विरोधाभास. म्हणूनच शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘सौर कृषी वाहिनी योजना’ राबवण्यात येत आहे. ही शेतकर्‍यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना असून, या योजनेच्या माध्यमातून ‘महावितरण’कडून शेतकर्‍यांना सौर पॅनेल पुरवण्यात येतात. त्याच्या मदतीने शेतकरी बांधवांचा वीज देयकाचा खर्च कमी होईल. तसेच त्याला मोफत वीज वापरता येणार आहे. प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतामध्ये सौर पॅनल बसवून मोफत वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे सौर पॅनेल हे दोन ते दहा मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा पॅनेल असतील. मोटारीच्या साहाय्याने पाणी उपसा करणे किंवा वीज नसली तरी पाणी देणे त्यामुळे शक्य होणार आहे.
 
राज्यातील सर्व भागांमध्ये शेतकरी बांधवांना मोफत वीज मिळवून देणारा प्रकल्प, असे मुख्यत्वाने म्हणता येईल. या योजनेसाठी ३ हजार, ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, राज्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होईल, याची काळजी घेण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या वीज देयकाचा खर्च कमी करण्याचे प्राथमिक ध्येय ठेवण्यात आले असून, त्यानंतर शेतीसाठी शाश्वत वीजपुरवठा त्यातून साध्य होईल. या अंतर्गत त्याला १२ तास वीज वापरता येईल. पिकाला वेळेवर पाणी न दिल्यामुळे त्याचे होणारे आर्थिक नुकसानही त्यायोगे टाळले जाईल. लातूर तसेच सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही भागात सौरऊर्जा पॅनेल बसवण्यात आले असून, या योजनेचा फायदा काही शेतकरी बांधव घेत आहेत. म्हणूनच ‘सौर कृषी वाहिनी योजना’ महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची शेतीसाठी वीजपुरवठ्याची समस्या सोडवण्यास मोलाची मदत करेल, अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0