मुंबई : ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताविरुद्ध अंतिम सामना जिंकून विश्वचषक पटकावला. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या विश्वचषकाची काहीच किंमत नसल्याचे सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियन कांगारू विश्वचषकावर पाय ठेवतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून कागांरुंवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रविवारी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करुन सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अष्टपैलू मिचेल मार्श हा वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवताना दिसत आहे. त्याच्या या कृतीवर नेटकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही त्याची भारताविरुद्ध अपमानास्पद वृत्ती असल्याचे म्हटले जात आहे. एका चाहत्याने पोस्ट करत "हा संस्कृतीचा फरक आहे. हे लोकं पुस्तकांवरही पाय ठेवण्यास मागेपुढे बघणार, ज्या गोष्टीची आपण स्वप्नातही कल्पना करु शकत नाही," असे म्हटले आहे.
तसेच ही ट्रॉफी मिळवण्यासाठी क्रिकेटपटू त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवतात आणि मिचेल मार्शने त्यावर पाय ठेवणे हे धक्कादायक आणि कुरूप असल्याचे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, याआधीही ऑस्ट्रेलियन संघाचे असे विचित्र सेलिब्रेशन पुढे आले आहे.