मुंबई : एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची स्पर्धा संपली असून अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करुन सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पराभव जरी झाला असला तरी प्रत्येक भारतीय सर्व क्रिकेटपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांच्या खेळाचे कौतुक सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण आपल्या भावना समाज माध्यमावर पोस्ट करत व्यक्त होत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले असून चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील तुम्ही खेळत राहा, अशी प्रोत्साहित करणारी पोस्ट अमिताभ यांनी केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी काय लिहिले?
“टीम इंडिया.. काल रात्रीचा निकाल हा तुमच्या प्रतिभेचे, कर्तृत्वाचे आणि योग्यतेचे प्रतिबिंब नाही.. आम्हाला तुमचा अभिमान आहे.. चांगल्या गोष्टी घडतील..तुम्ही खेळत राहा,” अशी त्यांनी एक पोस्ट केली आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये बिग बी म्हणाले, “तुमची प्रतिभा, क्षमता आणि योग्यता या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि खूप वर आहे. तुम्ही खेळलेल्या १० सामन्यांच्या निकालांनी हे दाखवून दिले की तुम्ही असा संघ आहात ज्यांनी इतरांना नमवलं. या विश्वचषकात तुम्ही किती माजी चॅम्पियन आणि विजेत्यांना हरवलं ते पाहा. तुम्ही सर्वोत्तम आहात आणि राहाल.”
ट्विटरसोबत अमिताभ बच्चन यांनी एक इन्स्टाग्रामवर पोस्टदेखील एक केली आहे. स्वतःचाच फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “नाही, नाही, नाही. टीम इंडिया तुम्ही अजुन बाहेर पडलेला नाहीत. तुम्ही आमचा अभिमान आहात. तुम्ही ते हृदय आहात जिथे आमचे हात टेकतात.”
भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची गोष्ट
“भारतीय संघाने ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि नेहमीच एक किंवा दोन दिवस वाईट असतात. दुर्दैवाने आज ते घडलं….परंतु क्रिकेटमधील आमच्या लिगसीचा आम्हाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे आभार…तुम्ही पूर्ण भारताला खूप आनंद दिला. तुमच्यासाठी खूप प्रेम आणि आदर आहे.”
हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है!
तर अभिनेत्री काजोलनेही पोस्ट करत लिहिले आहे की, “हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है! टीम इंडिया तुम्ही खूप चांगले खेळलात. आणखी एक वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा.” हिंदीसह अनेक मराठी कलाकारांनी देखील भारतीय क्रिकेट संघाच्या पाठीशी उभे राहात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.