‘दि डिक्शनरी ऑफ मिलिटरी कोटेशन्स’ नावाचा हा कोश चांगला पावणेसहाशे पानांचा असून, प्राचीन काळातल्या ट्रॉयच्या युद्धापासून ते १९७३च्या अरब-इस्रायल युद्धापर्यंतचा भाग त्यात आहे. अलेक्झांडर, हनिबाल, फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, क्लाउझ्वित्झ, ड्युक ऑफ वेलिंग्टन, जनरल कँब्रा, जनरल पॅटन, जनरव मार्शल, विन्स्टन चर्चिल, गोल्डा मायर अशा अनेकानेक अव्वल सेनानींचे आणि युद्धनेत्यांचे उद्गार यात संग्रहित करण्यात आले आहेत.
दि. १० मे १९४०! विन्स्टन चर्चिलनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हिटलरच्या झंझावातासमोर युरोपातली एका पाठोपाठ एक राज्यं कोसळताना पाहून अखेर ब्रिटनचे शांततावादी, समन्वयवादी पंतप्रधान नेव्हिल चेंबर्लेन यांनीही राजीनामा दिला. द्यावाच लागला. आता पंतप्रधान म्हणून, युद्धनेता म्हणून संपूर्ण ब्रिटनमध्ये एकच माणूस सर्वात लायक होता-विन्स्टन चर्चिल!
दि. १० मे १९४० या दिवशी चर्चिल पंतप्रधान बनले आणि संपूर्ण ब्रिटिश राष्ट्राला उद्देशून त्यांनी सिंहगर्जना केली की, “मित्रांनो, आता आपली वेळ आली आहे. हिटलरची सगळी आग आता ब्रिटिश बेटांकडे वळणार आहे. हिटलरसमोर दोनच पर्याय आहेत-एक म्हणजे आम्हाला हरवणं किंवा मग संपूर्ण युद्धच हरणं. आपण हिटलरला नेटाने तोंड दिलं, तर संपूर्ण युरोप मुक्त होईल. जर आपण कोसळलो, तर अमेरिकेसकट संपूर्ण जग अंधारयुगाच्या खाईत ढकललं जाईल. म्हणून कर्तव्यासाठी सिद्ध होऊया आणि अशी कृती करूया की, येती हजार वर्षं लोक म्हणत राहतील-या ब्रिटिशांच्या जीवनातील सर्वोत्तम समय तो हाच!” (धिस वॉज देअर फायनेस्ट अवर!)
पहिल्या महायुद्धाआधी पायदळ पथकं, घोडदळ पथकं, त्यांचे प्रमुख आपापल्या पथकाच्या अग्रभागी जातीने उभे राहून आपापल्या पथकांचं नेतृत्व करीत. आपल्या प्रमुख शत्रूवर हल्ला चढवण्यात किंवा शत्रूचा हल्ला झेलण्यात आपल्या पुढे उभा असलेला पाहून पथकातले सैनिकही उत्साहाने, त्वेषाने लढाई करीत. जगभरच्या सर्व सैन्यांमध्ये हीच पद्धत प्रचलित होती. परंतु, पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच ही पद्धत साफ मोडीत निघाली. याला कारण मशीनगनचा शोध नि मशीनगनचा परिणामकारक वापर करण्याचं जर्मन सेनेने बसवलेलं नवं तंत्र. जर्मन मशीनगन्स क्षणाचीही उसंत न घेता, अविरतपणे गोळ्यांचा वर्षाव करीत. कडाडत्या मशीनगन्सवर हातात नुसती रायफल घेऊन धावून जाणं, हा शुद्ध आत्मघात होता.
पण, फ्रेंच सैन्यातल्या पथकप्रमुखांना ती पद्धत एवढी अंगवळणी पडली होती की, असंख्य शूर फ्रेंच पथकप्रमुख फुकट मेले. अर्थातच, सेनाश्रेष्ठींनी ही पद्धत बदलून टाकली. समोरासमोरच्या हातघाईच्या लढाईचं नवीन तंत्र आपोआपच विकसित होत गेलं.
