नेपोटिझमसारखी गोष्ट कधीच संपणार नाही - दीपिका पडूकोण

15 Nov 2023 13:27:14

deepika padukone 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम हा विषय कायमच चर्चेत असतो. यावर अनेक कलाकारांनी आपली मते मांडली आहेच. नेपोटिझमच्या या विषयावर आता सध्याची हिंदीतील आघाडीतील अभिनेत्री दीपिका पडूकोण हिने आपले मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत तिला याबद्दल विचारले असता, “नेपोटिझमसारखी गोष्ट कधीच संपणार नाही”, असे वक्तव्य तिने केले आहे.
 
नेपोटिझमवर काय म्हणाली दीपिका?
 
दीपिका म्हणाली, “माझ्याजवळ तर कोणताच दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे मी नेहमीच समोर येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकवेळी यशस्वी झाले असे नाही, पण प्रयत्न करत राहिले आणि मला यश मिळत गेले. १५-२० वर्षांपूर्वी मी बाहेरची होते. आता मी त्यांच्यापैकी एक आहे. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात स्वत:चे नाव कमविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. तुमचे आई वडील कोण आहेत? याच्याशी कुणाला काही देणेघेणे नसते. तुम्ही, तुमचे काम आणि तुमची कार्यक्षमता हे महत्वाचे आहे. नेपोटिझमसारखी गोष्ट ही कधीही संपणारी नाही. ती यापुढील काळातही सुरुच राहणार असेही दीपिका यावेळी स्पष्टपणे म्हणाली.
 
हिंदी चित्रपटसृष्टीत गेली अनेक वर्ष नेपोटिझम सुरु असून स्टार किड्सना अभिनयाचा गंध नसेल तरीही त्यांना प्रसिद्धी आणि चित्रपट मिळतात. मात्र, सच्चा कलाकार नेपोटिझमच्या पडद्यामागे झाकला जातो असा आरोप केला जात आहे. यावर अभिनेत्री कंगना राणावत हिनेही तिची भूमिका मांडली होती. 







 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0