मुंबई : वात्रटिका रचून हसवणारे व आपल्या साहित्यातून राजकीय रंगावर नेमाने भाष्य करणारे कवी रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली २६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. शिरोळ येथील निमशिरगाव येथे रविवारी दि. १९ नोव्हेम्बर रोजी हे संमेलन संपन्न होत आहे. तसेच यावेळी समाजरत्न, साहित्यरत्न आणि शेतकरी राजा पुरस्कारांचे वितरणही होईल.
या संमेलनाची सुरूवात महादेव मंदिरातून ग्रंथदिंडीने होईल. यावेळी डॉ. धवलकुमार एस. पाटील, डॉ. सुकुमार जे. मगदूम, डॉ. अतिक पटेल, डॉ. अजित बिरनाळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची सुरूवात होईल. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्षांसह मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन होईल. स्वागताध्यक्ष डा. विश्वनाथ मगदूम पाहुण्यांचे स्वागत करतील. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील, वैभव नायकवडी, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्रा. डॉ. रणधीर शिंदे, एसआयटीचे एक्झि. संचालक अनिल बागणे, अशोक माने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्यांच्या उपस्थितीत उदघाटन होईल. यावेळी साहित्यसुधा स्मरणिकेचे प्रकाशन, तसेच विविध पुरस्कारांचे वितरण होईल. दुसऱ्या सत्रात 'राजकारणाचे धिंडवडे – सामान्य माणसाची भूमिका' विषयावर परिसंवाद आहे. तर दुपारी तिसऱ्या सत्रात कथाकथन, कवी संमेलन होणार आहे.