पण, दुसर्या महायुद्धातला जर्मन सेनापती अर्विन रोमेल ही एक वेगळीच वल्ली होती. दुसरे महायुद्ध सुरू झालं, त्यावेळी रोमेल कनिष्ठ अधिकारी होता. पण, रोमेलचं रणकौशल्य पाहून हिटलर खुश झाला.
त्याने सेवाज्येष्ठता वगैरे फालतू नोकरशाही नियम धुडकावून रोमेलवर भराभर अवघड कामगिर्या सोपवल्या आणि रोमेलने त्या तडफेने पार पाडताच त्याला भराभर बढत्या देत गेला. अल्पावधीत रोमेल जनरल झाला. वास्तविक जनरल दर्जाच्या सेनानीने आघाडीमागे सुरक्षित अंतरावर आपल्या कार्यालयात बसून सेनेचं सूत्रसंचालन करायचं असतं. अधनंमधनं आघाडीला भेट देऊन सैनिकांना स्फूर्ती देणारे चार शब्द सांगायचे असतात.
परंतु, जनरल रोमेल हे पाणीच काही वेगळं होतं. तो आघाडीमागची कार्यालयीन कामं तर तडफेने उरकून टाकायचाच; पण प्रत्यक्ष लढाईच्या ऐन धुमश्चक्रीतही बेधडक आघाडीवर वावरायचा. तोफा आग ओकतायत, रणगाडे दणाणतायत, हॅण्डगे्रनेड्स आणि मशीनगन्सची देमार घेमार चालू आहे, बॉम्बगोळ्यांच्या उडणार्या घातक कपच्यांपासून बचाव होण्यासाठी अनेकदा जमिनीवर लोटांगण घालावं लागतय, अशा त्या मरण-मारणाच्या कचाकचीत, आपला जनरल आपल्या सोबत उभा आहे, आपली चौकशी करतोय, अधूनमधून आपल्याच बरोबर जमिनीवर लोळण घेतोय, हास्यविनोद करतोय हे अनुभवणार्या सैनिकांना काय बरं वाटत असेल? कल्पना करून पाहा!
हिटलरला रोमेलचा हा अगोचरपणा समजल्यावर, त्याने रोमेलची प्रेमळ कानउघाडणी करणारं एक पत्र लिहिलं - ’मित्रा, मला तुझी काळजी वाटते.’ हिटलरच्या रोमेलला लिहिलेल्या पत्रातलं हे वाक्य संपूर्ण जर्मन सैन्यात समजलं आणि तमाम जर्मन सेना रोमेलवर नुसती फिदा होऊन गेली.
दि. २२ जून १९४१! हिटलरचे रणगाडे रुसो-जर्मन सीमेवरून दणाणत, सोव्हिएत रशियाच्या हद्दीत शिरले आणि दुसर्या महायुद्धातल्या एका नव्या भीषण रक्तपर्वाला सुरुवात झाली. हिटलर आणि सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन यांच्यात अनाक्रमणाचा करार झालेला होता. त्यामुळे पश्चिम युरोपमध्ये युद्घाच्या भीषण ज्वाळा पसरत असताना, पूर्व युरोप मात्र शांत होता. पण, पश्चिम युरोपबाबत निश्चिंत झालेला हिटलर आता रशियात घुसणार, अशी चिन्हं दिसू लागली.
सोव्हिएत हेरखात्याकडूनच नव्हे, तर ब्रिटिश-फे्रंच-अमेरिकन दोस्त राष्ट्रांकडूनही स्टॅलिनला हिटलरच्या भव्य चढाईच्या सूचना मिळू लागल्या; पण कसा कोण जाणे, स्टॅलिन गाफील राहिला. स्वतःच्या बापावरदेखील विश्वास न ठेवणारा संशयात्मा, कू्ररकर्मा स्टॅलिन त्याने हिटलरवर विश्वास ठेवला. अनाक्रमणाचा करार सोडून हिटलर रशियावर हल्ला चढवेल, ही गोष्ट त्याला शक्यच वाटेना. एका खविसाला दुसर्या खविसाबद्दल केवढा हा विश्वास!
