‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

13 Nov 2023 20:30:46

ekda yeun tar bgha, marathi film, prasad khandekar
 
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता आणि लेखक प्रसाद खांडेकर याचा पहिला दिग्दर्शित चित्रपट 'एकदा येऊन तर बघा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे. मात्र, प्रेक्षकांना ही धमाल पाहण्यासाठी थोडा धीर धरावा लागणार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. 'एकदा येऊन तर बघा ’ आता २४ नोव्हेंबर ऐवजी ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला येणार आहे .
 
सध्या मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली आहे. हीच वाढलेली गर्दी लक्षात घेता दोन आठवडे थांबून ८ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला आहे. ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार,गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठी फौज चित्रपटात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0