मुंबई (विशेष प्रतिनिधी): दौंडजवळील श्रीगोंदा येथील आनंदवाडी गावामध्ये एका शेतातील विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले होते. शुक्रवार दि. १७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी विहिरीत बिबट्याचे पिल्लू असल्याचे लक्षात आले. अडीच ते तीन महिन्यांच्या या पिल्लाचे यशस्वी रेस्क्यू पार पाडल्यानंतर मादी बिबट आणि बछड्याचे यशस्वी पुनर्मिलन घडवुन आणण्यात आले.
श्रीगोंद्यातील आनंदवाडी गावात शुक्रवारी संध्याकाळी ६च्या सुमारास बिबट पडला असल्याचे वनविभाग आणि रेस्क्यू टीमला कळवण्यात आले. तात्काळ घटनास्थळी दाखल होत या बिबट्याच्या बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. विहिरीत पिंजरा टाकल्यानंतर अनेक प्रयत्न करुनही पिल्लू या पिंजऱ्यात येत नव्हते. थंडीपासुन ही पिल्लाचा बचाव करता यावा म्हणुन याचे रेस्क्यू लवकरात लवकर करणे गरजेचे होते हे लक्षात घेत वेगळ्या तांत्रिक पद्धती वापरुन पिल्लाला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर या पिल्लाची वैद्यकीय तपासणी करत असतानाच बचावकार्य करणाऱ्यांना मादी बिबट आजूबाजूलाच असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुनर्मिलन लवकरात लवकर करणे गरजेचे असल्याने वैद्यकीय तपासणीनंतर तात्काळ पुनर्मिलनासाठी तयारी केली गेली.
बछड्याचा पिंजरा ठेवलेला असलेल्या ठिकाणावर मादी अनेकदा फिरकली पण त्यानंतर कॅमेरा ट्रॅपमध्ये मादी व्यवस्थीत दिसल्यानंतर बछड्याला पिंजऱ्याचे दार उघडून मुक्त करण्यात आले. पिंजऱ्याच्या जवळ असलेली मादी आपल्या बछड्यासह पहाटे ४ वाजताच्या सुमारास निघून गेली.
"लोकांनी सतर्कता दाखवल्यामुळे हे रेस्क्यू योग्य पद्धतीने पार पडले. महाराष्ट्र वनविभाग आणि रेस्क्यू टीम वेळीच आणि योग्य साधनसामुग्रीसह हजर झाल्यामुळे रेस्क्यू व्यवस्थीत झाले. सामान्यांमध्ये जागृकता असण्याची गरज आहे असं मला वाटतं."
- नचिकेत अवाढानी
पुणे रेस्क्यू टीम