दि. २२ जून १९४१ रोजी हिटलरने रशियावर जबरदस्त आक्रमण केलं. त्या दिवसाच्या दुपारपर्यंत दोन हजार चौरस मैलांच्या रुसो-जर्मन सीमेवरून जर्मन सेना बर्याच खोल घुसल्या. एक हजार रशियन लढाऊ विमानं जर्मन हवाई दलाने जागेवरच उद्ध्वस्त केली. रशियन विमानदलाचं कंबरडंच मोडलं. राजकीय खेळी आणि लष्करी खेळी दोन्हीत हिटलरने स्टॅलिनवर सरळ-सरळ मात केली. त्याच रात्री चर्चिलने आकाशवाणीवर भाषण करून रशियाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
पण, स्टॅलिन कुठे होता? सगळं जग आतुरतेनं वाट पाहत होतं. स्टॅलिनच्या प्रतिक्रियेची आणि त्याचा पत्ताच नव्हता. दोन दिवस, चार दिवस, आठ दिवस उलटले. प्रत्येक दिवशी हिटलरच्या सेना रशियात खोल-खोल घुसत होत्या आणि स्टॅलिनची काही प्रतिक्रियाच नव्हती. रशियन जनतेचे प्राण कंठाशी आले. स्टॅलिन काय करत होता? आपली बातमी अशी होती की, स्टॅलिन साफ खचून गेला आहे, कोसळला आहे. क्रेमलिनच्या तटबंदीत दडून, तो वेड्यासारखं मद्यपान करतो आहे. बाटल्यांमागून बाटल्या फस्त करतो आहे. ११ दिवस उलटले.
बाराव्या दिवशी चमत्कार झाला. दि. ३ जुलै १९४१ या दिवशी स्टॅलिनने संपूर्ण रशियन राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. स्टॅलिन हा चर्चिल किंवा हिटलर यांच्यासारख्या प्रभावी वक्ता कधीच नव्हता. पण, त्या दिवशीच त्याचे भाषण काही विलक्षणच होतं, त्यातल्या वक्तृत्वापेक्षा त्यातली भावना ही विलक्षण प्रभावी होती. स्टॅलिन म्हणाला की, “आम्ही तसूतसू भूमीसाठी लढू, चला विजयोन्मुख व्हा” आणि रशियन जनता स्टॅलिनचे सगळे अत्याचार, अपराध विसरली, थरारून पेटून उठली आणि खरोखरच तसूतसू भूमीसाठी जीव खाऊन लढली.
दि. १८ जून १८१५. बेल्जियममधल्या ब्रुसेल्सच्या दक्षिणेला ११ मैलांवरचं वाटर्लू नावाचं गाव. संपूर्ण युरोपवर आपलं साम्राज्य स्थापन करू पाहणारा, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटिश सेनापती ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांच्यात तिथे त्या दिवशी भीषण रणसंग्राम झाला आणि नेपोलियन साफ पराभूत झाला. आपल्या या विजयाबद्दल बोलताना वेलिंग्टन म्हणाला की, ”माझे डावपेच ठरवण्यापूर्वी मी टेकडीच्या दुसर्या बाजूला म्हणजे शत्रूच्या छावणीत काय चाललं असेल, याचा अंदाज घेत असतो, आयुष्यभर मी हाच अभ्यास करीत आलो आहे.”
नेपोलियनला पराभूत करणारा हा वेलिंग्टन नेपोलियनच्या रणकौशल्यावर इतका निहायत फिदा होता की, तो म्हणाला, ”मला जर कुणी निवड करायला सांगितली की, ५० हजार सैनिक एकीकडे नि एकटा नेपोलियन एकीकडे यांच्यापैकी कोण तुला हवं? तर मी निःशंकपणे नेपोलियनची मागणी करीन.”
