नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरु झालेल्या ' विकसित भारत संकल्प यात्रे'ला देशभरातील आदिवासीबहुल भागात प्रतिसाद मिळत आहे. हे संकल्प रथ ठिकठिकाणी जाऊन विविध शासकीय योजनांबद्दल व्यापक जनजागृती करत आहेत. महाराष्ट्रात नंदुरबार पालघर, नाशिक,गडचिरोली आणि नांदेड या आदिवासीबहुल जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा प्रामुख्याने आयोजित करण्यात आली असून हे प्रचार रथ वेगवेगळ्या गावांमध्येपोचत असून गावकर्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सरकारच्या या विशाल संपर्क कार्यक्रमाचा भाग असलेले हे संकल्प रथ म्हणजे विशेष प्रकारे रचना केलेल्या ५ आयईसी(माहिती,शिक्षण आणि संपर्क ) व्हॅन आहेत. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रमुख योजना, ठळक मुद्दे आणि कामगिरी दर्शवणाऱ्या हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रफिती , माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रके आणि फ्लॅगशिप स्टँडीच्या माध्यमातून माहितीचा प्रसार करण्यासाठी या आयईसी व्हॅन्स अर्थात प्रसार रथ सुसज्ज आहेत.
दि. १६ नोव्हेंबर रोजी या संकल्प रथांनी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपला संचार सुरु केला आहे. पालघर तालुक्यासह, वाडा, डहाणू आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये एकूण ४ संकल्प रथ विविध गावात भेटीसाठी दाखल झाले आहेत.पालघरमधील शिरगांव, बोर्डी, बिलावली आणि कोंडगांव याठिकाणी विकसित भारत संकल्प रथाचे जोरदार स्वागत करण्यात आले. रथातून देण्यात येत असलेल्या माहितीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.