मुंबई : मी उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोका कोलाचा उद्योग उभारला जात आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण मधील वशिष्टी नदीतील टप्पा क्र. १ बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यानंतर मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उदय सामंत म्हणाले, "पंधराशे कोटीचा कोका कोला उद्योग उभारला जात आहे. मी उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिला उद्योग रत्नागिरी जिल्ह्यात आणण्यात आला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील.दोन वर्षापूर्वी चिपळूणला पूर आला तेव्हा माजी पालकमंत्री अनिल परब यांनी पळ काढला. त्यादिवशी सकाळी ६.३० वाजता अधिकारी यांची बेठक घेतली. या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी मुंबईला जाण्यासाठीचा मार्ग विचारला आणि चिपळूणकरांना वाऱ्यावर सोडून परब गोवा मार्गे मुंबईला गेले. हा मोठा गौप्यस्फोट म्हणा की आणखी काही, पण मी आज त्यावेळची वस्तुस्थिती सांगितली." अशी माहिती सामंत यांनी दिली.