गृहिणी ते ‘क्लास टू अधिकारी’

21 Nov 2023 20:31:41
Article on Govt Officer Vandana Gaikwad

लग्नानंतर अभ्यासात अजिबात खंड न पडू देता, नोकरीसोबतच अभ्यासाचे नियोजन आखत, तब्बल सहा वर्षं मेहनत करून यश खेचून आणणार्‍या वंदना गायकवाड यांच्याविषयी...

शासकीय अधिकारी होण्यासाठी लाखो तरूण-तरूणी अक्षरशः जीवाचे रान करत असतात. काहीजण लाखो रुपयांचे शुल्क भरून खासगी शिकवणी लावून स्पर्धा परीक्षा देतात, तर काहीजण कोणतीही खासगी शिकवणी न लावता यशाला गवसणी घालत असतात. काही जण कुटुंबीयांपासून दूर राहून दिवस-रात्र एक करत, कठोर मेहनत घेत असतात. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
 
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडे गावातील वंदना अमोल गायकवाड यांनी कोणतीही खासगी शिकवणी न लावता ’एमपीएससी’त घवघवीत यश संपादन केलेले आहे व ’महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेत साहाय्यक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, राजपत्रित-वर्ग २, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र शासनपदी त्यांची निवड झाली आहे.

वंदना यांचे प्राथमिक शिक्षण ओझर येथील अभिनव बाल विकास मंदिर येथे, तर माध्यमिक शिक्षण माधवराव बोरस्ते विद्यालयात झाले. नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका, तर अमरावती येथील शासकीय महाविद्यालयात २०१५ मध्ये पदवी प्राप्त केली. वंदना यांना सुरुवातीपासून अभ्यासाची प्रचंड आवड होती. त्यानुसार त्यांनी संसार सांभाळत, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. २०१९ साली लग्नानंतरही त्यांनी परीक्षेच्या तयारीत कुठेही खंड पडू दिला नाही. वंदना यांचे पती अमोल हेदेखील उच्चशिक्षित असून, खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहेत. वंदना यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीचीदेखील त्यांना मोलाची साथ लाभली. वंदना या सध्या नाशिकमधील एका खासगी कंपनीत ’प्रोजेक्ट स्पेशालिस्ट’ या पदावर कार्यरत आहेत.

वंदना या ओझर मिग येथील शेतकरी अशोक शिंदे यांच्या कन्या असून, तालुक्यातील शिरवाडे येथील गायकवाड कुटुंबात त्यांचे सासर आहे. ग्रामीण भागात लग्न झाल्यानंतर सासरची जबाबदारी पडल्यानंतर मुलींना शिक्षण घेणे हे आजही अवघडच. मुलींनी कितीही शिक्षण घेतले तरी सांसारिक जबाबदार्‍या सांभाळून चूल आणि मुलापुरते त्यांनी मर्यादित राहावे, अशी आजही अपेक्षा विशेषत्वाने ग्रामीण भागात दिसून येते. परंतु, जर प्रयत्न प्रामाणिक असतील व कठोर मेहनतीची तयारी असल्यास सर्व काही शक्य होते. समोर कोणतीही समस्या आली, तरी त्यातून यश खेचून आणता येते, हे वंदना यांनी सिद्ध केले.

वंदना यांनी संसाराचा गाडा सुरळीत हाकत, आपली नोकरी सांभाळत ’महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत माहेर अन् सासरचे नाव पंचक्रोशीत उज्ज्वल केले आहे व आजूबाजूच्या मुली आणि महिलांसाठी त्यांनी एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांच्या दोन्हीकडील परिवारात स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणार्‍या त्या एकमेव महिला आहेत. वंदना या तब्बल सहा वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत होत्या. परंतु, यश त्यांना दरवेळी थोडक्यात हुलकावणी देत होते. परंतु, त्यांनी हार न मानता, न थकता आपले अथक परिश्रम व अभ्यास सुरूच ठेवला व दि. ३१ ऑगस्ट रोजी लागलेल्या ’महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेत यश संपादन करत कुटुंबीयांनाही एक सुखद धक्का दिला.
 
एखादी गोष्ट साध्य करण्याची मनोमन जिद्द असल्यास ती कोणत्याही कारणास्तव मध्येच सोडता कामा नये. मध्यंतरी एक अशी वेळ होती की, वंदना यांना नैराश्येने ग्रासले असताना, अभ्यास करणे सोडून द्यावेसे वाटत होते. परंतु, एवढे वर्षं कष्ट उपसूनही लढाई अर्ध्यात सोडली, तर एवढे वर्षं केलेली मेहनत वाया जाईल, हा विचार करून त्यांनी पुन्हा नवीन उमेदीने नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास सुरू ठेवला. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास जिद्द, मेहनत आणि चिकाटी ही त्रिसूत्री लागतेच. गेल्या सहा वर्षांत नातेवाईकांत फिरणे, मौजमजा करणे या सर्व प्रलोभनांपासून चार हात वंदना आवर्जून लांब राहिल्या. तसेच संसार, नोकरी सांभाळत अभ्यास करणे हे खरे तर खूप मोठे आव्हान होते. कारण, दोन्हीकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे. म्हणूनच लग्नानंतर केवळ अभ्यासासाठी पती आणि परिवारापासून त्या काही काळ लांब राहिल्या.

दरम्यान, वंदना यांची नित्याची नोकरी सुरूच होती. नोकरी सांभाळत, घरकाम सांभाळत जसा वेळ मिळेल तसा त्यांनी अभ्यास मात्र न चुकता केला. मागच्या परीक्षेतील चुका पुन्हा पुढच्या वर्षी होणार नाही, याचेही अगदी काटेकोर नियोजन केले. तसेच वेळेचे नियोजन अजून प्रभावीपणे कसे करता येईल, याकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले. तसेच कार्यालयाच्या ठिकाणी वेळ मिळेल, तसा संगणकावर अभ्यास सुरूच ठेवला. राज्यातून लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असतात. परंतु, त्यातून मोजकेच उमेदवार पात्र होत असतात. जो उमेदवार पूर्ण दिवसाचे नियोजन करून अभ्यास करतो, तोच हे चक्रव्यूव्ह भेदू शकतो. मागच्या सहा वर्षांत फुकट वेळ कुठेच जाणार नाही, याची काटकोर दक्षता घेतली. आयुष्यात पुढे जायचे असल्यास अभ्यासाशिवाय पर्याय नाही व प्रचंड इच्छाशक्ती हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे वंदना अगदी आवर्जून सांगतात. वंदना गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

गौरव परदेशी
Powered By Sangraha 9.0