युरोपच्या इतिहासातले काही विश्वविख्यात सेनानी युद्धनेते यांनी रणांगणं, युद्ध, युद्धभूमी, रणझुंजार यांच्यासंबंधात काढलेले काही उद्गार वर दिले आहेत. ते असे काही जोरकस आहेत की, ते वाचून केवळ सैनिकांचीच नव्हे, तर सामान्य माणसांचीही मनगट शिवशिवू लागावीत. पीटर सोरस या विद्वान युद्धेतिहासकाराला वाटलं की, जगभरच्या विविध युद्धनेत्यांच्या सेनापतींच्या अशा तेजस्वी उद्गारांचा असा एखादा कोशच का बनवू नये? मग सोरसने स्वतःच तसा कोश बनवला.
’दि डिक्शनरी ऑफ मिलिटरी कोटेशन्स’ नावाचा हा कोश चांगला पावणेसहाशे पानांचा असून, प्राचीन काळातल्या ट्रॉयच्या युद्धापासून ते १९७३च्या अरब-इस्रायल युद्धापर्यंतचा भाग त्यात आहे. अलेक्झांडर, हनिबाल, फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, क्लाउझ्वित्झ, ड्युक ऑफ वेलिंग्टन, जनरल कँब्रा, जनरल पॅटन, जनरव मार्शल, विन्स्टन चर्चिल, गोल्डा मायर अशा अनेकानेक अव्वल सेनानींचे आणि युद्धनेत्यांचे उद्गार यात संग्रहित करण्यात आले आहेत.
वाचकाला एक अपूर्व हिंमत, उत्साह, जोश देणारा असा संग्रह पाहून वाटतं, आपल्या भारतालाही शौर्याची, पराक्रमाची, क्षात्रतेजाची केवढी भव्य, वैभवशाली परंपरा आहे. आमचे रणनायक आणि युद्धनेते तर यांपेक्षा कैक पटींनी तेजस्वी आणि तिखट होते. मग युद्धोद्गारांचा असा संग्रह आमच्याकडे कुणी का बरं करू नये? आमचा सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान ग्रंथ जो गीता तोही तर रणभूमीवरचाच उद्गार नव्हे का? आणखी असे वाटेल, तितके प्रसंग आठवता येतील.
गीतेच्या प्रकटना नंतरचाच प्रसंग घ्या. पाच हजार वर्षापूर्वीचं कुरुक्षेत्राचं रणमैदान. कौरव सेनापती महारथी कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलंय. तो एका हाताने चाक बाहेर काढतोय नि दुसर्या हाताने अर्जुनाला थोपवतोय. त्याला धर्मयुद्धाच्या नियमांची आठवण करून देतोय. अर्जुनाने धनुष्याला उसंत दिलीय. तोच कृष्णाचे शब्द चाबकाच्या फटकार्यासारखे कर्णाच्या नि अर्जुनाच्याही कानी घुसतायत-’भीमाला मोदकातून विष चारताना, पांडवांना लाक्षागृहात जाळताना, भर राजसभेत द्रौपदीचं वस्त्रं फेडताना, कर्णा, तुझा धर्म कुठे गेला होता? ’क्व ते धर्मस्तदा गता?’ अर्जुना, बघतोस काय? उडव ते अधर्मी मस्तक!
१४ जानेवारी १७६१. पानिपतचं रणमैदान. विश्वासराव पेशवा अवघा २० वर्षांचा तो तेजस्वी तरूण, आपले काका, मराठ्यांचे सेनापती भाऊसाहेब पेशवे यांच्याजवळ येतो आणि म्हणतो की, “काकासाहेब, हे गिलचे, कालचे शेणाचे गोळे आज लोखंडाचे गोळे बनू पाहत आहेत. यांना शिकस्त दिलीच पाहिजे. आज आम्ही मागे राहणार नाही. गर्दीत घुसून जातीने मारामारी करणार.“ हे बोलत असताना विश्वासरावाच्या डोळ्यांत तरळलेला विलक्षण करार पाहून भाऊसाहेब थक्क झाले.
असे किती प्रसंग आठवावेत? नामर्दालाही वीरश्री चढावी अन् मर्दाचे तर भानच हरपावे, अशा रणउद्गारांचा खच आमच्या या वीरप्रसवाभूमीत पडला आहे. उणीव आहे, ती त्या रत्नांचा संग्रह करणार्यांची!