ग्रेटा थनबर्ग नक्की कोण? पर्यावरणवादी की, हिंसक फुटीरतावादी मनोवृत्तीचे प्यादी? नुकतेच जलवायू परिवर्तन, प्रदूषण यांबद्दल नेदरलॅण्ड येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी स्वीडनची २० वर्षीय ग्रेटा तिथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होती. रॅली होती-पर्यावरणाबद्दल. मात्र, ग्रेटा हिने मंचावर एक पॅलेस्टाईन आणि एक अफगाणिस्तानच्या अशा दोन महिलांना बोलावले. इस्रायलविरोधात घोषणा देत ‘फ्री पॅलेस्टाईन’बद्दल ग्रेटा बोलू लागली. यावर एका तरुणाने तिच्या हातातील माईक हिसकावला आणि म्हटले की, ”इथे केवळ जल, वायू परिवर्तनाबद्दल बोलायला हवे.
आम्ही त्याच्यासाठीच इथे आलो आहोत. इथे कोणत्याही राजकारणाला थारा नाही.” त्याला समोरच्या लोकांनी समर्थन दिले. दोन मिनिटांत हे सर्व घडले. पण, त्याचे म्हणणे आणि त्याला मिळालेले समर्थन पाहून ग्रेटा आणि तिचे समर्थक भडकले. त्यांनी त्याला मंचावरून जबरदस्तीने खाली उतरवले. या सगळ्या प्रकरणामुळे तिचे खरे रूप लोकांसमोर आले. आपण पॅलेस्टाईनचे समर्थन का केले, हे सांगताना ग्रेटा म्हणाली की, ”पॅलेस्टाईन फ्री झाला तरच जलवायूला न्याय मिळेल.” या विधानाला काही तरी तर्कसुसंगत अर्थ आहे का? जणू काही जगभरातले जलवायू प्रदूषण आणि पर्यावरणाचा र्हास पॅलेस्टाईन मुक्तीमध्येच आहे, असे ग्रेटाचे विधान.
खरे तर रॅलीचे आयोजन होते, पर्यावरणावर. मात्र, त्या रॅलीमध्ये ग्रेटा भाषणबाजी करत होती. पॅलेस्टाईन व ‘हमास’ समर्थनार्थ. पॅलेस्टाईन समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले की, पॅलेस्टाईन समर्थकच येतील. मात्र, पर्यावरणातील प्रदूषण आणि सामान्य जणांना त्रास वगैरे विषय घेऊन रॅली काढली की, सर्वच स्तरावरील लोक रॅलीत सहभागी होतात. सर्वसामान्य लोकांना दुसर्या देशात काय चालले, याचे घेणेदेणे नसते. मात्र, ग्रेटा थनबर्ग हिला प्रसारमाध्यमांनी तिच्या प्रतिभा आणि प्रतिमेपेक्षाही मोठे केले असल्याने लोक तिला ओळखतात. त्यामुळे या अशा रॅलीमध्ये ग्रेटाला मार्गदर्शक म्हणून उभे केले जाते. मग गे्रटा पर्यावरणाच्या आडून ‘हमास’चे समर्थन लोकांच्या गळी उतरवणार, हे एक टूलकिट आहे.
मागे आपल्या भारतातही पंजाब सीमेवर एक तथाकथित शेतकरी मोर्चा सुरू होता. त्यात खलिस्थानी समर्थक ते नक्षलीसमर्थक सगळेच एकवटलेले दिसले होते. त्यावेळी ग्रेटा थनबर्ग हिने त्या तथाकथित शेतकरी मोर्चाचे समर्थन तर केलेच. पण, या मोर्चासंबंधातले तिने जे टूलकिट ’एक्स’वर प्रसिद्ध केले होते, त्यामुळे ग्रेटाचे खरे विध्वंसकवृत्ती जगासमोर आली. ’एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या टूलकिटमध्ये शेतकरी आंदोलनामध्ये लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी काय करायचे. ते यापासून प्रत्येक दिवशी कोणी कोणी, कुठे कुठे, काय काय करायचे, अडचण आलीच तर कुणाला संपर्क करायचे, हे त्यात होते.
दि. २६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन या दिनी आंदोलनाच्या निमित्ताने संसद भवन आणि अदानी-अंबानी यांच्या कार्यालयाला घेराव टाकायचा वगैरे-वगैरे त्यात लिहिले होते. यामध्ये काही व्यत्यय आला, तर काही लोकांचे संपर्कही दिले होते. ते संपर्क कॅनडातील खलिस्थानी आणि पाकिस्तानी समर्थकांचे होते. हे टूलकिट त्यानंतर ग्रेटाने वगळले. पण, तोपर्यंत जगानेही टूलकिट पाहिले होते. याचाच अर्थ ग्रेटा काही भारतीय शेतकरी किंवा भारतीय पर्यावरणाच्या काळजीसाठी, त्या शेतकरी मोर्चात सामील झाली नव्हती, तर तिला कॅनडातील खलिस्तानी आणि पाकसमर्थकांनी हे करण्यास मोहरा बनवले होते. बरं ग्रेटा काही निष्पाप, निर्दोष नाही. हे सगळे करण्याच्या बदल्यात तिलाही भरपूर काही मिळालेच असेल का?
दि. १९ ऑक्टोबर रोजी लंडनमधील तेलसंबंधित व्यवसाय परिषदेमध्येही तिने असाच गोंधळ घातला. तिचे म्हणणे होते की, ”तेल या इंधनामुळे प्रदूषण वाढते, त्याबद्दल व्यावसायिकांनी बोलावे.” मात्र, तिच्या सोबतचे लोक म्हणत होते की, गाझामध्ये जे काही सुरू आहे, त्याबद्दल आम्हाला संताप आहे. याचाच अर्थ प्रदूषण विरोधाच्या आड ग्रेटा या लोकांसोबत गाझा पट्टी, ’हमास’चे समर्थन करण्यास गेली होती. न्याय-अन्यायवर बोलणार्या ग्रेटाला ’हमास’चे क्रौर्य दिसले नाही का? नुकताच एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. दि. ७ ऑक्टोबर इस्रायलमध्ये १५ वर्षांची मुलगी अभ्यास करत होती.
’हमास’चा दहशतवादी तिच्या घरात घुसला, त्याला पाहताच ती भेदरली, रडत म्हणाली की, “मला मारू नका, उद्या मला शाळेत जायचे आहे.“ पण, त्याने त्या मुलीवर बलात्कार केला. निर्घृण अत्याचार केला आणि तिला मारून टाकले. १५ वर्षांच्या त्या शाळकरी मुलीचे स्वप्न, तिचे दुःख, यातना ग्रेटासारख्या खोटारड्या पर्यावरणवाद्यांना कळत नाहीत का? ती मुलगी काय पर्यावरणाचा घटक नव्हती? ग्रेटा थनबर्गचा निषेध!
९५९४९६९६3८