तुझ्या देशात परत जा! न्यूयॉर्कमध्ये हमासप्रेमी जोडप्याचे ज्यू व्यक्तीशी गैरवर्तन

13 Nov 2023 12:58:40


Kurush Mistry & Shailaja Gupta

मुंबई :
अमेरिकेतील भारतीय वंशाचा कुरुश मिस्त्री याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. कुरुश मिस्त्री आणि त्याची पत्नी शैलजा गुप्ता या दोघांनी हमासने ओलिस ठेवलेल्या ज्यूंविरुद्ध अमेरिकेत द्वेष पसरवण्याचे काम केले होते. त्या दोघांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.
 
या व्हिडीओमध्ये, कुरुश मिस्त्री आणि शैलजा गुप्ता ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासने अपहरण केलेल्या लोकांचे न्यूयॉर्कमध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स हटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या पोस्टरवर ‘हमासने अपहरण केलेले' असे लिहिले आहे. परंतू, त्याऐवजी ते दोघे हमासचे समर्थन करणारे पोस्टर चिकटवताना दिसत आहेत.

 
यावेळी एका ज्यू व्यक्तीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याच्याशी गैरवर्तनही केले. एवढेच नाही तर ते दोघे अश्लील हावभाव करत त्याला त्याच्या देशात (इस्रायल) परत जायला सांगत आहेत. पीडित ज्यूने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.
 
दरम्यान, कुरुश मिस्त्रीच्या या वागणुकीमुळे त्याला आता नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. फ्रीपॉइंट कमोडिटीज या इंधन व्यापार कंपनीत तो काम करत असून या कंपनीचा सीईओ एक ज्यू व्यक्ती आहे. कुरुश मिस्त्रीला कामावरून काढून टाकल्याची बातमी लिंक्डिनवर देण्यात आली आहे.



Powered By Sangraha 9.0