मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पार पडणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, भारताला विश्वचषक मिळावे यासाठी देशभरातील जनता प्रार्थना करत आहे. यासाठी पुजा, हवन, उपवास करण्यात येत आहे.
रविवारी दुपारी २ वाजता हा सामना सुरु होणार असून दोन्ही संघ अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे, देशाच्या कानाकोपऱ्यात भारताच्या विजयासाठी पुजा-पाठ करण्यात येत आहे. रतलाम, कानपूर, पंचकुला, मुंबई, ऋषिकेशसह अनेक शहरांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फोटोंची पुजा केली जात आहे. तसेच काही ठिकाणी सुंदरकांड पठण देखील केले जात आहे.
एवढंच नाही तर भारताला विश्वचषक मिळावे यासाठी अनेक चाहत्यांनी निर्जला उपवासही केला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये १० मुलांनी उपवास केला आहे. जोपर्यंत भारताला विजय मिळत नाही तोपर्यंत काहीच खाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय देशातील अनेक मोठमोठ्या मंदिरांमध्ये भारताच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अयोध्येतील श्री राम मंदिरातील पुजाऱ्यांनी रामललाला प्रार्थना केली आहे. तसेच वाराणसीमध्ये काही मुस्लिम महिलांनी भारताच्या विजयासाठी नमाज अदा केली. अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि तामिळनाडूतील सेलम येथील पेरुमल मंदिरातदेखील पुजा करण्यात येत आहे.